अभाविपः सांस्कृतिक दहशतवादाची सूत्रधार

323

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रकरणानंतर देशभरात सांस्कृतिक दहशतवाद वेगाने वाढताना दिसत आहे. फिल्म ॲन्ड टेलिविजन इन्स्टिट्युटमधील नेमणुकीवरुन  झालेला गदारोळ असो वा रानडे इन्स्टिट्युटमध्ये जीवे मारण्याची अभाविपने दिलेली धमकी असो, अभाविप या सांस्कृतिक दहशतवादाची सूत्रधार आहे. मागील वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्वनिर्धारित वादंग निर्माण करण्यात आले. आलोक सिंग हा जेएनयू विद्यापीठातील अभाविपचा प्रमुख. परवानगीविना तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये सभा घेऊ लागला. इतर कुठल्याच संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी न देणारं कॉलेज हा कार्यक्रम कसा काय घडू देत आहे, अशी विचारणा करत आंबेडकरवादी विद्यार्थी कार्यक्रम स्थळी पोहोचले. अभाविप कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू सुजात आंबेडकर याला धक्काबुक्की केली. इतरांनाही धमकावलं. संविधानाचा उदघोष करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. त्याच रात्री डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने प्राचार्यांना आंबेडकरवादी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, असं पत्रच लिहायला लावलं. घडलेल्या घटनेचे सारे व्हिडीओ माध्यमांमध्ये उपलब्ध होते, त्यामुळे अगदी दुसऱ्याच दिवशी प्राचार्यांना माफी मागत पत्र मागं घ्यावं लागलं. घडलेल्या घटनेचे स्वच्छ स्पष्ट पुरावे असतानाही डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा प्रकारचं पत्र डेक्कन पोलीस स्टेशनला देण्याचं धाडस करते. जेएनयुमध्ये तर माध्यमंच खोटा व्हिडीओ तयार करण्यात सामील होती. रोहित वेमुला प्रकरणात स्मृती इराणी संसदेत खोटं बोलल्या.

नुकतंच रामजस कॉलेजमध्ये अभाविपनं विद्यार्थ्यांना, पत्रकारांना, प्राध्यापकांना मारहाण केली त्यांनी उमर खालिद आणि शेहला रशीद यांना कार्यक्रमाला बोलावलं म्हणून. गुरमेहेर कौर या मुलीनं मी अभाविपला घाबरत नाही, मी एकटी नाही, माझ्यामागे देशातील प्रत्येक विद्यार्थी आहे, असं पोस्टर हातात घेतलं तर तिला  बलात्काराच्या धमक्या आल्या.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एसएफआयच्या कार्यकर्त्यांना अभाविपने मारहाण केली ती प्रशांत परिचारकांचा निषेध करणा-या पोस्टरवरुन. परिचारकांनी सैनिकांचा अपमान केलेले अभाविप सहन करते मात्र हरियाणा सेंट्रल युनिवर्सिटीने ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवींच्या द्रौपदी लघुकथेवर बसवलेल्या नाटकातून सैनिकांचा अपमान होतो, असे सांगत ते नाटक बंद पाडते ! रामजस कॉलेजमध्ये दोन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये काश्मिरी पंडितांवर चर्चाही आयोजित केलेली होती. अभाविपच्या हल्ल्यामुळे तो कार्यक्रमही रद्द करावा लागल. मुळात आपला विचार काय आहे, याविषयी अभाविपच्या मनातही संभ्रम असल्याचंच अनेकदा दिसून येतं.

या नि अशा साऱ्या घटनामालिकेतून शैक्षणिक कॅम्पस हे ज्ञानाचं केंद्र न राहता, मारामारी,स्टंटबाजी याचंच ठिकाण बनत चाललं आहे. शैक्षणिक कॅम्पसवर वाद व्हायलाच हवेत; पण वाद घालण्याची ही काही पध्दत नव्हे. वाद घालण्याची आपल्याला मोठी परंपरा आहे. ‘आर्ग्युमेन्टेटीव इंडियन’ या पुस्तकात अमर्त्य सेन यांनी भारतीयांच्या या व्यवच्छेदक वैशिष्ट्यांची आठवण करुन दिली आहे. वाद-प्रतिवाद-संवाद ही प्रक्रिया विद्यापीठात होणं अपेक्षित आहे. यातून विद्यार्थी स्वतः स्वतंत्रपणे विचार करु शकतील, असं मंथन घडायला हवं. आपला विचार दुसऱ्याला पटत नसेल तर सोशल मिडीयावर ट्रोल करणं ( उदा. गुरमेहर कौरला ट्रोल केलं गेलं), न पटणारे विचार प्रत्यक्षात  व्यक्त केले तर धमकावणं ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एसएफआयच्या विद्यार्थ्यांना मारहाण) आणि न पटणारे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले जात असतील  तर थेट खूनच करणं ( दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी) असे टप्पे दिसताहेत. मी भलेही तुझ्या मतासोबत सहमत नसेन; पण तुझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य तुला मिळावं म्हणून मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन, असं म्हणणारा व्हॉल्टेअर संदर्भहीन वाटावा, इतकी असहिष्णुता निर्माण झाली आहे. हिंसा वाढते आहे आणि काळजीची बाब म्हणजे तिला मान्यता मिळते आहे. हिंसेचे सार्वत्रिकीकरण आणि तिचे अधिमान्य स्वरुप इथला आरोग्यदायी चर्चाविमर्श पोखरुन काढत आहे.

छोट्या-मोठ्या घटनांना हिंसक वळण लागत असतानाच येत्या शैक्षणिक वर्षात कॉलेजात निवडणुका सुरु होणार आहेत. निवडणुका घेणं ही लोकशाहीसाठी आणि एकूणच आपल्या राजकीय प्रक्रियेसाठी आवश्यक, पोषक अशी गोष्ट आहे; मात्र इथे प्रशासनाची कर्तव्यदक्ष, तटस्थ अशी भूमिका गृहीत धरली आहे. रामजस कॉलेजमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण झाली आहे किंवा पटियाला कोर्टात कन्हैय्याला झालेली मारहाण लक्षात घेता तटस्थ प्रशासन कितपत ‘तटस्थ’ असेल, याविषयी शंकाच आहे.

अर्थात कॉलेजमधील निवडणुकांमुळे राजकीय सामाजिकीकरणाच्या पद्धतीत, संस्कृतीत बदल होऊ शकतो. समाज आणि सत्तास्थान यांच्यात असलेली दरी निवडणुकांमुळे कमी होऊ शकते नि जनतेचे खरे प्रतिनिधीत्व करणारे नेतृत्व उदयाला येऊ शकते. त्याचे काही ऐतिहासिक दाखलेही देता येतील ;मात्र या निवडणुका व्हायला हव्यात निरोगी वातावरणात.

या सा-या प्रक्रियेत संवादाचे बोट आपण सोडायला नको. दिल्ली विद्यापीठातील घटनेनंतर तिथं शिकवणारे प्राध्यापक अपूर्वानंद यांनी ‘अभाविप’मधील विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिलं त्यात ते म्हणतात-

कर्मठतावाद्यांचा संवादावर विश्वास नसतो. तुमच्यापेक्षा वेगळं मत असणा-या व्यक्तींना भेटणं, त्यांच्यासोबत राहणं तुम्हाला तुमच्या मानवतेबाबत आश्वस्त करतं. खरंतर राष्ट्र म्हणजे असा अथक अनंत संवादच असतो. हा संवाद संपतो तेव्हा राष्ट्रांची वाढच खुंटते !

पुढं ते म्हणतात-

विद्यार्थांनी या प्रकारे वागू नये. तुमच्या विचारांवर तुम्ही विश्वास ठेवा. विचारांना विचारांनी उत्तर द्या. दोन परस्पर विरोधी विचारांचं मंथन होऊ द्या. तुम्ही विचारांचा विरोध हिंसेने कराल, तर तुमचा पराभव अटळ आहे.

जर हिंसेने उत्तर देणे सुरु झाले तर केवळ अभाविपचाच नव्हे तर आपणा सर्वांचा तो सामूहिक पराभव असेल.

तो टाळायचा असेल तर आपल्याला अधिक सहिष्णू होत निरोगी संवादाची प्रक्रिया सुकर व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागतील.

-श्रीरंजन आवटे.