Home मॅक्स ब्लॉग्ज हमारा बजाज….

हमारा बजाज….

794
0
Rahul Bajaj
Courtesy: ET Now
Support MaxMaharashtra

बुलंद भारत की बुलंद तस्वीर.. हमारा बजाज… हे जिंगल ऐकत ऐकत मोठं झालेल्या पिढीला बजाज यांनी आणखी एक शिकवण दिलीय, ती म्हणजे निर्भय बनो ! फारच कमी उद्योजक सत्तेला प्रश्न विचारायचं धाडस करतात. सत्तेच्या मर्जीवर उद्योग अवलंबून असल्याने सत्तेने कितीही चाबकाचे फटकारे मारले तरी हसत हसत व्वा व्वा करणाऱ्यांची काही कमी नाहीय.

व्यापारी आहोत, पंगा कशाला घ्यायचा. पैसे कमवायचे, गप्प बसायचं. निवडणुका आल्या की सगळ्यांना पैसे वाटायचे, निवडणुका संपल्या की वसूल करायचे असा काहीसा व्यवहार आहे. त्यामुळे सरकार नीट चाललंय की नाही, त्यात मुलभूत हक्काच्या, स्वातंत्र्याचा काही विषय आला तर त्यावर काही बोलायचं नाही असे काही अलिखित नियम उद्योग क्षेत्राने घालून घेतलेले आहेत. जसं पूर्वी सिनेक्षेत्र राजकीय-सामाजिक घटनांवर अजिबात मतप्रदर्शन करत नसे, तसंच उद्योजकांचंही होतं. हा प्रघात काही लोकांनी मोडला. सध्याच्या काळात राहुल बजाज यांनी हे काम केलंय.

देशाची अर्थव्यवस्था मोडकळीला आलीय. असं असलं तरी सरकार मानायला तयार नाही. जीडीपीचे आकडे हे त्याचं मानक आहे. मात्र त्या आकड्यांचं स्पष्टीकरण सरकारी पक्षाकडून अतिशय आश्वासक पद्धतीने मांडलं जातंय. म्हणजे ब्लड रिपोर्ट नीट आलेले नसले तरी रूग्णाची प्रकृती उत्तम आहे, आणि डॉक्टर किती चांगला आहे यावर स्तुतीगान करत बसण्यासारखा प्रकार आहे हा. रूग्ण खंगतोय-मरतोय याच्याशी काही देणं-घेणं नाही, पण डॉक्टरला दुखवायचं नाही अशा भूमिकेत देशातले अधिकारी, राजकीय पक्ष, माध्यमं आणि पाळलेले अर्थतज्ज्ञ आहेत.

हे ही वाचा…

देशातल्या मिडीयाने तर सरकारचे तळवे चाटण्याची स्पर्धाच लावली आहे. सरकारच्या विरोधात कसलीच भूमिका घ्यायची नाही, धोरणांवर काहीच बोलायचं नाही, मात्र प्रत्येक गोष्टीसाठी सध्याचा विरोधी पक्ष कसा जबाबदार आहे हे सांगत राहायचं यातच माध्यमं गुंग आहेत. माध्यमांचं अर्थकारण यावर अवलंबून असल्याने त्यांनी सरकारला दुखवायचं नाही अशीच भूमिका स्वीकारलेली आहे. माध्यमांना समाजमनाचा आरसा मानलं जातं, मात्र हा आरसाच धुळीने माखलेला आहे. त्यामुळे त्याला समाजमन दिसत नाहीय. सरकार लोकांना हाच आरसा दाखवून समाजमनच कसं धुळीने माखलेलं आहे, बाकी सगळं स्वच्छ असल्याचं सांगतंय. आता हा आरसा फोडून टाकायची वेळ आली आहे.

बजाज यांनी हाच आरसा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी थेट सत्तेला प्रश्न विचारला आहे. त्यांनी सत्तेला जागा दाखवून दिली आहे. देशात भयाचं वातावरण आहे. मागच्या सरकारवर टीका करता यायची, या सरकारवर तशी टीका केली तर ती सकारात्मक पद्धतीने घेतली जाईलच अशी स्थिती नसल्याची खंत ही बजाज यांनी व्यक्त केली आहे. या आधीही बजाज यांनी अशी टीका केली होती, त्यावरून गोंधळ उडाला होता. तरीही बजाज यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. सरकारला प्रश्न विचारला आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पियुष गोयल स्टेजवर असताना बजाज यांनी विचारलेल्या प्रश्नावर अमित शहा यांनी भीतीचं कसलंच वातावरण नसल्याचं सांगीतलंय. जी साफसफाई व्हायची ती झालीय असं ही सांगीतलंय. अमित शहा कुठल्या दुनियेत वावरतायत मला माहित नाही, पण त्यांचा अनुभव, आवाका, अधिकार, जनसंपर्क बघून दोन गोष्टी झाल्या असाव्यात असा माझा समज आहे. एक – त्यांना खुशमस्कऱ्या लोकांनी घेरलंय आणि दोन – त्यांना वास्तव मान्य करायचं नाही.

अमित शहांपेक्षा कमी लोकांना मी भेटतो, त्यांच्या कडून जी माहिती मिळालीय त्यावरून उद्योग, अर्थ क्षेत्रात अजूनही प्रचंड भीतीचं वातावरण आहे. कधी बाजारातून दोन हजाराच्या नोटा गायब होणं, त्यानंतर या नोटा बंद होणार असल्याच्या अफवा येणं, जमीनींचे व्यवहार आधार लिंक होणं, एका माणसाला एकच प्रॉपर्टी खरेदी करता येणार अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल असणं, मोदी का मास्टरस्ट्रोक अशा सिरीज खाली काले पैसे वालों पर होगी कारवाई अशा आशयाच्या पोस्टच्या माध्यमातून सामान्य उद्योजकांमध्येही भीती पसरवणं, कधी सोनेबंदी होणार-कधी घर खरेदी बंदी होणार अशा बंदीच्या बातम्यांमुळे सामान्य गुंतवणुकदार धाडस करायचा विचारच करत नाहीय.

रिजर्व बँकेकडून सरकारने घेतलेले पैसे यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता सगळ्यांनाच वाटायला लागलेय. भक्तांना यातही मास्टरस्ट्रोक दिसत असल्याने मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थेला स्ट्रोक आलाय. भक्तांनी मोदी सरकारचं जितकं नुकसान केलंय तितकं विरोधी पक्ष कधीच करू शकला नसता.

आर्थिक क्षेत्राच्या बाहेर विचार करायचं म्हटलं तर 370, राममंदिर यानंतरच्या शांततेतल्या तणावात सगळे जण सामान्य स्थितीची वाट बघतायत. रोजचा दिवस हुश्श हुश्श करून काढायचा. तुमचे झटके देणं संपलं असेल तर सगळं स्थिरस्थावर झाल्याची ग्वाही द्या. विरोधी पक्षांना तुम्ही धूळ चारलेली आहेच. आता कोणी विरोधी पक्ष नाही, मग विरोधी पक्षांच्या नावाने भूई का धोपटत बसलाय.

शांतपणे काम करा, आश्वासक काम करा, नकारात्मक काम करू नका. सामाजिक-जातीय-धार्मिक-आर्थिक सौहार्द जपणं ही सरकारची जबाबदारी आहेत. द्वेष आणि ममत्व भाव न ठेवता सरकार चालवायची तुम्ही शपथ घेतली आहे. अदानी-अंबानींना विशेष ममत्व आणि बाकीच्यांचा द्वेष लपून राहिलेला नाही. आरसा बरबटलेला असला तरी लोकांना स्वच्छ दिसतंय सगळं. बुलंद भारत की बुलंद तस्वीर खुजेपणाची भूमिका घेऊन उभारता येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही.

– रवींद्र आंबेकर


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997