कोलकात्यामध्ये मोदी विरोधकांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

कोलकात्यामध्ये मोदी विरोधकांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

133
0

कोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात देशपातळीवरील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज कोलकाता इथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात आयोजित केलेल्या सभेत तब्बल २२ पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली.

या सभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जशी औषधाची एक मुदत असते. तशीच मोदी सरकारची मुदत संपत आली आहे. मोदी सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, अशी टीकाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. विरोधी पक्षांच्या या संयुक्त सभेत प्रमुख विरोधी नेत्यांसह माजी पंतप्रधान, तीन मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मी बंडखोरचं – शत्रुघ्न सिन्हा

खरं बोलणं ही बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे. मी सत्याची कास धरली आहे ती सोडू शकत नाही असे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी म्हटले. तसेच मी माझ्या तत्त्वांना मुरड घालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपला संपवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावं – फारुख अब्दुल्ला

स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर देशासमोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात असून आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपाला संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.

पदाच्या नाही तर बदलाच्या अपेक्षेने एकत्र आलो – शरद पवार

भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात की, ही महाआघाडी टिकणार नाही. पंतप्रधानपदासाठी यांच्यामध्ये भांडणं होतील. मात्र, आम्ही सर्वजण कुठल्याही पदाच्या अपेक्षेशिवाय इथं एकत्र आलो आहोत. देशाला परिवर्तन हवं आहे, ते करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत.