चित्रकला आणि सौंदर्य संवेदना

2749

चित्रकलेच्या बाबतीच एक अतिशय महत्वाची गोष्ट येत्या २५ वर्षांत घडायला हवी असं मला वाटतं, ती म्हणजे कलाकाराची मेहनत आणि त्याचं/ तिचं मूल्य समजून घेणं. कोणी भल्या माणसानी दहा अशा गोष्टींची एक यादी केली आहे की ज्या गोष्टी कधीही कलाकाराला म्हणू नयेत. त्या अशा –

१. मी माझ्या मित्राला/ मैत्रिणीला हे असंच चित्र काढायला सांगेन.
२. हे काढण्यापेक्षा तू असं असं चित्र का नाही काढत?
३. जर मी दोन चित्र विकत घेतली तर किंमत कमी करशील का?
४. हे तर मी पण करू शकेन.
५. या चित्राची किंमत एवढी का आहे?
६. हे कसं केलं त्याची पद्धत सांगशील?
७. तुझं चित्र आम्हाला फुकटात देशील का? आम्हाला पैसे देणं नाही जमणार पण तुलाच चांगली संधी मिळेल.
८. माझी नऊ वर्षाची मुलगी सुद्धा अशीच चित्र काढते.
९. मुलांनो, तुम्ही शाळेत असताना अभ्यास केला नाहीत तर हे असं करावं लागतं.
१०. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला काम करावं लागत नाही. फक्त दिवसभर बसून चित्र काढायची.

खरं तर या यादीतील प्रत्येकच मुद्दा कलेची समज नसल्याचंच लक्षण आहे. या गोष्टी चित्रकाराला का म्हणायच्या नाहीत हे जेव्हा समजेल तेव्हा आपला समाज चित्रकला क्षेत्राकडे नव्या दृष्टीने पाहू शकेल. अभिजनांनी जसं बहुजनांना चित्रकला समजावी याकरता प्रयत्न केले पाहिजेत तसेच बहुजनांनी आपल्याला चित्र कळावीत याकरता प्रयत्न केले पाहिजेत. तो दुहेरी रस्ता आहे. कलाकाराचे कष्ट आणि प्रतिभा या दोन्हीची जाण समाजाला असणं गरजेचं आहे. कला निर्मिती आणि जतन यांवर जोपर्यंत योग्य पैसे खर्च करण्याची आपली मानसिक तयारी होत नाही, तोपर्यंत आपली आयुष्य अनेक अंगांनी असुंदरच राहतील.

सर्व समाजाला सोबत घेऊन चित्रकलेत क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वांना चित्र काढण्याच्या संधी निर्माण करायला हव्यात. सामान्य माणसाला सोबत घेऊन ठिकठिकाणी चित्र काढली जायला हवीत. सार्वजनिक ठिकाणं, कोऱ्या मोठाल्या भिंती, उंचच उंच इमारती, बंगले, झोपडपट्ट्या, वाहनं, रस्ते, रस्त्यावरील जाहिरात फलक अशा सर्वच ठिकाणी जाहिरातबाजी आणि बाजारीकरण थांबवून सौंदर्य निर्मिती आणि जपणुकीवर भर द्यायला हवा. सात अब्जहून जास्त लोकसंख्येच्या जगात रहात असताना एकेकट्या माणसाने कलेत प्राविण्य मिळवणं पुरेसं नाही. उत्तुंग शिखरांवर पोहचणारे कलाकार जितके महत्वाचे आहेत, तितकेच पठारावरील बहुसंख्य कलाकारही आता महत्वाचे आहेत. उत्तम चित्रकार आणि सामान्य चित्रकार यांच्यातील दरी जेवढी कमी होईल तेवढा समाजाचा फायदा होईल. समूहाने एकत्र येऊन चित्र काढणं; आपल्या गावाचं, शहराचं, देशाचं, जगाचं सौंदर्य वाढवणं आणि हे करताना अस्सल सौंदर्याची जाण येणं हे घडायला हवं. इतर कोणी स्वतःचं उत्पादन ग्राहकांच्या गळी उतरवायला ‘सुंदर काय आहे’ याची व्याख्या आपल्याला सुनावू लागलं तर स्वतःची सौंदर्य दृष्टी एवढी तयार हवी की त्यातलं काय मान्य करायचं आणि काय नाकारायचं हे समजलं पाहिजे. त्वचेचा रंग उजळ करणारी प्रसाधनं खरंच सौंदर्य वाढवतात का तुम्हाला स्वतःला नाकारायला शिकवतात, याचं भान आलं तर प्रसाधनांचा फोलपणा आपल्याला समजेल. कर्नाटकातील एका खेडेगावात चित्र काढताना स्वतः सुंदर गडद तपकिरी रंगाच्या कातडीचे एक गृहस्थ चित्रातील मुलीच्या त्वचेचा रंग गुलाबी करण्याचा आग्रह धरत होते, तेव्हा मला जाणीव झाली की गोऱ्या कातडीलाच सुंदर मानणारी भारतीय मनोवृत्ती बदलण्यासाठी केवढे कष्ट घ्यायची गरज आहे. जर आपल्याला स्वतःतलंच सौंदर्य समजलं नाही तर निखळ सौंदर्यदृष्टी कुठून येणार? आणि जर सुंदर काय हेच आपण ठरवू शकलो नाही तर आपलं स्वतःचं राहिलंच काय?

आपल्यावर लादली जाणारी सौंदर्याची व्याख्या जशीच्या तशी न स्वीकारता त्यावर प्रश्न उभे करण्याची क्षमता लहानपणापासूनच निर्माण केली पाहिजे. त्यावर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कलाविष्कारासाठी खूप लहान वयापासून पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि कला खुलवण्यासाठी पुरेसा अवधी दिला पाहिजे. मोठं झाल्यावर हे करायचं राहूनच गेलं असं असमाधान वाटू नये यासाठी ही खटपट. सौंदर्यदृष्टी आणि चित्रांतून अशा दृकसंवेदना तयार झालेल्या समाजाला २५ वर्षानंतर जगातील सुंदरतेत भर घालताना बघायचं असेल तर हरतऱ्हेने प्रयत्न करायची नितांत गरज आहे.

आभा भागवत