डॉक्टरांवरील हल्ल्यांना व्यवस्थाच जबाबदार

8096

एखादी घटना रोज घडते तेव्हा ती बातमी रहात नाही. म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. असंच काहीसं झालंय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि डॉक्टरांचं. एकाचा जीव निसर्गाच्या लहरीपणामुळे जातोय तर, दुसऱ्याच्या जीवावर लोकंच उठलेत आणि दु:खद बाब म्हणजे सरकार या दोन्हीवर उपाय देवू शकलेलं नाही. चालू आहेत त्या फक्त चर्चा.

महिनाभराच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात धुळे शासकीय रुग्णालय, नाशिक सामान्य रुग्णालय आणि मुंबईतील सायन रुग्णालय या तीन ठिकाणी डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या. हे  तीनही हल्ले शासकीय डॉक्टरांवर झालेत. असंही डॉक्टरांवर झालेले सर्व हल्ले हे शासकीय रुग्णालायातच होतात, हे मागील घटनांवरुन सहज लक्षात येतं, याचं कारण शोधायचं झालं तर, आपले लोक शासकीय यंत्रणा ही दुय्यम समजून वावरत असतात हे काही वेगळं सांगायला नको. एखादी गोष्ट, ठिकाण सरकारी असेल तर तिथे वावरतांना शिस्तीची आजिबात आवश्यकता नसते, असा खोल समज आम्हां भारतीयांच्या डोक्यात आहे. हे यासाठी सांगतोय कारण, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रुग्णासोबत फक्त दोनच नातेवाईकास रहाण्यास परवानगी आहे. ही गोष्ट खासगी रुग्णालयात पाळली जाते मात्र, शासकीय रुग्णालायात यावर कुठेही नियंत्रण दिसत नाही. कुठे शिस्त लावण्याच्या प्रयत्न झाला तर लोक विरोध करतात.

शासकीय रुग्णालयात फिरतांना जाणवेल की, रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना गराडा घालून आहेत आणि डॉक्टर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. बऱ्याचवेळा हेच प्रश्न परत परत प्रत्येक नवीन नातेवाईक येऊन विचारत असतो. अशावेळी डॉक्टर कामावर लक्ष देणार की, नातेवाईकांसोबत केबीसी खेळणार?. ज्या गोष्टी नातेवाईकांना सांगणे आवश्यक आहे त्या तर डॉक्टर सांगताताच.

समोर आलेल्या बहुतांश घटना या निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आहेत. शासकीय रुग्णालायात 24*7 हे डॉक्टर कार्यरत असतात. रुग्णांची वाढती संख्या आणि कमी असलेलं डॉक्टरांचं संख्याबळ यातून नको त्या घटना घडतात.

निवासी डॉक्टारंना पुरेशी झोप मिळत नाही. जेवनाच्या वेळा अनियमीत असतात. यात कामाचा अखंड ताण यातून बऱ्याच ठिकाणी MDR-TB सारख्या रोगांची शक्यता वाढते आणि अनेक ठिकाणी डॉक्टरांचा मृत्यु झाल्याच्याही घटना ताज्या आहेत. त्यामध्ये नातेवाईवाकांचे अनपेक्षित हल्ले (अशा मनस्थीतीत या जगाच्या पाठीवर कोणाच्या तोंडून फुलं पडणार आहेत ? एका पातळीनंनतर हे सहन करण्याच्या पलिकडे जातं आणि यातून अनेक निवासी डॉक्टरांनी आत्महत्यासुद्धा केल्या आहेत. या गोष्टी कुणीच गांभीर्याने घेत नाही.) कधी संवादाची जागा विसंवादाने घेतली जाते आणि रुग्णांचे नातेवाईक काम करणाऱ्या डॉक्टरांवर राग काढतात. बऱ्याच वेळा खासगी रुग्णालायात पैसे खर्च करुन नंतर क्षमता संपलेले रुग्ण खासगी रुग्णालायात येतात. अशावेळी बाहेरचा राग शासकीय डॉक्टरांवर निघतो हे ही पहायला मिळतं.

अशावेळी रुग्णालायातल्या अपुऱ्या सुरक्षेबद्दल बोलंल जातं हे खरं आहे. काही मोजके रुग्णालयं वगळता इतर ठिकाणी सुरक्षेच्या नावाने बोंबच आहे आणि असंही हल्ल्याच्या गोष्टी काही ठरवून होत नाहीत, त्यामुळे सुरक्षारक्षक जागेवर येईपर्यंत डॉक्टरचा डोळा गेलेला असतो.

डॉक्टरांवरचा हल्ला कधीच, कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही. तरीही लोकांकडून आरोप होतात, “डॉक्टर खूप लुटतात. असंवेदनशील असतात, यांना असंच ठोकलं पाहीजे”. पण सर्वजण विसरतात तो ही एक माणुसच आहे. जवळची व्यक्ती गेल्याचं दु:ख जसं नातेवाईकांना असतं, तसं आपण रुग्णाला वाचवू शकलो नाही याची खंत त्यालाही असते.

अलीकडे या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. घटना घडली असता यावर वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा होतात. निवासी डॉक्टरांची संघटना संप करते, पण ठोस पाऊल कुठेच पडताना दिसत नाही. परत परत या घटना फक्त मार खाणाऱ्या डॉक्टरांचं नाव बदलून घडत असतील तर कुठेतरी यावर MARD सारख्या संघटना, राज्य सरकार आणि माध्यमांनी ठोस सकारात्मक पाऊलं उचलायला हवीत.

कामाचा भार केवळ ज्युनीयर डॉक्टरांवर न टाकता कामाच्या तासाचे वाटप व्हायला हवे, म्हणजे अत्यावश्यक सेवेत काम करत असतांना निवासी डॉक्टरांना पुरेसी झोप मिळेल, जेवायला वेळ मिळेल. त्यातून डॉक्टरांवरचा ताण कमी होऊन अशा घटना कमी होण्यास मदत होईल.

रुग्णालयात रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांवर रुग्णालय प्रशासनाने बंधनं घातली पाहिजेत. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. यामुळे रुग्णेत्तर लोकांची रुग्णालायातील गर्दी कमी होईल आणि डॉक्टरांच्या अंगावर येणाऱ्यांचं बळ कमी होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे Doctors Protection Act जो डॉक्टरांना संरक्षण देण्याकरीता आहे, त्याची रुग्णालयात गर्दीच्या ठिकाणी छायाचित्रांच्या स्वरुपात जाहीरात व्हायला हवी. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप कमी होणार नाही पण, कायद्याची भीती ही घटनेची तीव्रता कमी करण्यास नक्कीच मदत करेल.

या सर्व गोष्टींविषयी बोलतांना एक गोष्ट अधोरेखीत केली पाहिजे की, डॉक्टरांना देव मानणाऱ्या लोकांची संख्या समाजात अजुनही कमी झालेली नाही. डॉक्टर-रुग्ण या नात्याला डाग लावण्याच्या काही घटना समाजात घडत आहेत याचं तीव्र दुख आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत असतांना तरुण डॉक्टरांनी जबाबदारीने वागत डॉ. कोटणीस, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. साधना आमटे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांसारख्या समाजासाठी वाहून घेतलेल्या डॉक्टरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास नक्कीच रुग्णांचे प्रेम आणि विश्वास जी डॉक्टरांची संजीवनी आहे ती त्यांना अखंड मिळत राहील.

डॉ. संदेश पुं. कदम

7208914048