अधुरी एक कहाणी

image

मी महाराष्ट्र नामक एका नंदनवनात फिरत होते.  सगळीकडे  चकचकित रस्ते होते. गगनचुंबी इमारती होत्या. मोठमोठ्या गाड्या भरधाव वेगाने धावत होत्या. प्रशस्त मॉल भरभरून  वाहत होते. रंगीबेरंगीबेरंगी वस्तू मोठ्या कल्पतेने लावलेल्या  दिसत होत्या.  कुठेही गडबड  नाही, गोधंळ नाही, लाईन नाही, क्यू नाही, सगळेजण आनंदाने बागडत होते. मस्तीत होते.  रुपयांचा खणखणाट नाही सगळकडे प्लास्टिकला बंदी आणि वर सुबक प्लास्टिक करन्सीचा मात्र सूळसुळाट !

मी म्हटले हे पेपरवाले आणि चॅनेलवाले खोट्या बातम्या देत असावेत.  कुणीच आत्महत्या  करत नव्हते. पाण्याचा  प्रश्न  नव्हता.  अन्नधान्य  भरपूर होते.  पण, एका बातमीची मात्र चर्चा होती पर्रिकरांनंतर संरक्षण मंत्री कोण?

मला पुढे समजले की आपले उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मानकरी  देवेंद्रभाऊ याना म्हणे दिल्लीत आवतन येणार आहे. लई वंगाळ वाटल बघा.  आता आम्ही स्वच्छह स्वच्ह म्हणून कुणाकडे बघावे ? सर्फ आणि एरियलपेक्षाही स्वच्ह माणूस कुठून आणायचे ? बर यांना  संरक्षणमंत्री  केले तर आमच्या  अमृतावहिनीने काय करायचे ?  त्या माउलीने  काय करावे ? इथेले बॉलीवूड, फॅशन सोडून त्या तिकडे समाजाची सेवा तरी कशी काय करतील ?  बँकेच्या कामात दिवसभर कसातरी जीव गुंतवला माउलीने तरी संध्याकाळ खायला उठेल त्याचे काय?  अमिताभ काय दिल्लीला राहत नाही म्हणे. नजर  लागली बघा वहिनींच्या यशाला !

अजुन पुढे बातमी मिळाली. प्रसिद्धीविनायक विनोद तावडे यांना केंद्रात गृहमंत्री करणार. एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू असे झाले. कारण निवडणुकीच्या आधी बीड इथल्या जाहीर सभेत तावडेसाहेब म्हणाले होते, “मी आता गृहमंत्री होणार आहे, मग एकेकाला बघून घेतो.” पण फडणविसांनी गृहमंत्रीपद स्वत:कडे घेऊन ठेवले आणि त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. आता त्यांना थेट दिल्लीतच गृहमंत्री करणार याचा आनंदच आहे. आता पोलिसांनाही त्यांच्या बिल्यामध्ये तावडेचे फोटो लावावे लागतील आणि जेव्हाजेव्हा ते शोध मोहीमांवर जातील तेव्हा त्यांना पहिले सेल्फी काढून अपलोड करावे लागतील. तावडेसाहेब दिल्लीत गेल्यामुळे महाराष्ट्रातील वृत्तपत्रंना त्यांच्या दररोज छापल्या जाणाऱ्या छबीला मुकावे लागणार आहे. आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या ५-१० पी.आर. एजन्सींना बेकार व्हावे लागणार आहे. त्यांनी म्हणे नेहमीचे गुलाबी, निळ्या, हिरव्या रंगाच्या जॅकेटचा रंग बदलायचे ठरवले असून आता ते खाकी रंगाचे नवीन जॅकेट शिवायची ऑर्डर दिली आहे.

या सगळ्या गडबडीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण येणार याविषयी कोणी बोलत नाही. मी आत डोकावले तेव्हा समझले. दिल्लीच्या अमित भाईंच्या पत्नीचे राखीबंधू असलेले कोल्हापूरचे गडी चंद्रकांतदादांची गाडी लय जोरात आहे. या सगळ्या बातम्यांमुळे माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. की अमृतावहिनीनी ज्या फॅशन डिझायनरला पुढच्या वर्षभराची वेगवेगळ्या ड्रेसेसची ऑर्डर दिली असेल त्याचे काय होईल? आता त्यांना खादीची साडी घालून लष्करातील जवानांसमोर “ए मेरे वतन के लोगो” हे गाणे सादर करावे लागेल. केवढी कोंडी मराठी टॅलेंटची !

तेवढ्यातच, एक कर्णकर्कश बेल वाजली. मी दचकून उठले  आणि दार उघडले. दारात दुधवाला उभा होता. मी त्याच्याकडे न बघता दुधाच्या पिशव्या हातात घेतल्या, खाडकन दार लावले आणि मनात पुटपुटले “मेरा सुंदर सपना टूट गया.”

श्रद्धा  बेलसरे-खारकर