गोविंद पानसरे हत्याप्रकरणात कळसकरला अटक 

गोविंद पानसरे हत्याप्रकरणात कळसकरला अटक 

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी असलेल्या शरद कळसकर याला कोल्हापूर “एसआयटी’ने अटक केली आहे. त्याला नायायालयाने 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पानसरेंच्या हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या बंदुकीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी शरदला देण्यात आली होती अशी माहिती एसआयटीने कोल्हापूर न्यायालयात दिली. 
कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात एसआयटीने तपासात आठ आरोपींची नावे समोर आणली होती. यापूर्वीच सात आरोपींना अटक करण्यात आली होती. विनय पोवार आणि सारंग अकोळकर हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. पानसरे हत्येपूर्वी कळसकर हा कोल्हापूरमध्ये वास्तव्य करत होता. शरद कळसकर हा औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद तालुक्‍यातील केसापूर गावाचा रहिवाशी आहे.
शरद कळसकर याने बेळगाव आणि कोल्हापूर येथे पिस्तूल तयार करण्यासाठी प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने तयार केलेल्या पिस्तूलाचा वापर या गुन्ह्यात झाला आहे का? याबाबत सुद्धा तपास करणे गरजेचे आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल घटनेपूर्वी कोणाकडे ठेवले होते. कोल्हापूरमध्ये कोणी आणि कोणाकडे आणून दिले? याचा शोध घ्यायचा आहे. यासाठी कळसकरच्या पोलिस कोठडीची आवश्‍यकता आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.