पुणे : पूर्ण भरलेल्या भाटघर धरणाची गळती होतीय का? काय आहे सत्य?

पुणे : पूर्ण भरलेल्या भाटघर धरणाची गळती होतीय का? काय आहे सत्य?

ब्रिटिश सरकारच्या काळात बांधलेलं भोर तालुक्यातील 23.47 टीएमसी एवढी क्षमता असलेलं भाटघर धरण हे अतिवृष्टीमुळे पुर्ण भरलं आहे. त्यामुळे 45 स्वयंचलीत आणि 6 मॅन्युअल दरवाज्यातून 40 हजार क्युसेकने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आमचे प्रतिनीधि विनय जगताप यांनी या स्थळाला भेट देऊन शाखा अभियंता नलावडे यांच्याशी चर्चा करुन तेथील परीस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शाखा अभियंता नलावडे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना, दुपारी अदांजे 4.30 च्या दरम्यान भाटघर धरण ही पुर्ण भरले. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून 25-30 हजार इतका विसर्ग सोडण्यात आला.

भाटघर धरण हे भोर येथील येळवंडी नदीवर ब्रिटिश काळात 1927 साली बांधण्यात आलंय, या धरणातून होणारा विसर्ग नीरा नदी मध्ये सोडण्यात येतो, नीरा देवघर आणि भाटघर या दोन्ही धरणाचा विसर्ग नीरा नदीत होत असल्याने भोर – पुणे रस्त्यावर असणारे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. हा रस्ता रविवार संध्याकाळ पासून बंद करण्यात आला आहे. या धरणावर असणाऱ्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी गेल्याने सोमवारी भोर शहरासह 60 गावे अंधारात होती, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काही न्यूज चॅनल आणि सोशल मीडिया वर भाटघर धरणातून गळती होत असल्याचे वृत्त दाखवण्यात येतय , पण ही अफवा आहे. अशी कोणत्याही प्रकारची गळती होत नाहीये, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.