इतिहासाच्या कढीला ऊत!

IMG_3022

ब्रिटीशांच्या काळात ज्ञानाच्या भांडाराच्या किल्ल्या हातात असलेल्या ब्राम्हणांनी लिहीलेल्या इतिहासाचं पुनर्लेखन करायलाच हवं यात तसूभरही शंका नाही. पण ते पुनर्लेखन पुतळे फेकून नव्हे. पुतळ्याचं फोडाफोडीचं राजकारण ही कृती हिंसात्मकच आहे.

प्रश्न आहे तो गडकऱ्यांचा knowledge base कशाच्या आधारावर होता? पेशवाईत आणि नंतरच्या काळात लिहीलेला खोटा इतिहास हाच. फुलेंच्या काळात सनातनी लोकमान्य टिळकांनी,  चिपळूणकरांनी जातिव्यवस्थेचं, मनुवादाचं केलेलं समर्थन, संमतीवयाचा कायदा केशवपऩ, विधवा विवाह याला केलेला विरोध आणि स्त्रियांच्या दडपणूकीचं केलेलं मनूवादी समर्थन याबाबत आपण आता बोलणार की नाही?

जर ते चूकीचे आहे असं आपण मानत असू तर स्युडो (pseudo) इतिहासाचं पुनर्लेखन ही सुध्दा एक अपरिहार्य अशी ऐतिहासिक प्रक्रिया आहे.

पानसरेंनी लिहीला तसा नवा शास्त्रीय इतिहास काऊन्टर हिस्ट्री लिहीली जायलाच हवी. खरंतर स्युडो विरूध्द प्रतिक्रांती असं त्याचं स्वरूप असायला हवं.

डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीच्या पुनरूज्जीवनालाच Counter Revolution असं संबोधत,  Women and Counter revolution,  Shudras and Counter Revolution असे दोन महत्वाचे प्रदीर्घ लेख लिहीलेत. ते त्यांच्या तिसऱ्या खंडात मुळातूनच वाचायला हवेत म्हणजे ही खोट्या इतिहास लेखनाचं चलाख ब्राम्हणी तंत्र कळेल.

एक प्रश्न निर्माण होतो की  – आज जे जे लोक या कृत्याचा निषेध करतायत ते लोक बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर होते म्हणत बाबरी पाडली गेली तेंव्हा चिडीचूप का होते? तेंव्हा त्यांनी आपल्या नाटक सिनेमातून निषेध का केला नाही ?

शरद पोंक्षेजी ज्या नथूरामाला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचवता त्यांने केलेली कृती साऱ्या जगात ओळखली गेलेली अत्यंत घृणास्पद हिंसक कृती नव्हती काय? सावरकरांची सहा सोनेरी पाने लिहीली गेली.

त्या धर्मांध इतिहासाचे समर्थन कसे करू शकता तुम्ही?

पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, अखलाक, रोहित वेमुला वगैरे वगैरे घटनांच्या वेळीही हे सारे लोक सत्याच्या बाजूने उभे होते काय?

एवढेच कशाला ज्यांनी प्रत्यक्ष गडकरींचा पुतळा उखडण्याचे कृत्य केले ते तरी कोणत्या बाजूला होते? पुरूषत्तम खेडेकरांची पत्नी ही भाजप आमदार होती हे सत्य आम्हाला दिसत नाही की काय?

डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ