Home मॅक्स रिपोर्ट …तर ती १७ माणसं वाचू शकली असती!

…तर ती १७ माणसं वाचू शकली असती!

336
0
”तुमचं गाव पूरक्षेत्रात येत नाही, म्हणून मदत पाठवणं शक्य नाही असं तहसिलदारानं सांगितलं. मग बोट उलटल्यावर दोन तासात सगळे कसे पोचले मदत करायला… सरकारच्या आधी टीव्ही वाल्यांना फोन करायला हवा होता म्हणजे मदत वेळेवर आली असती,” ब्रह्मनाळच्या दुर्घटनेत आपल्या कुटुंबातील ४ लोक गमावलेले सिद्धकुमार वडेज ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलत होते.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. सर्वजण आपापल्या परीने या पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा प्रयत्न करतायत. या पुराची भीषणता एका घटनेमुळे समोर आलं ती म्हणजे ब्रम्हनाळ इथं झालेली बोट दुर्घटना. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. सोशल मीडियामध्ये या घटनेचे फोटो फिरायला सुरुवात झाल्यानंतर माध्यमांनी संदर्भात बातम्या प्रसारित केल्या आणि हा पूराची स्थिती किती भयावह आहे हे राज्याला कळालं. मात्र, त्या दिवशी ब्रम्हनाळमध्ये नेमकं काय झालं, ही दुर्घटना टाळता आली असती का, याबाबत ‘मॅक्स महाराष्ट्र’च्या टीमनं ब्रह्मनाळच्या गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी या दुर्घटनेमागचं कारण सांगितलं.
ब्रह्मनाळ हे साधारणपणे साडेचार ते पाच हजार लोकसंख्येचं गाव. साधारण ६ ऑगस्टपासून या भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. गावातल्या सिद्धकुमार वडेज यांनी लगेचच तहसिलदार राजेंद्र पोळ यांना फोन केला. तलाठी आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. तहसिलदारांनी चारवेळा फोन केल्यानंतर पाचव्या वेळेस फोन घेतला. गावात पाणी भरत असल्यानं परिस्थिती बिकट होत चालली होती. याची कल्पना त्यांनी तहसिलदारांना दिली. गावात एक बोट आहे मात्र एका बोटीतून एवढी माणसं बाहेर काढणं शक्य नव्हतं म्हणून आणखी दोन बोटींची मागणी केली.
१ मिनीट २० सेकंद झालेल्या या संभाषणात तहसिलदारांनी ब्रह्मनाळला मदत पोहचवणं शक्य नसल्याचं सांगितलं. तुमच्याकडे एक बोट आहे तर त्या बोटीनं तुमच्या जबाबदारीवर बाहेर या असं तहसिलदार म्हणाले. त्यासाठी पेट्रोलची व्यवस्था करण्याचं त्यांनी मान्य केलं. गावकऱ्यांना घेऊन ती बोट निघाली तेव्हा त्यात सिद्धकुमार यांच्या घरातले ११ लोक होते. त्यातल्या ४ जणांचा बुडुन मृत्यू झाला. तहसिलदारांनी मदत पाठवली असती तर ही माणसं वाचली असती असं वडेज यांनी सांगितलं.
या दुर्घटनेनंतर दोन तासात गावात एनडीआरएफचे पथक आले. एनडीआरएफच्या जवानांनी सर्व गावकऱ्यांना अगदी सुखरुप सुरक्षित ठिकाणी हलवलं. दिवसभर त्यांचं हे काम सुरू होतं. जवान दिवसभर उपाशी होते. गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी चहा केला. तेवढ्यावरच जवानांनी आम्हा सर्व गावकऱ्यांना बाहेर काढलं आणि आमचे प्राण वाचवले असं वडेज म्हणाले.
बोट बुडाल्यानंतर गावकऱ्यांनी सर्व मृतदेह बाहेर काढले. यावेळी वडजे यांच्या भाचीचं प्रेत पाहून जवानांनाही अश्रू आवरता आले नाहीत. लोकांना वाचवणं आमचं कर्तव्य आहे. हे आमचं जीवनच आहे. आम्हाला आधी सुचना मिळाल्या असत्या तर गावातला एकही जीव जाऊ दिला नसता, अशा एनडीआरएफच्या जवानांच्या भावना होत्या.
वडेज यांनी तहसिलदारांना ६ तारखेला फोन केला होता आणि ही घटना ८ तारखेला घडली. दोन दिवस ब्रम्हनाळला कोणतीच मदत मिळाली नाही. मात्र, ही दुर्घटना घडल्याची बातमी माध्यमांनी बातमी आणि त्यानंतर लगेचच दोन तासांत गावात यंत्रणा पोहोचली, असं कसं झालं? आमचे जीव वाचवण्यासाठी आम्ही आधी मीडियाकडे जायला हवं होतं का, असा सवाल वडजे यांनी केलाय.
याबद्दल आम्ही तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्याशीही संपर्क केला. मात्र, त्यांनी असं काहीही झालं नसल्याचं सांगत अधिक बोलणं टाळलं.
Support MaxMaharashtra

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997