व्हा माइंडफूल !

 

माइंडफूलनेस या विषयावर सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमधून त्यावर लेख आणि संशोधन सादर केलं जातंय. यावर प्रकाश टाकत आहेत प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ राजेंद्र बर्वे.

माइंडफूलनेस ही संकल्पना आपल्या देशात रुजवण्यासाठी मी डॉक्टर राजेंद्र बर्वे गेली ३५ वर्षे या क्षेत्रात काम करीत आहेत. जगातल्या २५ टक्के लोकांना मनोविकार तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे हा WHO चा अहवाल आहे. आपल्याकडे त्यासाठी अनेक मार्ग आहेत पण मग माइंडफूलनेसच का?  कुटुंबात कलह आहे, अपघात होत आहेत, आत्महत्या वाढत आहेत. कमालीची अस्वस्थता आणि बेचैनी दिसते. रस्त्यावर निघणारे मोर्चे, आंदोलने आणि त्यांना लागणारं हिंसक वळण हे त्याचं द्योत्यक आहे. आपली संस्कृती, रूढी, परंपरा याचा आपल्याला अभिमान आहे आणि या रूढी परंपरामध्ये आपण खूप गुरफटून गेलो आहोत. आपल्याकडे संस्कृती आणि वेगवेगळ्या रुढींमध्ये त्याचं समाधान आहे असंच आपण आतपर्यंत मानून आहोत. तरी सुद्धा हे प्रकार का घडत आहे. समाजात एकही मोठा सोशल लीडर नाही, हे सुद्धा एक त्याच कारण आहे. (लीडरशीप क्रेडीबल नाही) समाज मनाचा दुभंग आहे. व्यक्तीगत पातळीवर आपण वेगळच काही पाहतो, समाजात मात्र त्याबाबत आपला दृष्टीकोन फार वेगळा असतो. एकमेकांबाबतची सहानभुती कुठे तरी दबली गेली आहे. म्हणून ही माइंडफुलनेसची चळवळ, सामाजिक बदलाकडे टाकलेलं ते एक ठाम पाऊल असू शकतं.

शारिरीक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष देतो, व्यायाम करतो, नियमित तपासणी करून घेतो. शेड्युल व्यवस्थीत पाळतो, स्पा आणि वेलनेसचे पर्यायसुद्धा चाचपतो. पण मानसिक आरोग्याचं काय?  मानसिक आरोग्यालासुद्धा तुमच्या शारिरीक आरोग्याएवढ्याच काळजीची गरज आहे. किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज असते आणि ती पूर्ण करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे माइंडफूलनेस…

आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत १०० टक्के स्वतःला वाहून घेणे, आलेला प्रत्येक क्षण १०० टक्के जगणे ही त्याची ढोबळ मानानं असेलेली कल्पना. खरं तर हा माइंडफूलनेस हा शब्द आपल्याकडे विदेशातून आलेला असला तरी ही मुळ संकल्पना आपल्याच देशातली आहे. त्याची पाळंमुळं ही भगवद्गीता आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळातली आहेत. विपश्यना हा त्याच मूळ आधार किंवा गाभा आहे. पण, त्यावर जगभरात वेगवेगळ्या लोकांनी सखोल संशोधन करून आजची माइंडफूलनेस ही संकल्पना रुजवली आहे.

खरंतर ध्यानधारणा आणि माइंडफूलनेस या एक प्रकारे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटल जातं. पण त्यात द्राक्ष आणि वाईन एवढा फरक आहे. जसं द्राक्ष खाताना आणि वाईन पितांना वेगवेगळे अनुभव येतात तसेच वेगवेगळे अनुभव ध्यानधारणा आणि माइंडफूनेसमध्ये आहेत. द्राक्ष हे फळ आहे तर वाईन हा त्याचा अर्क आहे. तसंच माइंडफूलनेस हा ध्यानधारणा आणि विपश्यनेचा एक प्रकारे अर्क आहे. पण माइंडफूलनेस होण्यासाठी किंवा जगण्यासाठी ध्यानधारणा (मेडीटेशन) ही पहिली पायरी आहे.

पण दुर्दैवानं जगभरात ध्यानधारणा (मेडिटेशन) या गोष्टीला सर्व धर्मांनी किडनॅप केलंय. धार्मिक गुरू आणि वेगवेगळे बाबा, बुवांनी त्याला कर्मकांडाच स्वरूप देऊन सिमीत केलंय. पण खरं सांगतो माइंडफूलनेस ही जगातली सर्वात धर्मनिरपेक्ष संकल्पना आहे. जिला शास्त्रीय आधार आहे आणि तो आधार संशोधनातून सिद्ध करण्यात आला आहे.

माइंडफूलनेस हे कुणालाही शिकवता येऊ शकतं. कुणीही शिकू शकतं आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर करू शकतं. ते एक स्किल आहे. त्यासाठी कुठल्याही धार्मिक अनुष्ठान किंवा बैठकीची गरज नाही. कुठल्याही मुद्रेची गरज नाही. गरज आहे ती फक्त ताठ बसण्याची आणि दिवसातले २० मिनीटं स्वतःसाठी देण्याची. ताठ बसल्यानं फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्यात कुठलाही दैवी चमत्कार नाही. दररोज माइंडफूलनेसची प्रॅक्टीस करणारा माणूस हा त्याच्या आयुष्यात जास्त फोकस, जास्त ऍक्टीव्ह, एनर्जेटीक आणि स्ट्रेस फ्री असल्याचं संशोधन सांगतं.  (बरेचदा लोकं करत असेलली ध्यानधारणा ही गुरूनं सांगितल्यामुळे केली जाते. पण, स्वतःसाठी म्हणून असं कुणी करत नाही. त्याचं पूर्ण आकलन नसतं. बरेचदा कर्मकांडामध्ये आकलन हरवून जातं, बरेचदा त्याची पद्धती आणि योग्य-अयोग्यता याचीच जास्त चर्चा होते.)

अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेस्ट्स विद्यापीठातल्या जॉन कोबाट-झिन यांनी या संकल्पनेवर सखोल संशोधन केलंय. गंभीर आजार असलेले रुग्ण, विद्यार्थी, कैदी अशा अनेक लोकांवर त्यांनी माइंडफूलनेसचे प्रयोग केले. त्यातून त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाची निरीक्षणं नोंदवली. महत्त्वाची निरीक्षण म्हणजे प्रयोग केलेली माणसं तणावमुक्त झाली होती, त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेत सकारात्मक बदल झाल्याचं दिसून आलं. १९७९ मध्ये कोबाट यांनी हे संशोधन केलं. त्यासाठी योगा आणि विपश्यनेची सांगड घातली.

दलाई लामांनी याबाबत पुढाकार घेत बुद्धीष्ट तत्वज्ञान आणि प्रगत शास्त्रज्ञ यांच्यात चर्चा घडवून आणली. दररोज ध्यानधारणा करणाऱ्या लोकांचा मेंदू हा जास्त तल्लख असतो, तो वेगळ्या प्रकारे काम करतो. हे सिद्ध करण्यासाठी काही बौद्ध भिक्कुंवर विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग केले. या मेडीटेशन करणाऱ्या बौध्द भिक्कुंच्या मेंदुच्या एमआरआयमधून ही बाब आणखी स्पष्ट झाली. माइंडफूलनेस हे एक विज्ञान आहे, ती एक प्रभावी जीवन पद्धती आहे. यांचा ना कुठल्या धर्माशी संबंध आहे ना कुठल्या पंथाशी. माइंडफूलनेस हे पूर्णपणे मानवी विज्ञान आहे.

मॅथ्यू रिकार्ड नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञानं तर त्याचं अख्खं आयुष्यच माइंडफूलनेससाठी वाहून घेतलंय. त्यांनी त्यात  आणखी संशोधन केले. त्यानंतर सर्वांचा त्याग करून हिमालयात बौध्द भिक्कू म्हणून राहणं त्यांनी पसंत केलं. मॅथ्यू रिकार्ड जगातले सर्वात आनंदी व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

ब्रिटीश पार्लमेंटनं माइंडफूलनेसवर चर्चा करून व्हाईट पेपर काढलाय. आरोग्य, शिक्षण, गुन्ह्यांची संख्या कमी करणं आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचा कशा पद्धतीनं वापर करता येऊ शकतो त्याचा त्यात उहापोह करण्यात आलाय. २००४ पासून अमेरिकेमध्ये त्यांच्या सैन्याला माइंडफूलनेसचं ट्रेनिंग सुरू केलंय. युद्धजन्यस्थिती, नैसर्गिक आपत्ती, आणिबाणीच्या काळात माइंडफूल माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. या काळात अनेकदा माणसाला शारिरीक आणि मानसिक त्राणाला सामोरं जावं लागतं, कित्येकदा जवळच्या माणसांना गमवावं लागतं. विचित्र प्रसंग ओढवतात, तेव्हा गरज असते ती खंबीरपणे उभं राहण्याची आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची. माइंडफूलनेस बरोबर याच ठिकाणी त्याचं काम करतो आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो.

माइंडफूलनेस या विषयावर जगात एवढी चर्चा सुरू असतांना ते नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी “वर्ल्ड इकनॉमिक फोरम” ने जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या त्यांच्या वार्षिक सभेत रिचर्ड डेव्हीडसन आणि थॉमस इन्सेल या आंतरराष्ट्रीय तज्ञांना पाचारण केले होते.

कसं व्हाल माइंडफूलनेस?

आपण बरेचदा भूतकाळात जगत असतो किंवा भविष्यकाळाचा विचार करीत बसतो. प्रत्यक्ष समोर आलेला क्षण जगतांनासुद्धा आपण त्या क्षणापेक्षा त्याच्याशी संबंधित गोष्टींचा अर्थ आणि संबंध भुतकाळात किंवा भविष्यकाळात शोधण्यात जास्त रस असतो. फार कमी माणसं असतात जी, आहे त्या क्षणात १०० टक्के वर्तमानकाळाचा विचार करून जगतात. साधं उदाहरण घ्या, आपण एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासह जेवणासाठी गेलो आहोत आणि तिथं गेल्यावर आपली चर्चा सुरू होते ती आधी आपण काय खाल्लं, आधी कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, इकडे काय मिळतं, तिकडे काय मिळतं. किंवा यानंतर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. अर्थात हे वाचत असतांना तुमच्या मनात याबाबचे विचार आलेच असतील. खरंच आले असतील तर हे माईंडफुलनेस तुमच्यासाठीच आहे. सोप्पं आहे, माइंडफूलनेस म्हणजे समोर असलेल्या क्षणात १०० टक्के जगणे, त्यावेळी भुतकाळ किंवा भविष्याचा विचार न करणे. समोर आलेल्या क्षणाचे गुण किंवा दोष न शोधता त्याला सामोरं जाणं. तो क्षण जगत असतांना खंत, दुःख, पश्चाताप यांचा विचार मनात न आणता फक्त त्या क्षणाचाच विचार करणे. पुन्हा आपण तेच रेस्टॉरंटमधलं उदाहरण घेऊया. कुटुंबियासोबत जेवण करतांना आपण तिथल्याच जेवणावर चर्चा करणं, त्याची चव, सुगंध, व्हरायटी याचा पुरेपर आस्वाद घेणं. तिथे सुरू असलेल्या संगीताचा आनंद घेणं. वातावरणात रमून जाणं म्हणजेच माईंडफुलनेस किंवा तुम्ही तो क्षण माइंडफुली जगत आहात.

ड्रायव्हींग लायसन मिळालं म्हणजे माणूस चांगला ड्रायव्हर होत नाही, तर गाडी चालवतांना अपघात होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे माईंडफूलनेस आहे. तुम्ही एक वायुसैनिक आहात आणि युद्ध लढत आहात, त्यावेळी तुमच्या जवळच्या सहकाऱ्याचे मृतदेह विमानातून नेण्याची तुमच्यावर वेळ आलीय, पण या स्थितीतही तुम्ही तुमचं मन स्थिर ठेवून सर्व काही सुरळीत करत आहात म्हणजेच ते माइंडफूलनेस आहे. माईंडफूलनेस लोकांना शिकवता येऊ शकतं. ते एक स्किल आहे. ते केव्हाही करता येतं. वाचतांना, झोपतांना, चालतांना, बोलतांना, केव्हाही याचा वापर करता येतो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे खंर आहे सगळं, पण मन माइंडफूल तरी कसं करायचं, माझं मन तर चचंल आहे. सतत नाना प्रकारचे विचार त्यात येत असताता. ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. याच उत्तर तुमच्या या चंचल मनातच आहे. कारण तुम्ही माइंडफूल आहात म्हणूनच तुम्हाला तुम्ही चंचल असल्याचं कळतंय. गरज आहे ती त्या माइंडफूलनेसला राईट ट्रॅकवर आणण्याची.

कसं आणायचं मन राईट ट्रॅकवर, याचं गुपित दडलंय फक्त २० मिनिटांमध्ये. फक्त दिवसातल्या २४ तासातले २० मिनिटं स्वतःसाठी द्यायचे आहेत. या २० मिनिटात डोळे मिटून ताठ बसायचं आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रीत करायचं. मनात वेगवेगळे विचार येत असतील मन चंचल होत असेल तर होऊ द्या. हळूहळू ते श्वासावर लक्ष केंद्रीत करायला शिकेलच. किमान २ महिने ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुमचं मन माइंडफूल होत आहे. तुमच्या कामात, वागण्यात त्याचा नक्कीच फरक जाणवेल.

वर वर हे सगळं सोपं असलं तरी त्यासाठी सर्वात आधी मनाचं स्वच्छतीकरण करणं गरजे आहे. माइंडफूलनेस होण्यासाठी मनाची पाटी कोरी असायला हवी. आणि त्यासाठीच इथे खरी गरज निर्माण होते ती मनोविकार तज्ज्ञांची. कारण पूर्वग्रहदुषित मनासह तुम्ही माइंडफूल निव्वळ अशक्य आहे.