गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी झेडपी कार्यालयावर धडक

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी झेडपी कार्यालयावर धडक

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीचा शासकीय निर्णय तातडीने घेण्यात यावा. या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन हजार आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. या आशा स्वयंसेविकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्यां ना देण्यात आले होते. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविका यांचा संप असाच सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.
आरोग्या संबंधित तळागळातील सर्व कामं ही आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक करतात. तरीही आशा स्वयंसेविकांना कामावर आधारीत मोबदला धरून सध्या 3000 रुपये सरासरी दरमहा मानधन मिळते, तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून 8725 रुपये मिळतात. गटप्रवर्तक व आशा अंगणवाडी सेविका यांना मिळणारे हे मानधन अत्यंत अल्प आहे.
गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, गटप्रवर्तक आशा स्वयंसेवकांना मिळणारे मानधन हे दारिद्य्ररेषेखालील व किमान वेतनाखालील असून, त्यांना वेठबिगारासारखे वागविले जाते. प्रवर्तक, आशा स्वयंसेवकांना शासकीय सेवेत कायम करेपर्यंत अंगणवाडी सेविके एवढे तरी मानधन मिळाले पाहिजे.
तसंच काही राज्यात दहा हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ही 10,000 रुपये मानधन मिळावे अशी मागणी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमार्फत या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आजवर सरकार व आरोग्य विभागाकडून केवळ आश्वासनेच मिळाली असून कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचा संप कायम राहणार असल्याचा इशाराही या धडक मोर्चाच्या माध्यमातून दिला आहे.

प्रमुख मागण्या:-

1.गटप्रवर्तक व आशा वर्कर्स शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.
2.स्वतंत्रपणे प्रवास भत्ता देण्यात यावा.
3.आशा वर्कर्सचा कामावर आधारित मोबदला दुपटीने वाढवून देण्यात यावा.
4.जनश्री विमा योजना लागू करण्यात यावे
5.पल्स पोलिओ च्या कामाचे दर दुपटीने वाढविण्यात यावे
6. बीपीएल व जेएसवाय च्या कामाच्या मोबदल्यात समानता आणावी. आदींसह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्यअधिकारी यांना देण्यात आले.