चौकटीत अडकलेले ‘पुरोगामी’!

6015
14908241_1014276358682033_2344691894512461654_n

निवडणुकीचे निकाल येत होते तसं तसं राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेपेक्षाही जास्त अस्वस्थता राज्यातील ‘पुरोगामी’ मंडळींमध्ये दिसून येत होती. विचार करणाऱ्या कुठल्याही घटकाला हे निकाल चिंताजनक वाटतील असेच आहेत. पण विशेषत: पुरोगामी मंडळींना हे जास्त चिंताजनक का वाटावेत? सोशलमीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर ही अस्वस्थता दिसून येत होती. अशीच काहीशी अस्वस्थता २०१४ च्या निकालांच्या वेळीही दिसून येत होती. विधानसभेसाठी शिवसेना भाजप युती तुटली त्याचा झालेला आनंदही जवळून पाहिला, अनुभवला आहे. अनेक पुरोगाम्यांनी शिवसेनेला मतदान केल्याचंही मी पाहिलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारूण पराभवामुळे अस्वस्थ झालेले अनेक जण अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत.

राज्यातल्या पुरोगामी विचारवंत आणि माझ्यासह इतर अनेक पत्रकारांचा संघाच्या विचारधारेला कडवा विरोध आहे. हा विरोध अतिरेकी हिंदुत्ववादाच्या प्रसाराला रोखण्यासाठी होता, धर्मनिरपेक्षतेच्या पुरस्कारासाठी होता, राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांच्या संरक्षण-संवर्धनासाठी होता. कालानुरूप धर्मनिरपेक्षता हा परवलीचा शब्द झाला. उजव्यांनी त्याची स्युडोसेक्युलर म्हणून हेटाळणी केली. उजवे मुस्लीमविरोधी भूमिका घेतात म्हणून डाव्या-मधल्या आणि मधमधल्या पुरोगामींनी सरसकट उजव्यांच्या विरोधात बोलायला सुरूवात केली. जितक्या कट्टरपणे उजव्यांवर आणि हिंदू धर्मावर बोललं जातं तितकं मुस्लीम धर्मावर का बोलत नाही या एका मोठ्या प्रश्नाने पुरोगामी मंडळींच्या गळ्यात फास टाकला. उजवे ब्राह्मणवादी, मनुवादी आहेत, दलित विरोधी आहेत असा प्रचार करत असताना समानतेचं तत्व समाजात पोहोचावं म्हणून तळमळणारी पुरोगामी विचारधारा दलित उद्धाराचं काम करण्यात अपयशी ठरली. दलितांमध्ये ही असलेल्या टोकाच्या जातीयवादाची धार कमी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे केलेले प्रयत्न ही फारसे यशस्वी होताना दिसले नाहीत. उलट, प्रतिगामी म्हणून शिक्का मारलेले संघ आणि भाजप हळूहळू जाहीररित्या सर्वसमावेशक आणि लिबरल भूमिका घेत राहिले. मंदिर, मुस्लीमद्वेष, दलितद्वेष सारखे अजेंडा छुप्या पद्धतीने समांतर ट्रॅक वर चालवत राहिले. पुरोगाम्यांची गाडी मात्र अजूनही एकाच ट्रॅकवर चालते.

समोरची व्यक्ती काय हत्यार घेऊन आलीय हे पाहून आपण आपले हत्यार निवडायला हवं. समोर रिवॉल्वरधारी आल्यानंतर आपण तलवार-ढालीचा अट्टाहास सोडायचा नाही, असाच काहीसा प्रकार पुरोगामी मंडळींमध्ये दिसतो. विज्ञानवादी म्हणणारे अनेक पुरोगामी स्मार्ट फोन, सोशल मिडीया वापरत नाहीत. आपलं काम हे प्रसिद्धीसाठी नाहीय असं सांगतात. उलट संघ ही आपलं काम प्रसिद्धीसाठी नाही असं सांगत असतानाच सर्व माध्यमांचा वापर करून ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काहीही झालं की युनिफॉर्ममधल्या तीन चार का होईना संघस्वयंसेवकांचे फोटो व्हायरल करायचे उपक्रम संघ राबवत असतो. या अतिरेकी प्रचाराचा उलट परिणाम होईल आणि आपण अधिक बळकट होऊ अशा भोळ्या भाबड्या आशेवर ही अनेक जण जगत आहेत.

अस्वस्थता का?

भाजपच्या विजयामुळे पुरोगामी मंडळींमध्ये अस्वस्थता का? काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला पुरोगामी मंडळींचं समर्थन आहे का? तिसऱ्या आघाड्या आपण जिंकणार नाही या भावनेनेच का लढतात? एकाद्या पक्षात किंवा संघटनेत नवीन नेतृत्व उदयाला येत असेल तर पुरोगामी मंडळी का बिथरतात? आपल्या ताब्यातील पक्ष किवा संघटना नवीन पीढीला का सोपवत नाहीत? आपण प्रामाणिकपणे काम केलं पण फेल झालोयत हे पुरोगामी मंडळी कधीच का स्वीकारत नाहीत? आम्ही लोकांसाठी काम करतो आणि मोठं काम उभं राहिलंय या भ्रमातून पुरोगामी मंडळी का बाहेर पडत नाहीत? आपल्यावरच लढण्याचा सर्व भार आहे आणि आपण एकटेच कसं लढलो या भ्रामक समजुतींतूनही ही मंडळी बाहेर का पडत नाहीत? अशा अनेक प्रश्नांनी मला भांडावून सोडलंय. मी अनेकांना हे प्रश्न विचारत असतो. पुरोगाम्यांच्या ‘ताब्यात’ असलेल्या अनेक संस्था-ट्रस्ट त्यातले ट्रस्टी मेल्यावर नवीन ट्रस्टी न नेमल्याने अडचणीत आहेत. मग तरूण कार्यकर्ते आपापला रस्ता शोधतात. प्रवाह खंडित झाल्याने मग असे छोटे छोटे झरे निर्मांण होतात, त्यांनाही वाटायला लागतं, आपलेच पाणी गोड आहे आणि सर्वांची तहान भागवायचं काम आपल्यालाच करायचंय. एकूणच भ्रमाच्या एका मोठ्या कृष्णविवरामध्ये सर्व पुरोगामी अडकलेले दिसतात.

निकाल जाहीर होत असताना पुरोगामी मंडळी अतिशय हीन आणि प्रतिगामी मेसेजेस फॉरवर्ड करत होती. ईव्हीएम मशीन मध्ये गडबडीपासून आता साडेतीन टक्केवाले राज्य करणार का? इथपर्यंत. आपला काही संबंध नाही मग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव आपल्या इतक्या जिव्हारी का लागावा?

दांभिकपणा?

धर्मनिरपेक्ष विचारधारेचा पुरस्कार करत असताना ती विचारधारा जिवंत राहावी म्हणून राजकीय पर्याय पण देणे गरजेचे आहे, एक मोठा कालखंड राज्यातील पुरोगामी नेत्यांनी संसंदबाह्य राजकारणाचा रस्ता निवडला. त्यावेळी पुरोगामीत्वाचा वसा घेतलेली सरकारं होती, त्यांच्यावर अंकुश ठेवायचं काम ही मंडळी परिणामकारकरित्या करत होती. लढायचं कुणाविरोधात हा ही प्रश्न होताच. पुढे राजकीय इच्छा निर्माण झाल्यावर ज्यांनी राजकीय पर्याय व्हायला हवं होतं ती मंडळी विविध पक्षांमध्ये गेली, यशस्वी झाली. काही तर अगदी शिवसेना-भाजपमध्येही गेली. नंतरच्या काळात ज्यांच्या विचारधारेचा पत्ता नाही अशा ‘आप’ सोबत गेली, अगदीच काही नाही तर कालपर्यंत जातीअंताच्या चळवळी चालवणारे अनेकजण मराठा क्रांती मोर्चाचे ही नेते झाले. जे जे काही येईल त्याच्या मागे ही सर्व मंडळी धावत आहेत. संघीय आणि ब्राह्मणवादी, मनुवादी विचारधारेला विरोध वगैरे करण्यासाठी प्रचंड आटापिटा सुरू असतो. हे सर्व करून कुठलाच राजकीय पर्याय उभा न केल्या मुळे अखेरीस या सर्व ताकदीचा  फायदा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससारख्या तद्दन संधीसाधू पक्षांना होत असतो. या पक्षांच्या बदनामीचा फटका पुरोगामी मंडळींना सतत होत आलाय. एकूणच समाजातील विवेकी विचार करणारे घटत सोडले तर कडवे मुस्लीम, कडवे दलित, व्यवस्थेला आव्हान देणारे अतिडावे, आणि भ्रष्टाचाराचा शिखर गाठलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष यावर पुरोगामी मंडळी उघडपणे भूमिका घेताना दिसत नाहीत. या दोन्ही पक्षांनी अनेकवेळा आपापल्या विचारधारेची कास ही सोडलेले आहे. असंच काहीसं पुरोगामी ब्रँडींग असलेल्या इतर राजकीय पक्षांचंही आहे. मग याबाबत कधी तुरळक अपवाद वगळता काही आवाज ऐकला आहे का? सर्व पुरोगामी मंडळींनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या प्रेमातून बाहेर पडलं पाहिजे. प्रेमच करायचं तर मग उघड केलं पाहिजे. असं लफडं करत राहिल्याने, अनेक समस्या उद्भवल्या आहेत.

भाजपच्या विजयाचं रहस्य

राज्यातील शहरी तसंच ग्रामीण भागातही पुरोगामी आणि पुरोगामी मंडळींनी अधोरेखित केलेले राजकीय पर्याय मागे पडलेले दिसतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी नाकारलंय का? तर मला वाटत नाही नाकारलंय. त्यांना वेगळ्या फॉर्म मध्ये आणि ब्रँडनेम खाली लोकांनी स्वीकारलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेसाठी असलेले अनेक नामचीन लोक भाजपमधून निवडून आले. कोण निवडून येऊ शकतो याचा भाजपने आणि कुठल्या पक्षात निवडून येता येऊ शकेल असं उमेदवारांनी ठरवलं होतं. मतदारांनी ‘न्यू’ असं ब्रँडींग केलेल्या उमेदवारांना स्वीकारलंय.

याचबरोबरीने निवडणूका या जिंकण्यासाठी असतात, त्या तशाच लढल्या पाहिजेत या राजकीय ईर्ष्येला पेटलेल्या भाजपला लोकांनी पसंती दिलीय, इतर पक्ष जिंकण्याच्या भावनेने लढतच नव्हते. आत्मविश्वास गमावलेल्या कुठल्याही पक्षाला लोकांनी मतदान केलेले नाही. लोक स्थैर्यासाठी मतदान करतात, आणि तो विश्वास सध्या फक्त भाजप आणि काही प्रमाणात शिवसेना देतेय. पक्षांतर्गत वादविवादांनी परेशान असला तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे, राष्ट्रवादीची भूमिका मात्र धरसोडपणाची आहे. आपण भाजपची बी टीम असल्यासारखं राष्ट्रवादी काँग्रेस वागतेय. त्यामुळे लोक ही ‘बी’ टीम पेक्षा थेट ‘ए’ टीम लाच मतदान करतायत. साहेबांच्या पुरोगामी धोरणांच्या सर्वसमावेशक मृगजळाला बळी पडलेल्या पुरोगामी विचारवंतांची त्यामुळे दैना उडाली आहे. आप, मनसे सारखे पक्ष राज्यात विरोधी पक्षाची स्पेस घेऊ शकतात. पण हे दोन्ही पक्ष आपल्या नेतृत्वाच्या अगम्य अशा धोरणांचे बळी आहेत. निवडणूक न लढण्याचा शौक राजकीय पक्ष कसा काय पाळू शकतात हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे.

निस्पृह, निरपेक्ष वगैरे वगैरे

काही पुरोगामी विचारवंत स्वत:ला सर्व गोष्टींपासून इतकं अलिप्त ठेवतात की यांची खरं तर समाजाला गरजच काय असा प्रश्न मला पडतो. हे विचारवंत गरजेच्या वेळी कधीच भूमिका घेत नाहीत, सतत सल्ले देत राहतात. रस्त्यावर उतरत नाहीत. या राज्यात संसंदबाह्य राजकारणाची मोठी परंपरा होती. मात्र काहींनी याचा गैरअर्थ काढलेला दिसतो. आयुष्यभर स्वत: संसंदबाह्य राहतात पण राजकारण करत नाहीत. राजकारणावर ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर आणि गुंडानी कब्जा केला तेव्हा हे सर्व संसंदबाह्य राजकारणी झोपतात काय? एकेकाळी पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याच्या विरोधात उभी ठाकलेली संसंदबाह्य चळवळ आता का दिसत नाही.

मी अनेकवेळा एक निरिक्षण नोंदवलंय, सर्व पुरोगामी पत्रकारांनी आपापला वाटा उचलत, कधी दयेने, कधी सौजन्याने, कधी चळवळ जगवावी म्हणून संख्येने नगण्य आणि लुप्त पावत चाललेल्या पक्षांनाही प्राइम टाइमच्या चर्चांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या सोबतीने भूमिका मांडायची संधी किंवा एअर टाइम दिलाय. असं असताना ज्या माध्यमांना विकत घेण्यासाठी काही पक्षांनी कोट्यवधी खर्च केले असा सतत आरोप करणाऱ्या या नेत्यांवर लाखों रूपयांचा एअर टाइम खर्च करूनही यांच्या जागा का निवडून येत नाहीत. हे स्वत: का निवडून येत नाहीत. निवडून येणं सोडा, टीव्ही सारख्या स्मार्ट मिडीयम वर बाकीचे प्रवक्ते सेलेब्रिटी बनून जातात आणि पुरोगामी पॅनेलिस्ट पुढे का सरकत नाहीत, त्यांचं फॅन फॉलोईंग का तयार होत नाही? कोणी दुखावलं जात असेल तर जाऊ दे, पण मला डझनभर असे नेते माहितेयत की ज्यांच्यावर त्यांच्या पिकअप-ड्रॉप पासून एअर टाइम पर्यंत सर्व वृत्तवाहिन्यांनी कोट्यवधी रूपये खर्च केलेला आहे. इतकं असून जे वाढत नाही, त्यात नक्की काय खोट आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आत्मचिंतन न करणं आणि सातत्याचा अभाव किवा सतत भाडोत्री वागणं यामुळे हे फॉलोईंग तयार होत नाही. इतर प्रवक्ते आपलं प्रॉडक्ट मार्केट करत असतात तिथे पुरोगामी विचारवंत सतत सर्व गोष्टींवर प्रतिक्रीया देत असतात, सल्ले देत असतात. यातून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही कोण आहात? तुमच्या सल्ल्याने काय होणार आहे? तुमचा जनाधार का वाढत नाही? असे अडचणीचे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत.

नक्की स्पेस काय?

भारतीय जनता पक्षाचा राज्यातील प्रसार हा काही संघ विचारधारेचा प्रसार नाही. हा राजकीय प्रसार आहे. जो वरचढ असतो त्याला याचा फायदा होत असतो. मात्र या राजकीय प्रसारासोबत संघाचा प्रसार करायचा हा राजकीय कार्यक्रम आहे. मात्र हा अत्यंत छुपा आणि संथगतीने होत असलेला कार्यक्रम आहे. अशा वेळी लपून छपून नाहीतर समोर, रस्त्यावर येऊन राजकीय पर्यायांमध्ये सामील व्हायला पाहिजे. राजकारण आपलं काम नाही, खूप पैसे लागतात, कोण लफडं करणार, आत्ता काही शक्य नाही- बघू पाच वर्षांनंतर अशा निराशावादी पुरोगाम्यांची साथ सोडायची ही वेळ आहे. जे धर्मनिरपेक्ष, पुरोगामी असा टॅग घेऊन जातीय आणि धार्मिक तेढ वाढवतात अशांना थेट ‘नाही’ बोलायची ही वेळ आहे. जे वैचारिकदृष्ट्या जवळचे वाटतात पण जन्ममृत्यूच्या दाखल्याचेही पैसे खातात अशांच्या पार्श्वभागावर लाथ मारायची ही वेळ आहे. ही वेळ आहे विरोधी पक्षाची स्पेस घ्यायची आणि थेट राजकीय चळवळीत उतरायची. ज्यांना संसंदबाह्य राजकारण करायचंय त्यांनी ही निराशावाद सोडून कामाला लागलं पाहिजे. संसदीय प्रणाली समजून घेतली पाहिजे, सतत स्वत:ला ‘तिसरी’ आघाडी म्हणवून घेणं ही बंद केलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात एकच नंबर असतो आणि तो  नंबर ‘एकच’ असतो. बाकीच्यांना कोणी विचारत नाही. आणि शेवटचं…. आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ‘समविचारी’ लोकांच्याच बैठका बोलवत राहण्याच्या मोहातून बाहेर पडलं पाहिजे.

रवींद्र आंबेकर