आयुष्यच एक मोबाईल झालंय, धड फेकूनही मारता येत नाही

915

काही काही लोक सकाळी सकाळी उठतात. म्हणजे भल्या पहाटे खरंतर. आणि उठल्या उठल्या समोर जे काही दिसेल त्याला 1) आयुष्य २) प्रेम 3) मैत्री ४) सुख ५) दुःख 6) नाते असं सगळ्यात पहिल्यांदा जे मनात येईल ते जोडतात, मग त्याच्या बाजूने बटबटीत फुलांची पानांची आरास करतात, गुड मॉर्निंग पेस्टतात आणि देतात broadcasting ग्रुपमध्ये ढकलून. आपण कधीही रिप्लाय करत नाही, उलट गुड मॉर्निंग लिहीत नाही तरी ही मंडळी उत्साही असतात.

उदा. जर उठल्या उठल्या एखादे पिंपळाचे झाड दिसले तर मेसेज असतो –

‘जगायचे तर पिंपळाच्या पानासारखे न जगता मेंदीच्या पानासारखे जगा. मेंदीचे पान गळून पडल्यावर पण आयुष्यात रंग भरून देते.’

आता हा मेसेज आयुष्यावर झाला. आता मैत्रीवर कसा होतो बघा –

‘मैत्री/प्रेम करावी तर मेंदीच्या पानासारखी. जुनी झाली तरी रंग भरणारी. किंवा

दुःख असावं तर मेंदीच्या पानासारखं. काहीतरी चुरून काहीतरी उरून असावं.’

आता पुढचा मेसेज. सकाळी उठलेत. समजा यांची आई, बायको ताक करतीये. तर यांना लगेच सुचतं –

‘ताकात लोणी असेल तर हरकत नाही पण लोण्यात ताक नसावं. राजकारणात मैत्री असेल तर हरकत नाही. पण, मैत्रीत राजकारण नसावं. पुढे आयुष्यात दुःख असेल तर हरकत नाही. पण, दुःखाचं आयुष्य नसावं. (आँ, काय की बाई)  O:)’

आता सकाळी सकाळी कोणी कणिक मळत असेल तर हे लग्गेच म्हणतात – ‘लोखंड वितळले की औजार बनते, सोने वितळले की दागिने बनतात, पीठ नरम झाले की पोळी बनते त्याप्रमाणे माणूस नम्र झाला की नाती बनतात. किंवा मैत्री किंवा प्रेम … (हं ….. देवा!! वाचव रे बाबा !)’

समजा यांना उठल्या उठल्या मुंगी दिसली तर लिहितात –

‘मुंगी ती केवढीशी, तिचा मेंदू तो केवढासा. पण तिला कळतं कितव्या फळीवर कितवा डबा साखरेचा. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते तसा आनंद कणभर गोष्टीमध्येच असतो पण मणभर जगता आलं पाहिजे.’ (मला तर फार लॉजिक नाही लागलं! असो!)

चेकबुक समोर टेबलवर वगैरे पाहून त्यांना सुचतं –

‘जीवनाच्या बँकेत पुण्याईचा balance असेल तर सुखाचा / मैत्रीचा/ नात्याचा चेक कधीच बाउंस होत नाही. (चेक बाउंस नाही तर वकिलांचं निम्म काम कमी होईल ना!!) o.O’

यांचं प्रेम मैत्री नातं आयुष्य हे कशासारखंही असू शकतं. अक्षरशः कशासारखही. म्हणजे उदा. ‘प्रेम हे for example उठल्या उठल्या हातात घेतलेल्या टूथपेस्ट मधल्या मिठासारखं असतं. नसेल तर लग्गेच काही बिघडत नाही. पण असेल तर दातांसारखं तुमचं आयुष्य उजळून निघतं.’ (हे राम. पुन्हा झोपते. उठतच नाही पण प्लीज.) >:(

किंवा

‘मैत्री ही 27 जानेवारीला न येणाऱ्या वर्तमानपत्रासारखी असते. रोजची असते तेव्हा जाणवत नाही पण नसेल की लग्गेच कमी जाणवते.’

किंवा

‘आयुष्य हे कोवळं उन आहे पांघरून घ्या, पावसाचा ढग आहे ओढून घ्या, थंडीतलं धुकं आहे लपेटून घ्या.’ म्हणजे काय तेच जाणे!

यांचं आयुष्य चहाचा कप काय असतं, चादरीची चुरगळ काय असते, पुस्तक, इस्त्रीच्या घड्यांचा ढीग, डोस्याचं पीठ, लिक्विड सोप. काहीही असू शकतं. देवा देवा देवा! you can try it. आयुष्य हे डोस्याचं पीठ असतं. प्रमाणात आंबलं तर जाळी छान पडते आणि नाती, मैत्र्या, प्रेमं त्यात अडकून राहतात. कमी आंबलं तर त्यांना मोकळीक मिळते. आणि जास्त आंबलं तर? तर ?? तर ??? तर फार लोक अडकून राहतात मग सगळी चव जाते. सरळे !!!!! खिक्क्क!! तर मग घ्या कोणतीही वस्तू आणि करा असे मेसेज तयार. मज्जा येते.

गुड मॉर्निंगच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय दिवस, चतुर्थ्या, एकादश्या, सर्वधर्मियांचे सण, सगळे सगळे डेज अशा दिवशी तर यांचा उत्साह ओसंडून वाहत असतोच.

रोज सकाळी उठल्यावर मला वाटतं माझं आयुष्यच एक मोबाईल झालंय आणि ते धड फेकूनही मारता येत नाही च्या मारी! >

– विभावरी बिडवे