Home > हेल्थ > गुण सांगता... दोषांचे काय?

गुण सांगता... दोषांचे काय?

गुण सांगता... दोषांचे काय?
X

ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थांचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.

सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतड्याची पुरस्सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अॅसिडमुळे आतड्यांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?

आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?

हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पैलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षात परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लिटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहित धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.

आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर १० टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी. सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आर्थिक स्थैर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल, याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.

परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आर्थिक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे. या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.

साखर, मैदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेले पदार्थ असे जर नेहमी आहारात असेल तर ते मोठ्या आजारांना निमंत्रण असते. आहारसेवनाचे दोष, व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बैठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निरर्थक आहेत. पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यामुळे त्यात नोंदवली जाणारी निरीक्षणे काळजीपूर्वक तपासून पाहणं फार महत्त्वाचं असतं. आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवालही आज उपलब्ध आहेत!

मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून केवळ अमूक एक अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही. ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद असे कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे. या संदर्भात आयुर्वेद काय सांगते, ते पुढील भागात सोदाहरण पाहू.

डॉ. सतीश सूर्यवंशी

(क्रमश:)

Updated : 22 Sep 2017 10:10 AM GMT
Next Story
Share it
Top