Home News Update सिंचन तेलंगणाचं नुकसान महाराष्ट्राचं !

सिंचन तेलंगणाचं नुकसान महाराष्ट्राचं !

Support MaxMaharashtra

गडचिरोली जिल्ह्यात नागरीकांच्या विरोधानंतरही तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारनं बहुचर्चित मेडिगड्डा कालेश्वरम या प्रकल्प बांधला. नागरिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे दुष्परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे.

सिंचन तेलंगणाचं नुकसान महाराष्ट्राचं !

सिंचन तेलंगणाचं नुकसान महाराष्ट्राचं !गडचिरोली जिल्ह्यात नागरीकांच्या विरोधानंतरही तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारनं बहुचर्चित मेडिगड्डा कालेश्वर हे धरण बांधलं. त्याचे दुष्परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे.#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 18 फ़रवरी 2020

प्रकल्प बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात असताना कुठलीही पूर्वसूचना न देता मेडिगड्डाच्या प्रकल्पात पाणी अडवण्यात आल्याने याचा फटका सिरोंचा तालुक्यातल्या दहा गावातल्या शेतकऱ्यांना बसला आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हाती आलेलं रब्बी हंगामाचं पीक पूर्णपणे मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न या भागातली जनता विचारत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातून महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर गोदावरी नदी वाहते. या नदीवर तेलंगणा सरकारने मेडीगड्डा कालेश्वर हा सिंचन प्रकल्प प्रस्तावित केला होता. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन केलं. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारनं या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र दिलं. तेलंगणा सरकारनं युद्धपातळीवर या प्रकल्पाची निर्मिती केली. वन आणि पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून हा प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पाचं बांधकाम आता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र या प्रकल्पाचा फटका सिरोंचा तालुक्याला बसायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात मेडीगड्डा धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. या पुरामुळे पोचमपल्ली ते मेडीगड्डा दरम्यान गोदावरी नदीच्या काठावर असलेली शेकडो हेक्ट्र शेती पाण्यात गेली. संपुर्ण शेत जमीन वाहून गेली होती.

मात्र आता पावसाळा नसतानाही सिरोंचा ते पोचमपली दरम्यानच्या शेतकऱ्यांना मेडिगड्डा प्रकल्पाचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मेडीगड्डा कालेश्वर या प्रकल्पाचं एक धरण पोचमपली जवळ बांधण्यात आलयं. या ठिकाणी गोदावरी नदीचं पाणी अडवलं गेलं आहे. आजूबाजूच्या दहा गावातल्या शेतीला याचा फटका बसलाय. धरणाचे सर्व दरवाजे बंद असल्यानं गोदावरी नदीचं पाणी पोचमपल्ली ते अरडा गावालगतच्या शेतांमध्ये शिरलंय.

शेतातील कापूस, मिरची या नगदी पिकांसह रब्बी हंगामातील पीकंही पाण्यात बुडाली आहेत. याची तीव्रता ही अरडा वडदम, पेंटीपाका, राजनापली या भागात जास्त दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या पिकासोबत भाजीपाला लागवड केली होती. हा भाजीपाला पाण्यामध्ये गेल्याने शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय.

या ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची जमीन संपादन न करता, कुठलाही मोबदला न देता हे पाणी अडवलंय. भूसंपादनाच्या प्रक्रियेत मोठा आर्थिक घोळ होत असल्याची शेतक-यांची ओरड आहे. त्यामुळे या हंगामात चार पैसे हातात येतील या आशेने शेतकऱ्यांनी पिके जगवली होती ते आता हवालदिल झाले आहेत.

कुठलीही पुर्वसूचना न देता पाणी अडवण्याचा या प्रकाराचा गावकऱ्यांनी विरोध केलाय. आधी भूसंपादन करा, मग पाणी अडवा असं म्हणत महाराष्ट्र सरकारनं या प्रकऱणात लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अरडा गावाचे उपसरपंच बापू रंगुवार यांनी केली आहे.

या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी लवकरच बोलणार असल्याची माहिती आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे. तेलंगणा सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

दरम्यान मेडीगड्डा प्रकल्पात झालेल्या नुकसानीच्या संदर्भात सिरोंचा तालुका प्रशासनाने आता मेडीगड्डा प्रकल्पाच्या महादेवपूर इथल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997