महिला बचतगट मेळाव्यासाठी ५५ लाखांचा शासकीय निधी; पण रंगला लावणीचा ठेका

महिला बचतगट मेळाव्यासाठी ५५ लाखांचा शासकीय निधी; पण रंगला लावणीचा ठेका

124
0
शासकीय निधीतून बचत गटाची प्रदर्शनी आयोजित केलेली असताना देखील या प्रदर्शनीत स्थानिक लोकप्रतिनीधी स्वतःचा उदोउदो करून घेत आहेत. शिवाय राजकीय भाजप पक्षाचे झेंडे आणि बॅनर ही या ठिकाणी लावण्यात आले असून हा मेळावा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा चमकोगिरीचा प्रयत्न होय असेच चित्र दिसुन येत आहे. त्यातच गौरी आवाहनच्या दिवशी या ठिकाणी बाया नाचविणे म्हणजे मातृशक्तीचा अपमान असल्याचा आरोप खामगाव नगर पालिकेच्या काँग्रेस गटनेत्यांनी केलाय.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे शासकीय निधीतून महिलांचा बचत गट मेळावा आयोजित केला आहे. यासाठी शासनाकडून 50 ते 55 लाखांचे टेंडर ही मजूंर करण्यात आलंय. शासकीय निधीतून हा कार्यक्रम होत असला तरी माजी कृषी मंत्री स्व.पांडुरंग फुंडकर यांच्या जयंती निमित्त हा मेळावा घेण्यात येत असल्याचा प्रचार सत्ताधारी करीत आहेत.
पहिल्याच दिवसापासून या प्रदर्शनात आलेल्या गोरगरीब महिलांची हेळसांड सुरु असून महिलांच्या भावनांशी खेळ सुरु आहे. प्रदर्शनाला आलेल्या महिला बचत गटांना कोणतीही सुविधा न देण्यात आल्याने पावसामुळे महिलांच्या मालाची मोठ्या प्रमाणात नासाडी झालीय. तर काही महिला सुविधा नसल्याने स्टॉल न लावताच परतल्या. त्यामुळे या ठिकाणी प्रदर्शनातील 130 पैकी फक्त 24 स्टॉल राहिले आहेत. अशातच लोकांनीही या बचत गटाच्या प्रदर्शनीकडे पाठ फिरविली आणि लावणीसाठी गर्दी जमली.
शासकीय निधीतून बचत गटाचा प्रदर्शनी मेळावा की लावणीचा फड हा प्रश्न उपस्थित होतो. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे. तरच जनतेच्या पैशावर आपली पोळी भाजून घेणाऱ्यांना चाप बसेल…