…आणि मुखवटा गळून पडला

16707

१९९९ च्या सार्वत्रिक निवडणूकांपूर्वी मी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गोरखपूरमध्ये पहिल्यांदा भेटलो. ती खरं तर या तरुण योग्याची केवळ दुसरीच निवडणूक होती, पण त्यापूर्वीच हिंदुत्वासाठी लढणारा एक कट्टर उदयोन्मुख योद्धा हा नावलौकीक त्यांनी कमावला होता. तो काळ होता ‘मवाळ’ वाजपेयी यांचा… आणि भाजप एक सर्वसमावेशक आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता, ज्यामध्ये भगवे वस्त्रधारी आणि कर्कश महंत चपखलपणे बसताना दिसताना दिसत नव्हते. मी त्यांना त्यांच्या भारतीय राजकारणातील भूमिकेबाबत विचारले आणि त्याबाबत ते अगदी स्पष्ट होतेः “ हिंदू धर्म की रक्षा”.  त्यांच्या भक्तांनी जयघोष सुरु केल्यावर ते विशेष जोर देऊन म्हणाले, “ राम मंदीर बनेगा और आयोध्यामेंही बनेगा.”  पण भाजपने तर किमान समान कार्यक्रमासाठी म्हणून राम मंदीराचा विषय सोडून दिला आहे ना, मी त्यांना विचारले. “दिल्ली में हुआ होगा, आप गोरखपूरमें है!”  हे त्यावर योगी यांचे ठाम उत्तर होते.

जवळजवळ दोन दशकांनंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी सत्ता हाती घेत असतनाच, दिल्ली दरबारातील गुळमुळीतपणा आणि गोरखपूर या ग्राऊंड झीरोवरील कट्टरता यामधील दरी पुन्हा एकदा दिसू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या दैदिप्यमान विजयानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीमधील भाजप मुख्यालयात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी दावा केला की, “ सरकार बहुमत से बनती है पर सहमत से चलती है.”  एका मुत्सदी राजकारण्याला शोभेल असेच हे विधान होते, ज्याला आधार होता त्यांची ट्रेडमार्क घोषणा असलेल्या ‘सबका साथ सबका विकास’ चा…. बरोबर एका आठवड्याने, भाजपने जेंव्हा योगींच्या हाती सत्ता सोपवली, लखनौमध्ये सुरु असलेला घोष हा जास्तच चिंताजनक बनलाः “ युपी में रहना होगा, तो योगी, योगी, कहना होगा!”

दिल्लीतील मोदी मंत्र आणि लखनौचे गोरखपूर मॉडेल यांच्यातील दरी यापेक्षा जास्त स्पष्ट असूच शकली नसतीः स्पष्ट बहुमताचा अर्थ बहुसंख्याकवाद असा तर काढण्यात आलेला नाही? राज्यातील जवळपास १८ टक्के मुसलामान लोकसंख्येचा विचारच झालेला नाही? उत्तरप्रदेशमध्ये भाजपला मिळालेला निर्णायक जनादेश हा प्राथमिकरित्या ब्रॅंड मोदीभवती उभारण्यात आला होताः ‘विकास’ आणि आशेचे वचन देणारे खंबीर नेतृत्व म्हणून आज या ब्रॅंडकडे पाहिले जाते. (‘न्यू इंडिया’ किंवा इंडिया २०२२ या शब्दाची सध्या चलती आहे). आशा निर्माण करणारा हाच तो संदेश होता  (‘अच्छे दिन’ विसरु नका), ज्याने मोदींच्या रथाला वेग आला. एकाच पठडीत चालणाऱ्या निरर्थक कामकाजाला आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला कंटाळल्यांसाठी तो एक महत्त्वाचा संदेश होते. पण, उत्तर प्रदेशच्या लोकांचे हे मत केवळ ‘परिवर्तनासाठीच’ नव्हते. तर त्यातून प्रतित झाली आहे ती अल्पसंख्याक विरोधी हिंदुत्व मानसिकता ज्या रीतीने पंतप्रधानांनी ‘शमशान-कबरस्तान’ या तुलनेचा वापर केला किंवा अमित शहा यांनी आपल्या विरोधकांचे वर्णन करताना ‘कसाब’ या शब्दाची निवड केली. निश्चितपणे, बसप आणि काँग्रेस-सपा आघाडी ही अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत पोहचत असताना, दुसरीकडे हिंदूंचे निश्चित असे प्रति-ध्रुविकरण सुरु होतेः तीन जाती (यादव, मुस्लिम, जाटव) विरुद्ध व्यापक हिंदू एकत्रिकरण. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून झालेली निवड म्हणजे, विकासाच्या वचनाचा मुखवटा धारण केलेल्या काळ्याकुट्ट वास्तवाला दिलेली अधिकृत मान्यताच आहे. जर विकास ‘लॉग-इन’ असेल, तर हिंदुत्व हा त्याचा ‘पासवर्ड’ होता, एक अशी लबाडी जी आता उघड झाली आहे.

सर्वांना समान संधी मिळेल अशा ‘न्यू इंडिया’ची उभारणी करण्याची इच्छा असलेला नेता, हे मोदी यांचे ब्रॅंड अपील… त्याचे आता काय होईल? अशी अफवा आहे की – आणि अर्थातच हे सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नाही – मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधानांची पहिली पसंती होती ती मनोज सिन्हा यांना… केंद्रीय मंत्री असलेल्या सिन्हा यांनी केंद्रात एक प्रभावी प्रशासक म्हणून चुणूक दाखवून दिली आहे आणि ते संभाव्यरित्या अधिक सहमती असलेली व्यक्ती होते. पण पंतप्रधानांचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धुडकावल्याची चर्चा आहे. कारण विधानसभेत मिळालेले प्रचंड बहुमत म्हणजे हिंदुत्वाची ओळख पुन्हा भक्कम करण्याचीच संधी म्हणून संघ या यशाकडे पहात होताः ३०० पेक्षा जास्त आमदार असूनही जर पक्ष आपली वैचारीक खासियत टिकवून ठेवणार नसेल, तर मग कधी टिकवून ठेवणार? उत्तर प्रदेशात भाजप-संघ कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या योगी आदित्यनाथांपेक्षा या वैचारीकतेचे प्रतिनिधित्व अधिक चांगले कोण करेल? कदाचित, मोदी-आदित्यनाथ हे द्वैत संघ परिवाराच्या नेतृत्वासाठी अनुरुप आहेः दिल्लीत असा नेते ठेवा जो सर्वसमावेशक वाढीची भाषा बोलतो, तर लखनौमध्ये जमावाच्या भावना भडकविणाऱ्या नेत्यावर लक्ष केंद्रीत करा, जो हिंदुत्वाची विचारधारा चेतवत ठेवेल.

आणि तरीही, योगींची निवड करुन, संघाने संभाव्य मोठा धोका पत्करला आहे, मात्र तरीही ही एक समजून उमजून खेळलेली खेळी आहे. आदित्यनाथ यांची उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे अधिकृत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तासाभरातच मोदी मुंबईत सुरु असलेल्या इंडीया टुडे कॉनक्लेवमध्ये व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करणार होते. अतिशय नीटनेटका कुर्ता-जॅकेट घालून आलेले मोदी, हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला साजेशा अधिकारवाणीने, त्यांच्या सरकारने मिळविलेल्या यशाची आकडेवारी सादर करत होते. प्रेक्षकही विस्मयचकीत झाल्याचे वाटत होते, वेळोवेळी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसादही देत होतेः शेवटी हे मुंबईतील अभिजन आणि मध्यमवर्गीय व्यावसायिक होते, ज्यांच्यासाठी मोदी हे एक ‘आयकॉनिक फिगर’ होते. त्यामुळे जेंव्हा हे प्रेक्षक कॉनक्लेवमधून बाहेर पडले, तेंव्हा ते अजूनही मोदी फिवरमध्येच अडकले असतील, हेच मला अपेक्षित होते. आणि तरीही, मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एकाने मला विचारलेला पहिलाच प्रश्न होताः “मोदी यांनी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी का निवड केली असेल, सांगू शकाल?” मी एकही शब्द बोलण्यापूर्वीच आणखी एका प्रसिद्ध मुंबईकर आमच्या चर्चेत सहभागी झाला. “ ही मोठीच चूक आहे, जेंव्हा आम्ही मोदींना मत दिले, तेंव्हा आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.”

ही अर्थातच, काही मतं झाली… भाजपचा मुख्य मतदार मात्र खुषीत आहेः लखनौच्या सिंहासनावर हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कट्टर कैवाऱ्याला बसवून, पक्षाने शेवटी ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. पण लक्षात ठेवा, २०१४ ची निवडणूक मोदी जिंकले ती पक्षाच्या मूळ हिंदू मतपेढीच्या कितीतरी पुढे जाऊन… २००२ नंतरच्या हिंदू नायक/खलनायक प्रतिमेपासून दूर जात चांगल्या शासनाचे रोल मॉडेल तयार करणे, हा प्रवास हा नविन तरुण मतदारांपर्यंत पोहचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. या महत्वाकांक्षी मतदाराला २००२ च्या गुजरात दंगलीची कुठलीच आठवण नव्हती, पण आदित्यनाथ यांच्यासारख्यांच्या प्रक्षोभक भाषेबद्दल मात्र त्यांच्या मनात भीती आहे. त्यांना नोकरी, विकास, कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे, लव-जिहादची फुटीरतावादी भाषा किंवा अल्पसंख्यांकांविरोधातील द्वेषाची मोहिम नको आहे. आदित्यनाथ यांना भारतातील सर्वात महत्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री केल्याने, भूतकाळातील भुते पुन्हा जिवंत झाली आहेत. हा खरोखरच भविष्यातील पक्ष आहे का? की अशी राजवट आहे जी बहुसंख्यांकांच्या उर्मीमुळे भूतकाळातील वैराचे हिशोब चुकते करण्याच्या आणि हिंदू राष्ट्र उभारण्याच्या दिशेने जात आहे?  मोदी हा एक ‘मुखवटा’ आहे का?  की एक प्रामाणिक प्रचारक जो नागपूरचा नकाराधिकार मान्य करेल? की ते खरोखरच प्रगतीशील पंतप्रधान आहेत जे राजकीय हिंदुत्वाचा नव्याने शोध घेऊ शकतील, एक असे आदर्श हिंदुत्व जे यथार्थपणे बहुविविधता मानणारे आहे, भेदभावरहीत आहे? सध्या तरी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

ता.कः आदित्यनाथ यांना मिळालेल्या बढतीनंतर, योगी यांचा वादग्रस्त भूतकाळ दाखविणारे अनेक व्हिडीओ आले. एका व्हिडीओमध्ये, ते युवा वाहिनीच्या व्यासपीठावरुन असा इशारा देताना दिसून आले की जर एका हिंदू मुलीचे अपहरण झाले तर शंभर मुस्लिम मुली पळवल्या जातील. मार्च २०१५ च्या आणखी एका व्हिडीओमध्ये ते व्यासपीठावर एक भाषण लक्षपूर्वक ऐकताना दिसत होते, ज्यामध्ये वक्ता मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याची मागणी करत होता आणि अगदी कबरीमधून बाहेर काढून मृत मुसलमान मुलींवर बलात्कार करण्यास सांगत होता. योगी यांनी यावर नापसंतीचा एक शब्दही काढला नाही (किमान मला तरी काहीच दिसले नाही).

योगींनी आतापर्यंत सलग पाच वेळा निवडणूक जिंकली असल्याकडे त्यांचे समर्थक लक्ष वेधतात, पण ते ही गोष्ट विसरतात की निवडणूकीतील विजय हे द्वेषयुक्त भाषणांना योग्य ठरवू शकत नाहीत. ते असंही म्हणतात की भविष्यात ते उत्तर प्रदेशमध्ये कसे शासन देतात यावरुन त्यांचे मुल्यमापन व्हावे, ना की त्यांचा भूतकाळ उकरुन… हो, आदित्यनाथ यांना आपल्या सगळ्यांना चूकीचे ठरविण्याची एक संधी दिली पाहिजे, त्याचवेळी घटनात्मक नितिमत्ता आणि कायद्याचा अवमान या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत मान्य केल्या जाणार नाहीत हे सत्य योगी आणि त्यांच्या लोकांना स्वीकारावेच लागेल. मुख्यमंत्री झाल्याने हे सत्य बदलणार नाही की भारताच्या अतिशय गुंतगुंतीच्या आणि दाटलोकवस्ती असलेल्या राज्याचे नेतृत्व अशा एका माणसाच्या हाती गेले आहे, ज्याची संपूर्ण कारकिर्दी ही निर्लज्ज जातीयवादावर उभारलेली आहे.

  • राजदीप सरदेसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here