Home मॅक्स ब्लॉग्ज चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच आडवी !

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच आडवी !

865
0
Courtesy :Social Media
Support MaxMaharashtra

लग्नाचा सिझन. चंद्रपूर शहरातून एक लग्नाची वरात जात आहे. समोर बॅन्डवाले ‘आज मेरे यार की शादी है’ गाणं वाजवत आहेत. बॅन्डच्या तालावर काही वराती नाचत आहेत. काही वराती छान फेटे बांधून आहेत. त्यामागे इनोव्हामध्ये नवरदेव व त्याचे कुटुंबीय आहे. अमुक संग तमुक असे स्टिकरही गाडीवर लावलेले आहे. संपूर्ण वरात शिस्तबद्ध पद्धतीने चालली आहे. कोणताही वराती दारू पिऊन नाही, नाचणारेही नाह.

अचानक पोलिसांची गाडी येते आणि नवरदेवाची गाडी चेक करते. त्यात लाखोंचा दारूसाठा सापडतो. पोलीस तपासात अतिशय धक्कादायक गोष्टी उघडकीस होतात. मुळात ती लग्नाची वरातच फेक असल्याचे समोर येते. बॅन्डवाले, वराती, नवरदेव, पाहुणे सर्व फेक. हा सर्व आटापिटा दारुच्या तस्करीसाठी केलेला असतो. ही सत्य घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातली. दारूच्या तस्करीसाठी अँम्ब्युलंस, पेट्रोल सप्लायची गाडी, विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅग, स्टेपनीचा टायर अशा एक ना अनेक भन्नाट क्लृप्त्या अजूनही चंद्रपूर जिल्ह्यात वापरल्या जातात.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात येणार आहे अशी बातमी सध्या येत आहेत. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी तर केली मात्र त्याची अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. त्यामुळे ही दारूबंदी सपशेल अपयशी ठरली. ज्या महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला त्याच महिला आता दारूबंदीला कंटाळलेल्या दिसत आहेत. याचे कारण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही राजरोसपणे सुरू असलेली दारूची अवैध विक्री व तीही दुप्पट दराने. त्यामुळे साहजिकच आर्थिक गणित बिघडणारच.

दारूबंदी हा चंद्रपूर जिल्ह्यात खूप जिव्हाळाचा विषय आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवली गेली ती ‘दारू की दूध’ या एकमेव मुद्यावर. विकास बिकास सब झूट. खासदार बाळू धानोरकर यांचा दारूचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे. तर माजी मंत्री आणि माजी खा. हंसराज अहिर हे कधीकाळी दूधवाले होते असे म्हणतात. (जसे मोदी चहावाले होते तसेच.) ‘दारू की दूध’ अशी लढत होण्यामागचे कारण म्हणजे एकतर ते दारू व्यावसायिक व दुसरे म्हणजे संपूर्ण दारू विक्रेते (ज्यांचे दारूबंदीमुळे परवाने रद्द झाले होते) ते बाळू धानोरकरांच्या पाठिशी असल्याची चर्चा होते.

असं म्हणतात की खासदार झाल्यास दारूबंदी उठवणार असे आश्वासनही त्यांनी दिले होते. दारू की दूध अशी थेट लढत झाल्याने या सर्व घडामोडींमध्ये भाजपमधले लोकप्रतिनिधी व पदाधिकारी असलेल्या दारू विक्रेत्यांची चांगलीच गोची झाली होती. चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्यात सामाजिक कार्यकर्त्या परोमिता गोस्वामी यांचा सिंहाचा वाटा होता. मुनगंटीवार यांनी मंत्री होताच त्यांना दिलेले आश्वासन पाळले व चंद्रपूर जिल्ह्यात ‘बाटली आडवी’ झाली.

सुमारे दोनशे परवाने रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे जिह्यात मोठी आर्थिक उलथापालथ झाली. वेटर, शेफ, मॅनेजर असे हजारों लोक एका झटक्यात बेरोजगार झाले. बार आणि चणे, फुटाणे, चिवडा याचे उत्पादन करणा-या गृहउद्योगांना याचा मोठा आर्थिक फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी व त्यावर आधारीत अनेक व्यवसाय आहेत. या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. छत्तीसगड राज्यातून इथे मोठ्या प्रमाणात मजूर येतात. अनेक मजूर तर बायको मुलांना घेऊऩ इथे आले व कामाच्या ठिकाणच्या परिसरातच झोपडी करून राहत होते.

या मजूर लोकांना दिवसभराचा थकवा भागवण्यासाठी रात्री दारूची गरज असायची. दारूबंदी झाल्याने ब्लॅकच्या रेटमध्ये दारू परवडत नसल्याने अनेक मजूर कुटुंबासह जिल्हाच सोडून गेले. असे एक नव्हे तर अनेक आर्थिक परिणाम जिल्ह्यात दिसून आले.

दारूबंदी आधी आणि नंतर….

दारूबंदी ही केवळ कागदावर राहिली. दारूबंदी होताच राजकीय ओळखीचा फायदा घेऊन अनेक लोक दारू तस्करीत आले. हे सर्व मिळून मिसळून सुरू होते. त्यांच्यावर अधेमधे चुटूरफुटूर कारवाई व्हायची. मात्र जिथून अवैधरित्या माल विकत घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात सप्लाय व्हायचा त्या वाईन शॉप किंवा बारवर कधीही कारवाई झाली नाही. शिवाय जो वाहतूक करायचा त्याच्यावरच कारवाई झाली. पोलीस कधीही या तस्करीच्या तळाशी गेले नाही. निवडणुकीच्या काळात तर दोन्ही बाजूने मस्त पेपरबाजी झाली. अहिर यांच्या कार्यकर्त्याला अवैध दारू तस्करीत अटक, बाळू धानोरकरांचा कार्यकर्त्याला दारू तस्करी करताना अटक अशा जुन्या बातम्या सोशल मीडियात दोन्ही बाजूने चांगल्याच व्हायरल करण्यात आल्या होत्या.

चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या गडचिरोली, वर्धा या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे बेवड्यांची ‘जाये तो जाये कहां’ अशी परिस्थिती होणे स्वाभाविक आहे. त्यात पश्चिमेला यवतमाळ जिल्हा सुरू होतो. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले वणी दारू सप्लायचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. दोन्ही जिल्ह्यातील पोलीस मॅनेज करणे, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मॅनेज करणे याचा खर्च वाढल्याने चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचा रेट दुप्पट झाला. (जो वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी आहे.)

अपघातांच्या संख्येत मोठी वाढ

दारूबंदीमुळे अनेक लोक केवळ 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या वणी येथे पार्टीसाठी येतात. काही लोक तर यवतमाळ जिह्यातल्या लग्नासाठी वाट पाहतात. एप्रिल ते जून महिना हा लग्नाचा सिझन आहे. सकाळी चंद्रपूरहून लग्नाला यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने निघायचे. जिल्ह्याची बॉर्डर संपताच बारमध्ये पहिला फेर. त्यानंतर जो फेर सुरू असतो तो परत जाण्यापर्यंत. या काळात जे अपघात झाले आहेत त्यात अधिकाधिक लोक हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हा आकडा शंभरच्या वर असावा. अपघाताची माहिती मिळताच पोलीस असो किंवा पत्रकार पहिले गाडी चंद्रपूर पासिंग आहे का विचारतात. त्यावरून दारुबंदीचे परिणाम सहज लक्षात येतात.

दारूबंदी आणि राजकारण…

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्धा यवतमाळ जिल्हाही येतो. दारूबंदीसाठी पुढाकार घेणा-या समाजसेविका व श्रमिक एल्गार संघटनेच्या परोमिता गोस्वामी आणि स्वामिनीचे महेश पवार यांची यवतमाळ जिल्हा दारूबंदी करण्याची मागणी आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत ठोस भूमिका घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी वणी येथे भव्य सभा आयोजित केली. दारूबंदी चळवळीत असणा-या महिलांना खेड्यापाड्यातून गाडी पाठवून सभेला बोलवण्यात आले. दारूबंदीसाठी महिलांना आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था पहिल्यांदाच कऱण्यात आली होती. याआधी महिला मोर्चा, आंदोलनासाठी स्वतःच्या खर्चाने जायच्या.

सभेला आल्यावर त्यांनी उपस्थित महिलांना मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा दारूबंदी घोषित करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगून परोमिता गोस्वामी आणि महेश पवार यांनी हंसराज अहिरांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सहीचे पत्र उपस्थितांना दाखवले. काही महिलांनी आणि स्थानिक पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तर त्यांचे पत्र का नाही? प्रदेशाध्यक्षाचे पत्र का? असा सवालही विचारला. यावरून सभेतच मोठा गोंधळ झाला.

मुख्यमंत्र्यांनी आधीच यवतमाळ जिह्यात दारूबंदी शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले असताना त्यांच्यावर विश्वास का ठेवावा असा सवाल उपस्थित करत परोमिता गोस्वामी, महेश पवार यांच्या भूमिकेवर संशय उपस्थित करण्यात आला. मजेची गोष्ट म्हणजे दोन संघटनांनी अहिरांना पाठिंबा दिल्याने इतर छोट्यामोठ्या दारूबंदी संघटनांनी बाळू धानोरकरांना पाठिंबा जाहीर केला. असे एक ना अनेक मुद्दे या लोकसभा निवडणुकीत गाजले.

बाळू धानोरकर विजयी होताच त्यांनी दोन-तीन दिवसातच चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी हटली पाहिजे अशी मागणी केली. पुढेही ते या मागणीसाठी आक्रमक राहिले. मात्र सत्ता युतीच्या हाती असल्याने ते शक्य नव्हते. सत्तांतर होताच त्यांनी पुन्हा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. सरकारनेही आता महसुलाचे कारण देत दारूबंदी हटवण्याकडे लक्ष दिले आहे. दारूबंदी सपशेल फसलेली आहे किंवा जाणूनबुजून ती फसवण्यात आली असावी. मात्र आता जिल्ह्यातील लोकही याला कंटाळले आहेत.

महिलांचे बजेट बिघडल्याने महिला पण कंटाळल्या आहेत. रेस्टॉरंट आणि बार लाईनमध्ये असलेल्या तरुणांनी इतर जिल्ह्याची वाट धरली आहे. मिळेल त्या पगारात त्यांचे काम सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात येऊन चंद्रपुरातील लोकांचे अपघात होत आहे. दारूबंदी शंभर टक्के यशस्वी होणे शक्य नाही मात्र या तस्करीत मोठ्या प्रमाणात राजकीय लोक जुळल्याने दारूबंदीचा फज्जा उडाला आहे. सरकारकडे दारूबंदी यशस्वी करण्याचा किंवा दारूबंदी उठवण्याचा असे दोन पर्याय आहे. यात दुसरा पर्याय फायद्याचा आहे. त्यामुळे सरकार दुसरा पर्यायच निवडतील हे नक्की….

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997