गडचिरोलीतल्या रणरागिणींनी पकडली अवैध दारू

गडचिरोलीतल्या रणरागिणींनी पकडली अवैध दारू

गडचिरोली सह चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, शेजारच्या तेलंगणा आणि छत्तीसगड इथून मोठ्याप्रमाणावर दारूची तस्करी होऊन ती अवैध दारू या तीन जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी येते. अर्थात यंत्रणा सक्षम असूनही दारूची ही तस्करी सुरूच आहे. यावर उपाय म्हणून गडचिरोली जिल्ह्यातल्या महिलांनीच अवैध दारू पकडायला सुरूवात केलीय.
१९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. ही दारूबंदी प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्ह्यात मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातुन प्रयत्न केले जात आहेत. या अभियानातुन प्रत्येक गावात गावसंघटना स्थापन करण्यात येतात. यामध्ये दारुबंदी करण्यासाठी महिला सक्रीय सहभागी होतात. ग़डचिरोली जिल्ह्याला छत्तीसगड तेलंगना या राज्याची सीमा लागुन आहे. गडचिरोली चंद्रपुर वर्धा या लगतच्या तीन जिल्ह्यात दारुबंदी लागु आहे. मात्र, लगत असणा-या तेलंगणा व छत्तीसगड राज्यातुन मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी होते. ही तस्करी गडचिरोली मार्गे होते. सीमेवर घनदाट जंगल असल्याने कधी जंगलाच्या रस्त्याने तर कधी रात्री या दारूचा पुरवठा केला जातो. सीमा भागावरती सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस तपासणी नाका लावु शकत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशन सोडुन नक्षल्यांच्या भितीने कारवाई करु शकत नाहीत. या सर्वाचा फायदा घेत दारु तस्करांनी खुले आम आपले साम्राज्य उभे केले आहे. त्यांच्या या साम्राज्याला जिल्ह्यातील भ्रष्ट पोलिस अधिकारी देखील जबाबदार आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये उमटत आहेत.  नेमकी अशी घडली घटना  मुरुमगाव धानोरा हे मुक्तिपथ गावसंघटनेच्या माध्यमातुन दारुविक्रीबंदी असलेले एक गाव आहे. या गावाने जानेवारी महिन्यापासुन गावात दारुविक्रीबंदी घोषित केली आहे. या गावातील संघटनेच्या महिला दररोज गावातुन फिरुन दारुविक्रेत्यांवर लक्ष ठेवुन अहिंसक कृती करत असतात. मुरुमगाव व परिसर नक्षल्यांच्यादृष्टीनं संवेदनशील असल्याने रात्री पोलिस गावात तसेच जवळच्या जंगलात फिरु शकत नाहीत ही बाब लक्षात घेउन दारुविक्रेते छ्त्तीसगड राज्यातुन दारु आणुन त्याचा जंगलात स्टॉक करत असल्याचे लक्षात आल्यावर महिलांनी जंगलात दारु पकडण्याचा निश्चय केला होता.
नेहमी प्रमाणे महिला सायंकाळी गावात गस्त घालत असताना रात्री एक पांढरी पिकअप गाडी महिलांना संशयास्पद वाटली. महिलांनी त्या गाडीचा पाठलाग सुरु केला. महिला गाडीच्या दिशेनं येत असल्याचं पाहून त्याने गाडी सुसाट वेगाने जवळच्या रीडवाही उमरपालच्या जंगलाच्या दिशेने नेली. महिलांनी भर पावसात त्या गाडीचा पाठलाग केला व त्या ठिकाणी महिलांना पाहताच दुस-या एका गाडीतुन काही लोक गाडी तेथेच ठेऊन पळाले. तेथुन बाजुला महिलांना दारुने भरलेला ट्रॅक्टर, ट्रॉली दिसुन आले. महिलांनी रात्रभर या दारुला पहारा दिला व सकाळी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. रात्र असल्याने पोलिस घटनास्थळी येऊ शकले नाहीत. महिलांनी वाढत्या पावसामुळे पहाटे घरी जाऊन पुन्हा यायचे ठरवले व त्या घरी गेल्या व काही वेळाने त्यांनी पुन्हा येउन पाहिले असता त्यातील दारु पिक अप वाहनाने दुसरीकडे नेली जात होती. नाल्यावर असलेल्या गुडघाभर पाण्यातुन महिलांनी पिकअप गाडी पकडली. त्यामध्ये असलेला व्यंकटेश बहीरवार ‘’एवढ्या वेळी मला माफ करा, असे म्हणाला. महिलांनी नकार देता क्षणी त्याने महिलांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. व तो तेथुन पसार झाला. महिला पुन्हा दारु साठ्याच्या ठिकाणी आला. मुरुमगाव पोलिस मदत केंद्राने सदर ठिकाणावर पकड्लेल्या दारु व वाहनाचा पंचनामा केला. यामध्ये रोमीओ लिहिलेल्या 2730 दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. आरोपी वर मुंबई दारु बंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला गेला सरपंच प्रियांका कुंजाम, सायरा शेख, प्रतिभा उइके, अविका आचला, नीरजा कुंजाम, आसोबाई पिद्दा, अनारबाई पिद्दा, लिलाबाई भुरकुरीया, बुधाबाई भोयर, पुष्पाबाई कारेवार, शहीदा पठाण, मुनीर शेख, संगीता पोया यांसह मुक्तिपथ गावसंघटनेच्या महिला कार्यकर्त्यानी सिनेस्टाइलने दारु पकडत पोलिसांपेक्षा मोठी कामगिरी केली आहे.
पोलिस जिल्ह्यात दुर्गम भागात फीरु शकत नाहीत ही वस्तु स्थिती आहे. एखाद्या गावात खुन किंवा मृत्यू झाला तरी रात्री पोलिस गावात येत नाहीत. तो मृतदेह घेउन लोकांना पोलिस स्टेशनला जावे लागते. त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे. पण जिल्ह्यातल्या अनेक दुर्गम गावांना या अवैध गोष्टीपासुन वाचवण्यासाठी कोणतीही व्यवस्था शासनाकडे नाही, हे दुर्दैव आहे.