Home > हेल्थ > स्वाईन फ्लू : लक्षणे व निदान

स्वाईन फ्लू : लक्षणे व निदान

स्वाईन फ्लू : लक्षणे व निदान
X

डॉ. सतीश सूर्यवंशी लिखित स्वाइन फ्लूसंबंधी मालिकेतील भाग दुसरा..

स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे व संसर्गजन्य रोगांच्या सहा पातळ्या असतात

१. जनावरापासून जनावराला संसर्ग

२. जनावरापासून माणसाला संसर्ग

३. जनावरापासून माणूस व माणसापासून दुसरा माणूस

४. माणसाच्या समूहातून दुसऱ्या समूहाला संसर्ग

५. विस्तारित भागातील मोठ्या समूहांना संसर्ग

६. सर्व समाजात विषाणूंचा संसर्ग

स्वाइन फ्लू ला H1N1 का म्हणतात?

या विषाणूच्या पृष्ठभागावर दोन महत्त्वाचे अँटिजीन्स (antigen) असतात. अँटिजीन्स म्हणजे ऍटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ. याला surface antigen असे म्हणतात. यात प्रामुख्याने H1 (hemagglutinin type 1) and N1 (neuraminidase type 1) अशी दोन प्रथिनं असतात. आणि म्हणूनच या विषाणूला H1N1 flu असे संबोधतात. यातील H1 हे प्रथिन रुग्णाच्या पेशींवर चिकटून राहण्याचे कार्य करते तर N1 प्रथिन हा रोग इतरांमध्ये पसरवण्याचे काम करते.

२००९ सालापर्यंत H1N1 पर्यंत मर्यादित असलेल्या या विषाणूचं नवीन रूप २०११ साली आढळून आलं, ते म्हणजे H3N2. थोड्याफार फरकाने सारखाच दिसणारा हा फ्लूचा विषाणू परिणामांच्या बाबतीत मात्र जास्त धोकादायक आहे.

प्रसार

या संसर्गजन्य रोगाचा प्रसार शिंकताना किंवा खोकताना रुग्णाच्या मुखातून किंवा नाकातून जे शिंतोडे उडतात, त्याच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आल्यास किंवा हे शिंतोडे ज्या वस्तूंवर पडले आहेत त्या वस्तू हाताळल्यासही होतो. डुकराच्या मांसाच्या (पोर्क, बेकन, हॅम) सेवनाने हा रोग पसरत नाही.

प्राथमिक लक्षणे

१) ताप (१०० अंश फॅरन्हाइट किंवा त्याहून जास्त)

२) खोकला

३) सर्दी

४) थकवा

५) अंगदुखी

६) डोकेदुखी

७) घसा खवखवणे किंवा दुखणे

८) थंडी भरून येणे

सर्वसाधारण फ्लूचीच ही लक्षणे. पण योग्य निदान व उपचार न झाल्यास न्युमोनिया होऊन श्वसनमार्ग निकामी होण्याचा (respiratory failure) धोका उद्भवू शकतो.

जास्त धोका कोणाला?

५ वर्षाखालील लहान बालकं, वय वर्षं ६५ च्या वरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्रीया आणि ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांना या फ्लूची लागण होण्याचा जास्त धोका असतो. मधुमेह किंवा दमा असलेल्या रुग्णांना, १८ वर्षाखालील व्यक्ती ज्या अ‍ॅस्पिरिन नामक औषधांचे नियमित सेवन करत आहेत, फुप्फुस, हृदय, यकृतच्या दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या रोगाची लागण सहज होऊ शकते. म्हणूनच इस्पितळाचे कर्मचारी, वारंवार रुग्णाच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे अनिर्वाय आहे.

निदान

सर्वसाधारण फ्लू सारखीच लक्षणं असल्यामुळे स्वाइन फ्लूचं निदान करणं कठीण जातं. त्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मळमळ होऊन उलटी होण्याचं प्रमाण जास्त आढळू शकतं. पण फक्त या लक्षणांवरून निदान होत नाही. निदान निश्चित करण्यासाठी लॅबमध्ये चाचण्या कराव्याच लागतात. यात रुग्णाच्या घशातील अथवा नाकातील द्रव (nasopharyngeal swab) डॉक्टर पुढील तपासासाठी पाठवू शकतात. या टेस्टमध्ये कळतं की इन्फ्लुएन्झा A चं इन्फेक्शन आहे की B. Type B पॉझिटिव आल्यास स्वाईन फ्लूची शक्यता मावळते पण Type A पॉझिटिव आल्यास तो साधा फ्लू किंवा स्वाइन फ्लू असू शकतो. पण याही टेस्ट तितक्याशा विश्वासार्ह नसल्याने सध्या एक रॅपिड टेस्ट प्रचलित झाली आहे. ती PCR या टेक्नॉलॉजीवर आधारित असू काही खास प्रयोगशाळांमध्येच ती होते.

H1N1 च्या निदान आणि उपचाराबाबत सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे दिवसागणिक या विषाणूच्या संरचनेत बदल होत त्याचे विविध प्रकारचे स्ट्रेन्स आढळलत आहेत जसे की H1N1, H3N1 and H3N2 इ. शिवाय या टेस्ट खार्चिक असल्याकारणाने सर्वसामान्य रुग्णांना परवडूही शकत नाहीत. त्यामुळे ५००० रुपयांची टेस्ट करण्यापेक्षा ५०० रुपयांच्या गोळ्यांचा उपचार स्वाइन फ्लूची लक्षणं दिसल्यास सुरू करण्याकडे डॉक्टरांचा कल जास्त दिसतो.

भारतातली स्थिती

भारतातलं हवामान या विषाणूच्या वाढीसाठी पोषक आहे. बहुतांश देशात फक्त थंडीच्या मोसमात तग धरणारा आजार भारतात मात्र थंडी आणि पावसाळा या दोन्ही ऋतूत तितकाच सक्षमपणे आपलं डोकं वर काढतो. त्याच्याही पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली वाढती लोकसंख्या, सार्वजनीक ठिकाणची गर्दी,वाहतुकीची कोंडी, अस्वच्छता इ. त्याशिवाय जागरूकतेचा अभाव व आजाराबाबतचं अज्ञान हेही प्रसारासाठी जबाबदार आहेत. विशेष म्हणजे रोगाच्या नावामुळे,फक्त डुकरांमार्फतच त्याचा प्रसार होतो, असा कित्येकांचा समज आजही आहे.

स्वाइन फ्लूवरील उपचारांबाबतची माहिती पुढील भागात घेऊ.

(क्रमश:)

Updated : 13 Oct 2017 7:32 AM GMT
Next Story
Share it
Top