उत्तर प्रदेशातील शिमग्याचे मागे उरलेले कवित्व

25

देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचा शिमगा आता संपन्न झाला आहे. मात्र, प्रत्येक शिमग्यानंतर मागे उरते,  तसे या निवडणुकांच्या शिमग्याचे कवित्वही अद्याप उरलेच आहे आणि त्याचे प्रयोगही ठिकठिकाणी चालू आहेत. निवडणुका पाच राज्यांत झालेल्या असल्या, तरी सर्वाधिक महत्त्व व प्रसिद्धी मात्र उत्तर प्रदेशच घेऊन गेला. अर्थातच पाश्चिमात्य जगातील एखाद्या मोठ्या देशाच्या लोकसंख्येइतका व भूभागाइतका मोठा अजस्त्र प्रांत असलेल्या या राज्याला तितके महत्त्व मिळणे क्रमप्राप्तच आहे. कारण या एका राज्यातून लोकसभेचे 80 खासदार निवडले जातात. या राज्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. या राज्यात अशी निर्भेळ सत्ता मिळवण्याचा भाजपचा हा पहिलाच अनुभव. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात ८० पैकी ७१ जागा मिळवून लोकसभेत भाजपचा निर्विवाद विजय जणू निश्चित केला होता.

त्या घटनेला अडीच वर्षे उलटली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे मोदी लाटही ओसरली. आता उत्तर प्रदेशात भाजपचे काही खरे नाही. त्यांना तिसरे स्थान मिळवता आले, तरी पुरे, अशी भाकिते इंग्रजी वृत्तपत्रे व बहुतेक सर्व चॅनेल्स बिनदिक्कत वर्तवत होती. उत्तर प्रदेशचे `दौरे’ करुन आलेले देशातील स्वंयघोषित राजकीय पंडित व पत्रकारही छातीवर हात ठेवून समाजवादी-काँग्रेस विजयाच्या गप्पा मारत होते. काहींनी `कदाचित मायावती व भाजपला मिळून सरकार बनवण्याचा प्रयत्न करता येईल’, असेही म्हटले. ही सर्वच्या सर्व मंडळी तोंडावर आदळली व 403 पैकी 312 जागा मिळवून भाजप तीन चतुर्थांश बहुमताकडे पोहोचला. काँग्रेसचा पाला-पाचोळा झाला आणि मायावतींचा हत्ती कुठे बसला, ते कुणाला कळलेही नाही.

अशा विजयांच्या कवित्त्वात हा विजय कुणाचा, हे सांगण्याची अहमहमिका चालते. 2014 काय किंवा आता 2017 काय, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिथे ठाण ठोकून बसले होते व त्यांनी मोठ्या कौशल्याने योग्य प्यादी योग्य वेळी योग्य त्या घरांत हालवली. त्यामुळे भाजप जिंकला. पण माध्यमांना मात्र हे मान्य नव्हते. त्यांनी विजयाचे श्रेय प्रशांत किशोर या `पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट’च्या पारड्यात टाकले. तोपर्यंत हा 39 वर्षे (तेव्हा 36 वर्षे) वयाचा अमेरिकेत प्रशिक्षीत व तिथेच नोकरी करून भारतात आलेला तरुण कुणाला ठाऊकही नव्हता. पण तो भाजपच्या विजयाचा `शिल्पकार’ ठरला. सारे काही घडले,  ते केवळ आणि केवळ प्रशांत किशोरच्या बुद्धिमत्तेमुळेच अशी हाळी माध्यमांनी दिली आणि एका रात्रीत तो `हिरो’ बनला. त्याने म्हणे मोदींना `चाय पे चर्चा’ची आयडिया दिली आणि त्यामुळेच म्हणे भाजपचा विजय झाला. असो. कुणाच्या का कोंबड्याने असेना उजाडले म्हणजे झाले, असे मानून भाजपने आपल्या कामाला सुरुवातही केली.

पण प्रशांत किशोरची बाजारातील मागणी मात्र वाढली. कदाचित भाजपने त्याला उचित `भाव’ न दिल्यामुळे असेल, पण हे स्ट्रेटेजिस्ट नंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या दरबारी गेले. ते मूळचें बिहारीच असल्याने स्वत:च्या अंगणात खेळायला, बागडायला त्यांना अधिक आवडणे स्वाभाविक होते. तिथे त्यांनी नितीश कुमारना राष्ट्रीय जनता दलाच्या लालू प्रसादांबरोबर तह करून `महागटबंधन’ करण्याचा सल्ला दिला. ही खेळीही यशस्वी ठरली आणि मोदींचा विजय रथ अडवण्याचं आव्हान नितीश कुमारांनी पेलले. आता प्रशांत किशोरांचा भाव आणखी वधारला. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे निमंत्रण मिळाले. नंतर उत्तर प्रदेशाबरोबरच शेजारच्या उत्तराखंडची जबाबदारीही मिळाली. उत्तर प्रदेश हे खरे तर मोठे आव्हान असले, तरी प्रशांत किशोरना ती खेळपट्टी `ओळखीची’ वाटत होती. कारण अडीच वर्षांपूर्वीत ते तिथे खेळले होते.

उत्तर प्रदेशात प्रशांत किशोर आल्यावर आता विजय काँग्रेसचाच, अशी हाळी माध्यमांनी दिली. पण निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले असावे की, जमीन वाटते तितकी भुसभुशीत नाही. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींना सल्ला दिला की, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या सत्ताधारी समाजवादी पार्टीबरोबर निवडणूक तह करावा. तसे झालेसुद्धा. मात्र त्यापूर्वीच प्रशांत किशोरांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसचा चेहरा प्रियांका गांधी असा सिद्धान्त मांडला व त्यांनी नकार देताच दिल्लीच्या पराभूत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणले. त्यामुळे राज्यातील 11 टक्के ब्राह्मण वर्ग सुखावला खरा,  पण बहुसंख्याक मागासवर्गीय व मुसलमान दुखावले व काँग्रेसपासून पुन्हा दूर गेले, ते कायमचेच. त्याचा फटका काँग्रेसला मतदानात बसला. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याला काँग्रेसच्या बाजूने आणण्यासाठी प्रशांत किशोरांनी राहुल गांधींची महिनाभर `किसान यात्रा’ आयोजित नेली. राहुल मोठ्या गाडीवर आरुढ होऊन गावागावात फिरले. पण उपयोग झाला नाही. कारण पांढरा स्वच्छ कुर्ता व खाली जीन्स घातलेले राहुल गरीब शेतकऱ्याला `आपलेसे’ वाटलेच नाहीत. प्रचाराला ऐन सुरुवात होत असतानाचा वेळ व पक्षाची ताकद मात्र खर्ची पडली.

उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव व राहुल यांच्या एकत्रित प्रचार फेऱ्या व रोड शोंची कल्पनाही प्रशांत किशोर यांचीच. या रोड शोंना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा माणसे दिसावीत म्हणून पन्नसेक ट्रक्समधून माणसांचा पुरवठा करावा लागत होता. या मोहिमेत मनुष्यबळ व आर्थिक बळही खर्चले गेले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर त्यांनी आपल्या साहसाची कमाल केली. बनारस हा मोदींचा स्वत:चा मतदारसंघ. मोदींनी दोन दिवस हा भाग पिंजून काढला. हेतू हा की, त्यामुळे त्या भागात प्रतिसाद मिळेलच, शिवाय त्याचे कव्हरेज टीव्हीवर दिसल्याने राज्यभर उचित परिणाम होऊन शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा मोदी लाट उसळेल. तसेच झालेसुद्धा. प्रशांत किशोरांनी याच दिवशी राहुल व अखिलेश या जोडगोळीचे रोड शोसुद्धा याच शहरात ठेवले. त्यामुळे अपरिहार्यपणे तुलना होत राहिली व त्यामुळेच राहुल व त्यांची काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राहुल व त्यांच्या आई सोनिया गांधी ज्या अमेठी व रायबरेली मतदारसंघांतून निवडून येतात, त्या भागातही काँग्रेसचे उमेदवार पडले. हा त्यांच्या नेतृत्वावरील अघोषित अविश्वासच म्हणायला हवा. असंगाशी संग केल्याचा विपरित परिणाम अखिलेश व समाजवादी पार्टीलाही भोगावे लागले व ते तोंडघशी पडले. त्यांची सत्ता गेलीच शिवाय नामुष्कीही झाली.

निवडणुकांचा शिमगा संपताच राहुल गांधी दिल्लीत परतले. प्रशांत किशोरही घरी बसले. पंचाईत मात्र अखिलेश व त्यांच्या पत्नी खासदार डिम्पल यांची झाली. कारण बाहेर नामुष्कीचा शिमगा चालू असताना घरात वडिल मुलायम सिंह यांच्याकडूनही दूषणे खावी लागली असणारच. घरातला हा शिमगा आणखी बराच काळ चालू राहणार, हे नक्की. दरम्यान सोनियाजी आजारपणामुळे देशाबाहेर असल्याने राहुलही दिल्लीत एकटे पडले असणार. त्यांच्या बाजूने शिमग्याच्या शिव्यांच्या बोंबा मारायलाही कुणी नाही.

असे आहे, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर मागे उरलेले त्याचे कवित्व.

-भारतकुमार राऊत

Twitter: @BharatkumarRaut

Comments