Home मॅक्स ब्लॉग्ज “ते” खरंच मार्क ट्वेनचंच वाक्य आहे का ?

“ते” खरंच मार्क ट्वेनचंच वाक्य आहे का ?

236
0

If voting make any difference, they wouldn’t let us do it.

Support MaxMaharashtra

प्रसिध्द विचारवंत मार्क ट्वेन यांच्या नावावर हे विधान प्रसारित होतंय. सोशल नेटवर्किंग वर विविध भाषांत नव्हे तर अगदी आॅनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काॅफी मग वरसुध्दा आपल्याला हा विचार (quote) वाचायला मिळतो. पण खरंच मार्क ट्वेन यांनी तसं म्हटलंय का? त्यांच्या लेखात, भाषणात तसा संदर्भ आलाय का?

समाज माध्यमात जेव्हा तथाकथित शिक्षित, उच्चशिक्षित वर्गही अनेकदा डोळे झाकून विविध विचारवंतांचे विचार आपल्या मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये पुढे पुढे सरकवत असतात, तेव्हा तसं करण्यापूर्वी ते तपासतात का, की हा विचार संबंधित विचारवंताचाच आहे कि फेक मार्केटींग ? तितकी तसदी कोणी घेताना दिसत नाही. उलट, आपल्याला काय करायचंय, इतकं कोण बघतोय, विचार चांगला आहे, पटला म्हणून पाठवला, असं समर्थंन करण्याची वृत्ती दिसते.

आपल्याकडे तर नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील इत्यादींच्या नावावर इतकं काही खपवलं जातं की ते त्यांना स्वत:लाही माहित नसतं. आता पाळी मार्क ट्वेनचीही आलीय.

मार्क ट्वेन जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी लिहून गेला होता की तुमच्या मतदानाने जर काही बदलत असते, तर ते तुम्हाला करूच दिले नसते !!!

ही पोस्ट मराठीत प्रसारित होतेय. इंग्रजीतसुध्दा ती मार्क ट्वेनच्या नावावर आहे. पण मराठीप्रमाणेच इंग्रजीतही ती शब्दांची फिरवाफिरव करून पुन्हा पुन्हा मांडलेली आढळते.

सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमन्स हे विख्यात अमेरिकन विनोदकार आणि वास्तववादी कादंबरीकार. मिसिसिपी नदीवरील खलाशी, पाण्याची खोली दर्शविण्यासाठी जी हाक देतात, तिच्यावरून ‘मार्क ट्‌वेन’ हे आपले टोपण नाव त्यानी घेतलं होतं. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचा तीव्र उपहास त्यानी विनोदाच्या आधारे केला. अतिशयोक्ती, वक्रोक्ती, सूचकता, व्यंजना ह्यांचा कौशल्यपूर्ण वापर हे त्याच्या विनोदाचं लक्षणीय वैशिष्ट्य ! अमेरिकन साहित्याला वास्तववादाचे वळण देण्यात ट्वेन यांचा वाटा मोठा आहे, अशी माहिती आपल्याला मराठी विश्वकोषात आहे.

मार्क ट्वेन यांच्या नावावर खूप सारी विधानं (quote) आहेत आणि काही खपवली जातात. त्यातली किमान अर्धी ट्वेनची विधानं नसतात, असं त्यांच्या दस्तावेजांचे संग्राहक राॅबर्ट हर्स्ट यांचं म्हणणं आहे. हर्स्ट यांच्याकडे ट्वेनच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या विधानांचाही संग्रह आहे. गेली ३० वर्षं ते या सगळ्याचा पिच्छा पुरवताहेत. अलिकडच्या काळात त्यात मताधिकारासंदर्भातल्या विधानाची भर पडलीय.

राॅबर्ट हर्स्ट ठामपणे सांगतात की वोटींगबाबतचं ते विधान मार्क ट्वेनचं नाही. हेच विधान अमेरिकन सामाजिक कार्यकर्ता फिलिप्स बेरीगन आणि रशियन लेखक एम्मा गोल्डमन यांच्याही नावावर वाचायला मिळतं, पण त्यांच्यापैकीही कोणी ते केल्याचं कुठल्याही दस्तावेजात दिसून येत नाही. ही माहिती चेक युवर फॅक्ट या वेबसाईटवरच्या अगदी अलिकडच्या १६ सप्टेबर, २०१९ रोजीच्या लेखात सापडते.

स्नोप्स या वेबसाईटवर २४ में, २०१६ रोजी डॅन ईवाॅन यांनी लिहिलेल्या लेखानुसार, सप्टेंबर, १९७६ मध्ये “लोवेल सन” मधील राॅबर्ट बाॅर्डन यांच्या वाॅईस आॅफ द पीपल या सदरात आपल्याला वोटिंगबाबतच्या विधानाचं मूळ सापडतं. ते म्हणतात,

If voting could change anything it would be made illegal !!.

राॅबर्ट बाॅर्डन यांच्या लेखातलं वाक्यही ट्वेनच्या नावावर प्रसारित केलं जातं. वोटिंगबाबतचं जे विधान मार्क ट्वेनचं म्हणून पसरवलं जातं ते कधी

If voting made any difference, it would be illegal”

असं असतं किंवा कधी

“If voting made any difference it would never be allowed”

असं असतं.

याचा अर्थच असा की वोटिंगसंदर्भातल्या या विधानाचा निश्चित असा सोर्स नाही.

१९०५ मध्ये बाॅस्टनमध्ये पत्रकारांना दिलेल्या एका मुलाखतीत मार्क ट्वेन म्हणतात,

“In this country we have one great privilege which they don’t have in other countries. When a thing gets to be absolutely unbearable the people can rise up and throw it off. That’s the finest asset we’ve got — the ballot box.”

मताधिकाराचा हक्क महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा आपल्याला काही गोष्टी सहन करण्यापलिकडे जातात, तेव्हा मताधिकाराचा वापर करून आपण त्या दूर सारू शकतो. या मार्क ट्वेनच्या म्हणण्याचा मतितार्थ. अशी व्यक्ती मताधिकाराच्या हक्काविरोधात बोलेल काय?


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997