Home News Update ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात लक्ष वेधणारी ‘ती’ उपेक्षीत गायिका

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात लक्ष वेधणारी ‘ती’ उपेक्षीत गायिका

169
0
Support MaxMaharashtra

सांगली जिल्ह्यातील बलवडी येथे २८ वे ग्रामीण साहित्य संमेलन सुरू होते. संमेलनातील आवाज माळावरील शाळेजवळ उतरलेल्या उसतोडी मजुरांच्या खोपेपर्यंत पोहचत होता. त्यातील कवितेचा आवाज ऐकुन मधल्या खोपटातील छायाताई पठाडे यांनी कोपऱ्यात जाऊन कानोसा घेतला. त्या आवाजाच्या दिशेने त्या गेल्या. आणि स्टेजवरील मान्यवरांना सादरीकरणासाठी गळ घातली. त्या स्टेजवर जाताच लोकांनी उसासा टाकला. त्याचबरोबर डोक्यावर पदर घेतलेल्या छायाताई पठाडे हयांनी पहाड्या आवाजात अभंग सादर करण्यास सुरावात केली. प्रेक्षक नजर खिळवून त्यांच्याकडे पाहू लागले आणि उपस्थितांनी त्यांच्या आवाजाला मनसोक्त दाद दिली. त्या साहित्य संमेलनात छायाताई पठाडे यांची चांगलीच वाहवा झाली. यानंतर छायाताई निघून गेल्या.

‘मॅक्समहाराष्ट्र’ टीम ने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. माळावर वासुदेवाच्या टोप्यांसारखी ऊसतोड कामगारांच्या खोपटांची गर्दी होती. पक्षांच्या थव्याने काड्या गोळा करून एका झाडाला आपापली घरटी समूहाने बांधावी तशीच ती खोपटी माळावर उभी केली होती. एक दोन टोळ्या ओलांडून चौकशी करत करत एक गाणं म्हणणारी बाई पुढच्या टोळीत आहे असा शोध लागला. तिथे गेलो असता दारात तीन विटांची चूल मांडलेले एक उघडे खोपटे दिसले. पण त्या घरात नव्हत्या. शेजारी काका भावजी यांच्या घरात त्या असतील असे समजले. पण, त्या तिथेही नव्हत्या म्हणून त्यांच्या घरात वाट पाहत बसलो. तेवढ्यात हातात पिशवी घेऊन लंगडत एक बाई रस्त्याने चालत येत होती. काकांनी तिला आवाज दिला आणि सांगितले याच छायाताई पठाडे… आम्ही त्यांच्या खोपीबाहेर जाऊन आम्ही बसलो. छायाताईनी त्यांच्या कलेबद्दल आम्हाला सांगायला सुरवात केली. त्यांनी भाऊ बहिणीच्या नातेसंबंधांवर एक गीत सादर केले.

“विनवते भाऊराया, नको चोळी खण

दिवाळी सणाला माझ्या, ठेव येणं जाणं “.

बहीण भावाला सांगते की मला कोणतीही साडी चोळी खण नारळ नको पण किमान दिवाळी सणाला तरी माझ्या घरी येणं जाणं कायम ठेव. अशा प्रकारची अनेक गीते त्यांनी आत्तापर्यंत लिहिली तशीच गायली आहेत. व्यसनमुक्ती, हुंडाबळी, भजन, महापुरुषांची गाणी यासह ग्रामीण नातेसंबंधांवर त्यांनी लेखन केले आहे.

छायाताई सांगतात की, त्या अशिक्षित आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी मौखिक आहेत. ती कुठेही लिहिलेली नाहीत. याचबरोबर कानावर पडलेल्या आवाजाच्या आधारे त्यांनी गाणी लिहिली आहेत. सिनेमातल्या गाण्यांच्या चालीवर त्यांनी त्यांच्या रचना बनवलेल्या आहेत.

छायाताई यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर गाणी लिहिली आहेत. त्या स्वत:ला बाबासाहेबांची अनुयायी मानतात. कलाकार म्हणून त्यांच्या गाण्यांवर अनेक संस्कृतीचा पगडा आहे. गाणी म्हणताना त्या वारकरी संप्रदायातील भजनं, गवळणीसुद्धा गातात. कुटुंबाच्या बाबतीत त्यांना विचारले असता त्या निराश होतात. त्यांचे मूळ गाव यवतमाळ जिल्हयातील पुसद तालुक्यातील पारडी हे आहे. कलाकार म्हणून पेन्शन मिळावी म्हणून त्यांनी पुसद जिल्हा यवतमाळ येथील कार्यालयात खूप वर्षे हेलपाटे मारलेत. पण त्यांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. यावर त्या संतप्त होऊन सवाल करतात. घरात पेटीभरून प्रमाण पत्र पडलेली आहेत. मी आत्तापर्यंत अनेक वर्षे भजन तसेच इतर कार्यक्रमात गायन केलेले आहे. हा पुरावा  नाही का? साधं गाता न येणारा कलाकार म्हणून पेन्शन मिळवतो. मात्र माझ्यासारख्या कलाकाराची ही अवस्था आहे. मला एका डोळ्याने कमी दिसते एका पायाने चालताना त्रास होतो. असं असताना आयुष्य जगण्यासाठी गाव सोडून ऊसतोडीसाठी यावे लागते.

छायाताई यांचीच अशी अवस्था नाही असे अनेक उपेक्षीत कलाकार या महाराष्ट्रात आहेत. जे आपली कला सादर करून भारतात महाराष्ट्राचा सांस्कृतिक झेंडा अभिमानाने फडकवत आहेत. मात्र या उपेक्षित कलाकारांना ऊसतोड करण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत कलाकार साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. ही कला टिकवायची असेल तर कलाकार जास्त दिवस जगला पाहिजे. छायाताई म्हणतात मी मरण्याआधी मला काहीतरी मदत करावी. जिवंतपणी कलाकाराच्या कलेची कदर न करणे हा आपला पायंडा आपण कधी मोडणार आहोत? हा सवाल आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने अशा उपेक्षित कलाकारांना न्याय द्यावा अन्यथा या कलाकारांना पोटासाठी असेच दारोदार भटकावे लागेल.

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात लक्ष वेधणारी ‘ती’ उपेक्षीत गायिका

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात लक्ष वेधणारी ‘ती’ उपेक्षीत गायिका#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 10 जनवरी 2020

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997