इव्हीएमचा पर्दाफाश

15088

ईव्हीएम व्होटींग मशिन्सवरून प्रचंड गदारोळ उठलाय. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसचं सरकार असतानाही विरोधकांनी हेच आरोप केले होते. पण आपल्या लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या प्राथमिकता काळानुसार बदलतात. प्रत्येकाला कुठे न कुठे तरी सत्ता हवी आहे. काही पक्षांना ती १००% हवीय. मग सुरू होणारी साठमारी पहात बसण्याशिवाय मतदारांना गत्यंतर रहात नाही. कार्यकर्ते, पाठीराखे एकमेकावर राळ उडवत रहातात. सर्वसामान्य नागरिक मात्र हतबल होऊन जातो. पण, जेव्हांपासून EVM मशिन्स आल्या आहेत. तेव्हापासून एकच संशय व्यक्त होतो आहे. तो म्हणजे मशिन्सच्या सुरक्षितेचा. पण, तरी सद्धा एकही पक्ष त्या मशिन्स रद्द करून पुन्हा मतपत्रिकेवरच मतदान करण्याची मागणी करताना दिसत नाही. जी गोष्ट अमेरिकेने फेकून दिली आहे ती आपण का स्वीकारावी?

हरिप्रसाद नावाच्या एका ठगानं त्याच्या अमेरिकन सायंटिस्ट मित्रांच्या सहाय्यानं सिद्ध करून दाखवलं होतं की भारतीय निवडणूक आयोग वापरत असलेल्या मशिन्समध्ये सहज तांत्रिक बदल करता येतात. त्यानंतर हरिप्रसादनं जाहीरपणे एका टीव्ही चॅनेलवर मुलाखत दिली. हॅक केलेल्या त्या दोन मशिन्स दाखवल्या. त्या मशिन्सचे क्लोजप शॉर्ट्स दाखवले. त्यात त्यावरचे कोड क्रमांक स्पष्ट दिसत होते. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. निवडणूक आयोगानं क्रमांक तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या मशिन्स मुंबई कलेक्टरला निवडणूकांसाठी दिल्या होत्या. आयोगानं विचारणा केली, खुलासा मागितला. तेव्हा मुंबई कलेक्टरांनी MRA मार्ग पोलीस ठाण्यात FIR दिला.

आणि सुरू झाला या प्रकरणाचा तपास…त्यावेळी MRA पोलीस ठाण्यात मी इन्चार्ज होतो. आम्ही तपास सुरू केला. हरिप्रसादला हैद्राबादहून अटक केली. त्याची सखोल चौकशी केली. तेव्हा त्यात खूप धक्कादायक माहिती समोर आली. त्या काळात जे निवडणुकीत हरले होते त्यांनी हा विषय गदारोळ करण्यासाठी निवडला होता. कलेक्टर ऑफीस मधल्या एका उपजिल्हाधिकाऱ्यानं पदाचा गैरवापर करून या मशिन्स बाहेर काढल्या होत्या आणि त्या हरिप्रसादकडे पोहोचवल्या होत्या. हरिप्रसाद निष्णात कॉम्प्युटर इंजिनियर होता. त्यानं चॅलेंज स्वाकारलं. अमेरिकेहून मित्र बोलावले.  मशिन्स तकलादू असल्याचं सिद्ध केले. मीडियानं त्याची तारीफ केली. त्यावेळी हरिप्रसादला पाठिंबा देणारे आणि त्याचं कौतुक करणारे आज देशात सत्तेत आहेत.

आता पुन्हा तोच मुद्दा काढला जात आहे. आता मात्र संताप येतो. या परिस्थितीत मतदारांचा विचार करायला कोणीच तयार नाही. मतदान झालं की त्यांची किंमत संपली. बरं हे सगळे वादविवाद कशासाठी तर सत्तेसाठी व त्यातून मिळणाऱ्या मलिद्यांसाठी. राष्ट्र / धर्म / रयत या विषयी कोणताही पक्ष गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सत्ताधारी विरोधात गेले की गप्प बसतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांच्या जागी आले की तेच गुण दाखवतात पण जरा वेगळ्या पद्धतीनं. नाव तर प्रत्येक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांच घेतो. पण तो स्वत: किंवा त्याचा पक्ष तसं वागतो का? याचं उत्तर नाही असंच आहे. निर्दोष राज्यकर्ता या देशाला मिळण्यासाठी आणखी खूप वाट पहावी लागेल असं दिसतय.

मशिन्सचा विजय सगळ्यांना नाकारता येणार नाहीच. तो स्वीकारावाच लागेल. पण या निमित्ताने जो कांही धुरळा उडालाय तो खाली बसेपर्यंत निकोप लोकशाहीचे पोवाडे गाणाऱ्या आपण भारतीयांनी पुन्हा मतपत्रिकांकडे वळायचं का?  याचा विचार करावाच लागेल. नव्हे, हरिप्रसादनं सहजरित्या मशिन्सचा फोलपणा दाखवून दिला आहेच. तो स्वीकारून लोकशाहीचं लेणं समृद्ध करायचं का?  या प्रश्नांवर चर्चा व्हायलाच हवी.

मी काही राजकीय विश्लेषक नाही. मला कोणत्याही पक्षाबद्दल आकस नाही. एक सामान्य नागरिक म्हणून जे प्रश्न मनात उभे राहतात ते सरळपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

ता.क. – गुगलवर EVM machines tamperig असं  type करा. म्हणजे तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळेल. हरिप्रसादला अटक करून त्याचा तपास केला असल्यानचं मी जनहितासाठी याविषयावर नक्कीत अधिकारवाणीनं बोलू शकतो.

– संजीव कोकीळ, माजी पोलीस अधिकारी