खवले मांजर – नामशेष होण्याच्या मार्गावर !

4441

भारतात सर्वत्र वन्यजीव संवर्धनाचे प्रयत्न सुरु असतांना परिस्थिती मात्र फार बदलतांना दिसत नाही. मानव अगदी आदिम काळापासूनच शिकार करतोय मुळात त्याकाळात प्राण्यांची शिकारच मानवाचे उपजीविकेचे साधन होते, पण गेल्या काही काळापासून या शिकारीचे व्यावसायीकरण झाले व वन्यप्राण्यांच्या शिकारीला धंद्याचे स्वरूप आलं. त्याचाच परिणाम म्हणजे वन्यप्राण्यांची निसर्गातील संख्या झपाट्याने कमी झाली. भारतात वन्यजीवांना १९७२च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार संरक्षण प्राप्त झाले. पण तरीही आज अगणित वन्यजीवांची अवैध शिकार केल्या जात आहे. ज्यात वाघ, बिबटे, चितळ, सांबर, काळवीट हे आकाराने मोठे असणारे प्राणी तर आकाराने लहान असणारे विविध पक्षी, अनेक साप, पाली, सरडे, कीटक या जीवांचा समावेश आहे. असाच एक आकाराने लहान असणारा अगदी काल परवापर्यंत फार कमी लोकांना माहित असणारा खवले मांजर हा प्राणी अचानक प्रकाशझोतात आला आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर सुरु असलेली या प्राण्याच्या तस्करीने याची निसर्गातील संख्या झपाट्याने कमी झाली असून हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इंटरनॅशनल युनिअन फॉर नेचर कन्झर्वेशन या संस्थेनुसार मागील २० ते २२ वर्षात या प्राण्याची निसर्गातील संख्या ५०% कमी झाली आहे. या प्राण्याला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. विदर्भातही याची तस्करी सुरु असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. खवले मांजर या प्राण्याच्या नावात जरी मांजर असले तरी त्याचा मार्जार कुळाशी काहीही संबंध नाही.
हा प्राणी संपूर्ण विदर्भभर आढळत असला तरी चंद्रपूर पासून पुढे यांची संख्या चांगली आहे. नागपूरपासून अगदी तेलंगानापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात माझ्या लक्ष्यात आले आहे की मुळात सर्वसामान्य लोकांना या प्राण्याबद्दल फार कमी माहिती आहे. बहुतांश लोकांना तर माहित पण नाही की असा कुठला प्राणी असतो. ज्यांना या खवल्या मांजर बद्दल माहिती आहे त्यांच्या डोक्यात ना-ना तऱ्हेच्या अंधश्रद्धा घर करून बसल्या आहेत.

चीनमध्ये सर्व प्राण्याप्रमाणेच खवल्या मांजरचे तथाकथित औषधींसाठी महत्व आहेत. तर अशा प्रकारांमध्ये आपला देशही मागे नाहीच. अंगावर असलेल्या मोठ्या मोठ्या खवल्यांच्या चकत्यामुळे काहीसा विचित्र भासणारा खवले मांजर अतिशय लाजाळू स्वभावाचा असून पूर्णपणे निरुपद्रवी आहे. खवले मांजर हा एक सस्तन प्राणी आहे. विशेषतः उधळी आणि तत्सम किटकांवर आपली उपजीविका साधणारा हा प्राणी मनुष्याचा फार महत्वाचा मित्र आहे. तो उधळीच्या वारूळावर जाऊन आपल्या मजबूत नखांनी ते वारूळ फोडतो व बाहेर पडणाऱ्या उधळीवर आपल्या नळीसारख्या तोंडातून लांबलचक चिकट स्त्रवणारी जीभ काढून ताव मारतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेली या प्राण्याची तस्करी गेल्या काही वर्षात अचानक प्रकाशझोतात आली. सर्वच स्तरांवर ही अवैध तस्करी थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग आले. एव्हाना वाघ, बिबट या प्राण्यांच्या अवैध शिकार आणि तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेला विदर्भ व लगतचा प्रदेश खवल्या मांजर या प्राण्यांच्याही शिकारीसाठी टार्गेट केल्या जातोय हे वेळीच जाणून घ्यायची गरज आहे. नुकताच नागपूर जवळील शिवनी परिसरात मध्यप्रदेश च्या सीमेवर या प्राण्याचे खवले जप्त करण्यात आले होते. शिवाय सिरोंचा मध्येही वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे ८ किलो खवले जप्त केले होते. या दोन घटना तर उघडकीस आल्यात पण अशा अनेक शिकारी व तस्करीच्या घटना अगदी बेमालूमपणे घडत असतात. अतिशय जास्त प्रसिद्धी लाभलेले वन्यप्राणी सुद्धा विदर्भातून अचानक गायब होतात आणि प्रशासनाला त्याचा थांगपत्ताही नसतो हे प्रकार आता विदर्भाला काही नवीन नाहीतच. अश्यात या बिचाऱ्या खवले मांजरांचे काय होणार कुणास ठाऊक. विदर्भात चंद्रपूरच्या पुढे अगदी तेलंगाना पर्यंत या प्राण्याची शिकार अतिशय वेगाने सुरु आहे. त्यात आंतरराज्यीय व अंतराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग आहे. खवले मांजरबद्द्लच्या अनेक अंधश्रद्धा मुख्यत्वे आदिवासी समाजात पसरलेल्या आहेत जसे की, याच्या खवल्यांची अंगठी करून घातली तर मुळव्याध बरा होतो ( मुळात असल काही होत नाही हे विज्ञान सिद्ध करू शकते). याच्या खवल्यांचे व हाडांचे भस्म ओषधीयुक्त असते, त्याचे मांस खाल्ल्याने मर्दानकी वाढते इत्यादी. आणि हो खवल्या मांजराच्या मागणीतही चीन हा देशच अग्रणी आहे. भारतात होणाऱ्या बहुतांश व्यावसायिक अवैध शिकारी चीन या देशाची मागणी पुरविण्यासाठीच केल्या जातात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

अतिशय वेदनादायक पद्धतीनं होते शिकार
शिकाऱ्यांची या प्राण्याची शिकार करण्याची पद्धती अतिशय वेदनादायक आहे. जंगलात गुरे चराई करणारे व तत्सम प्रकारचे कार्य करणारे लोक या शिकारी लोकांसाठी हेराचे काम करतात. हे लोक खवल्या मांजराचे अस्तित्व असलेली ठिकाणे या शिकाऱ्यांना सांगतात. मग हे शिकारी त्या ठिकाणांवर जाऊन बिळात वास्तव्य करणाऱ्या खवले मांजराला बीळ खोदुन बाहेर काढतात. या बाहेर काढलेल्या खवल्या मांजरला दगडावर ठेऊन त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने वार करून अर्धमेला करतात. नंतर जागा मिळेल तिथे किंवा घरी जाऊन त्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकतात यावेळी तो प्राणी अर्धमेला असतो आणि त्याच स्तिथीत त्याचे खवले विरुद्ध दिशेला ओढून खेचून उपटले जातात. आतिशय वेदनादायक मृत्यू खवले मांजर या प्राण्याला देण्यात येतो. खवले मांजर चे मांस खाण्यासाठी विकलं जातं. तर त्याचेखवले समोर आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करीसाठी पाठवले जातात.

विदर्भात नव्यानेच सुरु झालेले अनेक व्याघ्रप्रकल्प व वन्यजीव अभयारण्ये पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. पण फक्त प्रकल्प प्रदेशच सुरक्षित ठेवून पर्यटनाचे ढोंग पांघरून वन्यजीवांना धोक्यात आणून फील गुडचा चश्मा घालून मिरवणाऱ्या सरकारला जाग येणार का? विदर्भात वन्यजीव संवर्धनाला सरकारचे अर्थातच वन आणि वन्यजीव विभागाचे पाठबळ मिळणार का हे येणारा काळच सांगेल.

– पराग हेमचंद्र दांडगे
– www.ratva.in