Home मॅक्स रिपोर्ट कडकनाथ घोटाळा : शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, शेतकरी म्हणतात… ‘सदाभाऊ आपल्या संघटनेतील लोकांवर...

कडकनाथ घोटाळा : शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, शेतकरी म्हणतात… ‘सदाभाऊ आपल्या संघटनेतील लोकांवर कारवाई करा आम्हाला न्याय मिळवून द्या’

318
0

सध्या पश्चिम महाराष्ट्रात ‘कडकनाथ घोटाळ्याने’ शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वायफळे, सिध्देवाडी, वडगाव, अंजनी, गव्हाण, कवलगे, धामणी, हातनूली, पाडळी, कवठेएकंद, तासगाव या गावातील शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबड्यांचा प्रकल्प केला आहे. या सर्व गावातील शेतकरी सध्या या घोटाळ्याने मोठे चिंतातूर आहे. त्यातच या घोट्याळ्यातील महा रयत अग्रो इंडिया कंपनीच्या सर्व संस्थापक अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करावेत या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तासगाव येथे उपोषण सुरु आहे.

मॅक्समहाराष्ट्रने या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी बातचित करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाजी यादव यांनी या घोटाळ्यासंदर्भात बोलताना महा रयत अग्रो आणि रयत ऍग्रो या दोन्ही कंपन्या एकच असल्याचं सांगितलं.

‘माझे वैयक्तिक सहा लाख रुपये अडकले आहेत. तासगाव तालुक्यातील जवळपास 50 ते 55 शेतकरी या मध्ये अडकले आहेत. त्यांची फसवणूक झाली आहे. आता आम्ही या ठिकाणी तासगाव येथे आंदोलनासाठी बसलो आहोत. मंत्रीसाहेब सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती चे जे पण यात सामील आहेत. यामध्ये साहेबांनी लक्ष घालून, होता होईल तेवढे शेतकऱ्याचे पैसे काढून द्यावेत. खोत साहेब महाराष्ट्राचे मंत्री आहेत. आम्हाला न्याय द्यावा. सुधीर मोहिते व संदीप मोहिते या दोन संचालक व संस्थापक अध्यक्ष संचालकांवर महा रयत व रयत अग्रो यांनी पूर्णपणे फसवणूक केली आहे.

अशी व्यथा शिवाजी यादव यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली.

कडकनाथ कुक्कटपालन शेतकरी मनोज पाटील म्हणतात

महा रयत ऍग्रो या कंपनीने आमच्याकडून करार करुन घेऊन आमचे एक अंडे 60 रुपये प्रमाणे घेऊ असे सांगितलं होतं. पशुखाद्य देऊ असं आमिष दाखवले होतं. या आमिषाला बळी पडल्याने आमची फसवणूक झाली आहे. खाद्य देतो सांगण्यात आले पण ते दिले नाही. अंडी 60 रुपयाला घेतो असं सांगितले होते. त्यामुळे घरच्या लहान मुलाला अंडी खाण्यास दिली नाही. अंडीही कंपनीने खरेदी केली नाहीत. आमच्या घरातील सोने गहाण ठेवून, बचत गटाचे कर्ज काढून यामध्ये पैसे गुंतवले होते.

आमचं एकच सांगणं आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्या संघटनेचे जे काही लोक यामध्ये सामील आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. सुधीर मोहिते याला पकडून कारवाई करावी. जे कोणी संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आमच्याकडे कोणतेही खाद्य नाही. त्यामुळे पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. आम्हाला शासनाने खाद्याची सोय करुन द्यावी.. यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

असं मनोज पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

Support MaxMaharashtra

 

 

 

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997