लोकसभा निवडणूक : प्रज्ञा ठाकूर यांना झटका, दिग्विजय सिंह यांना ‘या’ पक्षाने...

लोकसभा निवडणूक : प्रज्ञा ठाकूर यांना झटका, दिग्विजय सिंह यांना ‘या’ पक्षाने दिला पाठिंबा

भाजपने मध्यप्रदेशमध्ये भोपाळ लोकसभा मतदारसंघात मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना उमेदवारी दिल्याने भोपाळ लोकसभेकडे सर्वांच लक्ष लागले आहे. त्यातच कॉंग्रेसने प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांना उमेदवारी देत प्रज्ञा ठाकुर यांच्यासमोर मोठं आव्हाण उभं केलं आहे. मात्र, आता दिग्विजय सिंह यांना लोकतांत्रिक जनता दलाने (लोजद) दिग्विजय सिंह यांना पाठिंबा दिल्याने दिग्विजय सिंह यांचं पारडं जड झाल्याचं बोललं जात आहे.
या संदर्भात लोजद च्या वतीनं लोक क्रांती अभियानाचे संयोजक गोविंद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तसंच या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींमुळे लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले असल्याचं यादव यांनी म्हटलं असून या चारही स्तंभाच्या रक्षणासाठी भाजपला हरवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिल्यापासून त्या त्यांच्या वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत.

काय म्हणाल्या होत्या प्रज्ञा ठाकूर?

प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी केला. हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंह यांनी केले होते.