ट्रम्प यांच्या “विषारी बिया” रुजण्यासाठी सुपीक जमीन कशी बनली ?

354

नोव्हेंबरमध्ये निवड झाल्यापासून ते आजपर्यंत ट्रम्प यांची रेवडी विविध माध्यमांमधून उडवली जात आहे. पण ते त्या स्थानापर्यंत पोचलेच कसे?  याबद्दल कमी चर्चा होत आहेत. प्रचाराच्या दरम्यान ट्रम्प यांनी ज्या विखारी बिया पेरल्या त्या रुजण्यासाठी लागणारी मतदारांची मनोभूमी काय त्यांनी स्वतः नांगरली?  ते तर राजकारणात देखील अलीकडे आलेत. मग त्याला जबाबदार कोण? आठ वर्षे अध्यक्षपदावर असणारे बराक ओबामा या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील?

जागतिकीकरणामुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढली आहे. कामगारांचे खरे वेतन (महागाई वजा करून) वाढलेले नाही; असमानता वाढली आहे; २००८ मध्ये दरीत कोसळून देखील वित्त भांडवल काहीच घडले नाही अशा आविर्भावात दादागिरी करीत आहे. अशा अनेक बाबी काय ओबामांच्या प्रशासनाला आठ वर्षात कळल्या नव्हत्या ?

२००८ साली बाराक ओबामा निवडून आले त्याच वर्षी झालेल्या सबप्राइम क्रायसीसमुळे वॉल स्ट्रीट हादरले होते. वॉल स्ट्रीट ज्याचे प्रतिनिधित्व करते त्या वित्त-बँकिंग उद्योगाला शिस्त लावायला ती अतिशय योग्य वेळ होती. जनमानस आणि सेनेट मधील सभासदांची स्वीकारहार्ता होती. पण ओबामांनी वॉल स्ट्रीटच्या नाकात वेसण घालण्यासाठी काहीच केले नाही.

अमेरिकन सामान्य नागरिकांमध्ये किती आणि कशासाठी असंतोष आहे हे ८० वर्षे वयाच्या बर्नी सँडर्स यांनी बरोबर ताडले. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून केलेल्या तडाखेबंद प्रचारात सॅन्डर्सनी त्या दृष्टीने मांडणी केली. कामगार, कष्टकरी, निम्नमध्यमवर्गीय यांचा वाढता पाठिंबा मिळवला. त्यात कोठेही ट्रम्प सारखी संकुचित मांडणी नव्हती. अतिरेकी राष्ट्रवादाला आवाहन, वंशवादाला उचकवणे नव्हते. उलट वॉल स्ट्रीट, मोठी कॉर्पोरेट्स, शासनाचे शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रातून अंग काढून घेणे या बद्दल सडेतोड टीका होती.

वॉल स्ट्रीट, कॉर्पोरेट्स व मीडियाचा पाठिंबा ना ट्रम्प ना होता ना बर्नी सँडर्स याना. तो होता हिलरी क्लिंटन याना. हिलरी या प्रस्थापित व्यवस्थेच्या प्रतिनिधी मानल्या जात. त्यामुळे अमेरिकी समाजात साचलेल्या असंतोषाची मते कधीही हिलरी क्लिंटनकडे जाणे शक्य नव्हते. अध्यक्ष पदाची अंतिम निवडणूक ट्रम्प आणि सँडर्स यांच्यात झाली असती तर सँडर्स निवडून देखील आले असते असं काही निरीक्षकांचे म्हणणे आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत हिलरी क्लिंटन व बर्नी सँडर्स याच्यात चाललेल्या रस्सीखेचीत बराक ओबामांनी आपले वजन कोणाच्या मागे लावले होते? कशाही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होऊ नयेत म्हणून देव पाण्यात घातलेल्या कॉर्पोरेट्स व वॉल स्ट्रीटनी ८ नोव्हेंबरच्या रात्री १८० अंशाने टोप्या फिरवल्या. अनेक जण ट्रम्प यांचे सल्लागार बनत आहेत. डाऊ जोन्सचा इंडेक्स (आपल्या सेन्सेक्स सारखा ) फक्त शंभर दिवसात २० टक्क्यांनी वधारला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत, विशेषतः विकसित भांडवलशाही राष्ट्रात साचलेल्या असंतोषातून डाव्या विचारांच्या “जनकेंद्री” राजकीय शक्ती रुजू नयेत, वाढू नयेत यासाठी काहीही केले जाईल.

प्रश्न अमेरिकेपुरता व ट्रम्पपुरता मर्यादित नाही. ब्रिटनपासून युरोपातील अनेक देशात संकुचितवाद, वंशवाद पसरत आहे. त्यात साहजिकच हे विष पेरणाऱ्या संघटना, त्यांचे नेते यांच्या नावांची, त्यांच्या व्यक्तिमत्वांची चर्चा होणार. पण या संकुचित व वंशवादी राजकीय शक्ती गेल्या दोन-चार वर्षातच कशा फोफावू लागल्या? त्यांना लागणारी जमीन कशी बनली याच्या चर्चा, याचे विश्लेषण झाले पाहिजे. तरच हे थोपवण्यासाठी काय करता येईल याचे दिशा दिग्दर्शन होऊ शकेल.

– संजीव चांदोरकर

संजीव चांदोरकर हे टाटा समाजविज्ञान संस्थेत (TISS) प्राध्यापक आहेत.