अभाविपच्या हिंसक राडेबाजीचा अन्वयार्थ

1336

दिल्ली विद्यापीठ ते हैद्राबाद विद्यापीठ, हरियाणा विद्यापीठ ते जाधवपूर विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एफटीआयआय ते झारखंड विद्यापीठ,  किरोरिमल महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालय अशा  देशातील विविध ठिकाणी कॅम्पसवर कार्यक्रम बंद पाडणे किंवा हिंसक राडेबाजी करण्यामुळे अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ) चर्चेत आहे. दिल्लीत रामजस महाविद्यालयात झालेला प्रकार सगळ्यात अलीकडचा. 2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. असे प्रकार सुनियोजित वाटावेत इतक्या सातत्याने घडत आहे. केंद्रातील मंत्री देखील वेळोवेळी अभाविप ची री ओढताना दिसतात.

बंडारु दत्तात्रय यांनी रोहित वेमुला प्रकरणात केलेला हस्तक्षेप असो किंवा राजनाथ सिंह यांनी कन्हैय्या कुमार आणि आता किरेन रिजिजू यांनी गुरमेहर कौर संदर्भात केलेले विधान असो, यातून अजेंडा उच्चपातळीवर निश्चित झाला असल्याच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. या अजेंड्याचे स्वरूप पाहिल्यावर अभाविपच्या हिंसक राडेबाजीचा अन्वयार्थ कळू शकतो.

ज्या गोष्टींना अभाविप विरोध करत आलेली आहे, त्यावरून अभाविप कोणत्या प्रकारच्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करते हे लक्षात येते. काही वर्षांपूर्वी अभाविपच्या विरोधामुळे दिल्ली विद्यापीठाने ए के रामानुजन यांच्या ‘थ्री हंड्रेड रामायणाज’ हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले.  भारतीय उपखंडात वाल्मिकी रामायणा व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारे रामायणाची कथा सांगितली जाते. मौखिक परंपरेतील हे सत्य अभाविप (आणि अर्थात संघपरीवार) कडून नाकारले जाते. उच्चवर्णीय परंपरा आणि संस्कृती लादण्याचा हा प्रयत्न आहे. यालाच हिंदुत्ववाद म्हणतात. हिंदू धर्मांतर्गत आणि धर्मबाह्य सर्व प्रवाहांनी ‘हिंदुत्ववाद’ या प्रवाहाशी ‘समरस’ व्हावे असा यांचा दुराग्रह आहे. त्यासाठी जी मांडणी केली जाते त्याला ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ म्हटले जाते. हा सांस्कृतीक राष्ट्रवाद ‘ऐक्याची’ भाषा करतो. पण हे ऐक्य हिंदू धर्मियांचे अपेक्षित आहे.

म्हणूनच परिवाराची भारतमाता ही तिरंगा न पकडता भगवा झेंडा पकडणारी आहे. असे धार्मिक ऐक्य निर्माण करण्यासाठी अल्पसंख्यांकांविरोधात द्वेषभावना निर्माण करण्याचा मार्ग अवलंबिला गेला आहे . यातूनच ‘बाबरी मशीद’ पाडली गेली. आनंद पटवर्धन यांची ‘राम के नाम’ ही डॉक्युमेंटरी त्यावर नेमका प्रकाश टाकते. पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात ही डॉक्युमेंटरी दाखवणार होते. तर अभाविपने राडेबाजीची धमकी दिल्यामुळे ऐनवेळी महाविद्यालयाने कार्यक्रम रद्द केला.  दिल्लीतील किरोरीमल कॉलेजमध्ये नकुल सिंग स्वाहनी यांची ‘ मुझ्झफरनगर अभी बाकी है’ ही डॉक्युमेंटरी दाखवली जात असताना त्या कार्यक्रमात अभाविपने राडेबाजी केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगर मध्ये जाट-मुस्लिम दंगली झाल्या. हा असा प्रदेश आहे जिथे फाळणी नंतर ही दंगली झाल्या नव्हत्या. या भागात प्रभावी असणाऱ्या ‘भारतीय किसान युनियन’ मध्ये एकाच वेळी ‘हर हर महादेव’ आणि ‘अल्लाहु अकबर’ घोषणा दिल्या जायच्या. पण भाजपच्या अमित शहा, संगीत सोम आदी मंडळींनी धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी विद्वेषी भाषणे करून वातावरण कसे पेटवून दिले याचे पुरावेच या डॉक्युमेंटरीमध्ये आहेत. त्यामुळेच हिंदु ऐक्यासाठी देशाचे ऐक्य सुळावर लावणाऱ्या ‘हिंदुत्ववादी राष्ट्रवादाचे’ भीषण सत्य समोर येऊ नये यासाठी अभाविप कॅम्पस वरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मान मुरगळताना दिसते. हा ‘हिंदुत्ववादी राष्ट्रवाद’ त्यामुळेच लोकशाही मूल्यांशी प्रतारणा करणारा आहे.

त्यांच्या कश्मीर आणि नक्षलवादग्रस्त आदिवासी संदर्भातल्या भूमिकेतून लोकशाही विरोध अधोरखीत होतो. कश्मीर प्रश्न जसा पाकपुरुस्कृत दहशतवादाशी , सक्तीने विस्थापित केलेल्या पंडितांशी संबंधित आहे, तसाच तो आफस्पा (आर्मड फोर्सेस स्पेशल पावर ऍक्ट) या विशेष कायद्याच्या संरक्षणामुळे लष्कराच्या काही घटकांकडून अन्यायकारक वर्तन झाल्यामुळे काश्मिरी नागरिकांमधे असणाऱ्या असंतोषाशी पण संबंधित आहे. काश्मिर मधील मुस्लिम बांधव हे परके नसून आपलेच नागरिक आहेत ही वस्तुस्थिती स्वीकारली तर त्यांच्या व्यथा मांडणाऱ्या गोष्टींची आपण आवर्जून दखल घेऊ. संजय काक यांची ‘जश्न ए आझादी’ ही डॉक्युमेंटरी अशीच व्यथा मांडणारी. ही डॉक्युमेंटरी पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज मध्ये दाखवणार होते. पण तिथेही अभावीपने संयोजकांना कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. एकही जवान बेकायदेशीर गोष्टी करू शकत नाही. ते तसे करतात असे म्हणणे म्हणजे देशद्रोही कृत्य अशी अभाविप ने व्याख्या केली आहे. सर्वोच न्यायालयाने नियुक्त केलेल्या संतोष हेगडे समितीने आफस्पा चा गैरवापर लष्कराच्या काही घटकांकडून होतो हे मान्य केले आहे. लोकशाहीमध्ये कोणतीही संस्था ही चौकशीपासून मुक्त नसते. प्रत्येक संस्था ही उत्तरदायी असते / असावी. त्याला लष्कर ही अपवाद नाही.

याचप्रमाणे नक्षलग्रस्त भागातील अनायग्रस्त आदिवासींची बाजू तुम्ही मांडत असाल तर म्हणजे तुम्ही नक्षलवादी आहात असा अपप्रचार अभावीप करते. हरियाणा केंद्रीय विद्यापीठात महाश्वेता देवी लिखित ‘ द्रौपदी’ या कथेवर आधरित नाटकाच्या प्रयोगाला अभाविप ने विरोध केला. यातील ‘द्रौपदी /दोपडी’ या आदिवासी महिलेवर नक्षलवादी म्हणत पोलिसांकडून अत्याचार होतो असे दाखविले आहे. नक्षलवाद हे सर्वात मोठे अंतर्गत सुरक्षा आव्हान आहे. त्याचा बिमोड हा झालाच पाहिजे .पण त्यात निष्पाप आदिवासी होरपळणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. हे मान्य न करणारा अभाविपचा राष्ट्रवाद हा संकुचित ,लोकशाही विरोधी आहे यात शंका नाही.

आपली संकुचित विचारधारा दिसू नये आणि ती लादताही यावी यासाठी दोन पातळ्यांवर अभाविप प्रयत्न करते. एक म्हणजे आपणच देशभक्त आहोत हे तिरंगा मार्च काढत किंवा ‘भारत माता कि जय’ म्हणत दाखविणे. आणि दुसरं म्हणजे यांच्या विचारधारेला विरोध करणाऱ्याला सरसकट ‘काश्मीरचा आझादी’ समर्थक किंवा देशद्रोही किंवा नक्षलवादी ठरविणे. यालाच मॅककार्थीजम असे म्हणतात. 50 च्या दशकात अमेरिकेत राजकीय विरोधकाला नामोहरम करण्यासाठी त्याच्या देशप्रेमावर शंका घेत, कम्युनिस्ट असल्याचा पुराव्याशिवाय आरोप करत छळ केला जायचा. हीच पद्धत अभावीप वापरत आहे. कन्हैय्या कुमारला अशाच प्रकारे देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न अभाविप ने केला. अशाच प्रकारे देशद्रोही/ नक्षलवादी म्हणत अभाविप ने पत्रकार सिद्धार्थ वरदराजन यांचा अलाहाबाद विद्यापीठात कार्यक्रम होऊ दिला नाही. तर जाधवपूर विद्यापिठात जेएनयूच्या प्राध्यापक निवेदिता मेनन यांचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्यावर बेसलेस आरोप करून एफआयआर दाखल केला. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकाची मुलगी गुरमेहर कौरने अभावीपला विरोध केला तेव्हा तिला देशद्रोही ठरवत बलात्काराची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

एकूणच हिंसा, राडेबाजी, धमकी, देशद्रोहाचा आरोप करणे अशा वाटेने कॅम्पसवर भितीचे व द्वेषाचे वातावरण तयार करणे आणि आपली संकुचित हिंदुत्ववादी विचारधारा लादणे हा अभावीपचा अजेंडा आहे हे स्पष्ट दिसते. आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे हा अजेंडा निर्भयपणे आक्रमक व हिंसक झाला आहे.

 

भाऊसाहेब आजबे

([email protected])