Home > हेल्थ > ‘गुणी’ आहाराची करा पारख

‘गुणी’ आहाराची करा पारख

‘गुणी’ आहाराची करा पारख
X

सो कॉल्ड गुणकारी आहारघटक हे प्रत्येक व्यक्तीला गुणकारी ठरतातच, असे नाही, हे आपण मागच्या भागात पाहिले. उत्पादनांचे ढोल पिटताना पदार्थाचे आरोग्यधोके कंपन्या कसे लपवतात आणि हा प्रश्न केवळआरोग्यापुरताच मर्यादित नसून तर त्याला आर्थिक पैलूसुद्धा आहेत, हेही त्यात विशद केले होते. मुद्दा आपल्या मातीत तयार झालेले व आपल्या मातीत तयार न झालेले आहार घटक यांचा आरोग्याला कसा उपाय वा अपाय होतो, हे आयुर्वेदाने चंगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. आजच्या भागात त्याबद्दल सांगतो.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वांचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून, असे आयुर्वेदात म्हटले आहे. परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जाते.

आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की. आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे अनेक शोधनिबंधांतून स्पष्ट केलं गेलंय.

हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चिमात्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, पॉलिश्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चिमात्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टूथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टूथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत!

यांनीच आपल्या मागच्या दोन पिढ्यांना वनस्पती घी खायला घालून विविध विकारांचे रुग्ण बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले आहेत.यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत.यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.

आतापर्यंतचा अनुभव असाच आहे की पाश्चात्त्यांची आहारविहाराशी निगडित आरोग्यासंबंधीची मते हरघडी बदलत असतात. त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? वास्तविक आयुर्वेदासारखे संपन्न शास्त्र आहारविहार हाच अभ्यासाचा पाया मानते. तंत्रज्ञानाने विकार ‘बरे’ करण्यापेक्षा आहाराविहारात योग्य सुधारणा करून विकारामागचे ‘कारण नाहीसे’ करण्यावर यात भर असतो. आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे ते भारतीय म्हणूनच निरामय जीवनाबाबत सक्षम व स्वावलंबी आहेत, हे ध्यानात ठेवणे श्रेयस्कर.

डॉ. सतीश सूर्यवंशी

Updated : 29 Sep 2017 2:30 AM GMT
Next Story
Share it
Top