Home News Update Global Update: जगात चाललंय तरी काय, थोडक्यात आढावा ..

Global Update: जगात चाललंय तरी काय, थोडक्यात आढावा ..

221
0
Courtesy: Social Media
जगातल्या विविध देशांमध्ये सध्या काय घडामोडी होत आहेत याचा आढावा आपण घेऊ या थोडक्यात
रशिया
Support MaxMaharashtra

रशियाचे (Rusiya) अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी अचानक घटनादुरस्ती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पंतप्रधान दिमीत्री मेदवेदेव यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मेदवेदेव यांना तातडीनं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमण्यात आलंय. रशियामध्ये अध्यक्षांकडे अमर्याद अधिकार आहेत. पंतप्रधानांची नियुक्ती, मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात. मात्र घटनादुरुस्तीच्या माध्यमातून पंतप्रधान, संसद आणि सुरक्षा समितीचे अधिकार वाढवण्याचे संकेत पुतिन यांनी दिलेत. गेल्या २० वर्षापासून पुतिन यांची रशियावर एकहाती सत्ता आहे. २०२४ मध्ये पुतिन यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपतोय. रशियन घटनेनुसार एका व्यक्तीला फक्त दोच वेळा अध्यक्षपदी राहता येतं. त्यामुळे दीर्घकाळ सत्तेवर राहण्यासाठी पुतिन यांनी घटनादुरुस्तीचा निर्णय घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

त्यामुळे भविष्यात व्लादिमिर पुतिन हे एकतर पंतप्रधान होतील किंवा कझाकिस्तान, इराणप्रमाणे ते देशाचे सर्वोच्च नेते म्हणून स्वत:ची नियुक्ती करुन घेतील. जेणेकरुन त्यांच्याकडे सत्तेची सूत्र कायम राहतील. गेली दोन दशके पुतिन सत्तेवर आहेत. मात्र क्रिमीया ताब्यात घेतल्यापासून अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर रशियाची अर्थव्य़वस्था खालावली आहे. जनतेचं उत्पन्न घटलंय, त्यामुळे पुतिन यांच्याविरुध्द अनेकदा निर्दशने झाली, मात्र पुतिन यांनी विरोधी आवाज दाबल्याची टिका त्यांच्यावर कायम होत असते.

इराण

कासीम सुलेमानी (Qasem Soleimani) यांच्या हत्येनंतर मिळालेली सहानूभूती इराण (Iran) सरकारने गमावली आहे. युक्रेनचे विमान चूकून पाडल्याची कबूली दिल्यानंतर देशात सरकारविरोधी संतापाची लाट पुन्हा एकदा निर्माण झालीये. या घटनेत विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी ठार झाले होते. यामध्ये कॅनडीयन विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या इराणी तरुणांचा समावेश होता. मात्र इराणी प्रशासन जनतेशी तीन दिवस खोटं बोलत होतं याचा राग नागरिकांमध्ये आहे. सरकाविरुध्द आंदोलन करणाऱ्यांवर तेहरान आणि काही शहरांमध्ये पोलिसांनी गोळीबार केला, त्यामुळे आंदोलन अजूनच पेटलंय. दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवल्याबद्दल इराणी मीडियाने जनतेची माफी मागितलीये. इराणच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. हे आंदोलन थांबलं नाही तर इराणी सरकारपुढं नव्या समस्या निर्माण होवू शकतात.

आर्थिक निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था साफ कोलमडली आहे. महागाईचा दर ४० टक्क्यांवर पोहोचलाय, तर बेरोजगारीने उच्चांक गाठलाय, पेट्रोल,डिजेलचे दर दुप्पट झालेत. त्यामुळे सर्वसामान्य इराणी जनता त्रस्त आहे. इराणच्या पंतप्रधानांनी विमान पाडण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केलीये. मात्र जोपर्यंत पारदर्शक कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा वणवा काही थांबणार नाही हे स्पष्ट आहे.

अमेरिका

इराणमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला असतांना दुसरीकडे मात्र अमेरिकचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यापुढच्या समस्या काही कमी होतांना दिसत नाहीत. कासीम सुलेमानी यांची हत्या का केली, कुठला कट त्यांनी आखला होता? या प्रश्नांचा ट्रम्प यांच्यावर सध्या भडीमार सुरु आहे. मात्र ट्रम्प आणि त्यांचे युध्दखोर परराष्ट्र सचिव माईक पॉम्पिवो यांना या प्रश्नाचं धड उत्तर देता आलेलं नाही. हा निर्णय अमेरिकेला युध्दाच्या खाईत ढकलून देणारा होता. त्यामुळे सुलेमानी यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकन काँग्रेसची परवानगी का घेतली नाही हा प्रश्न उरतोच. दुसरीकडे ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेसने बुधवारी सिनेटकडे पाठवलाय.

डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय कोंडी करण्यासाठी प्रतिनिधी सभागृहाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी हा प्रस्ताव जाणीवपूर्वक अडवून धरला होता. सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे, त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला जाईल हे निश्चित आहे. मात्र सुनावणी दरम्यान या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होणार आहे. त्याचा थेट परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर होवू शकतो. दुसरं म्हणजे महाभियोगाला सामोरे जाणारे तिसरे अमेरिकेन अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची इतिहासात नोंद झालीये.

पाकिस्तान

पाकिस्तानचे (Pakistan) माजी लष्करप्रमुख, राष्ट्रपती परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय. विशेष कोर्टानं दिलेली फाशीची शिक्षा, लाहोर हायकोर्टाने रद्द केलीये. देशद्रोहाच्या आरोपाखाली विशेष कोर्टानं परवेज मुशर्ऱफ य़ांना फाशीची शिक्षा दिली होती. फाशीपूर्वी मुशर्ऱफ मरण पावले, तर त्यांच्या मृतदेहाला फरफटत आणा आणि इस्लामाबादच्या चौकात फासावर टांगा असा धक्कादायक निकाल कोर्टानं दिला होता. माजी लष्करप्रमुखाला देशद्रोही ठरवल्यानं कोर्टाच्या निर्णयावर लष्कराने तीव्र नाराजी व्यक्त केली. लष्कराचा संताप ओळखत, इम्रान खान (Imran Khan) सरकारने या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली.

त्यामुळे निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं विधान करण्याइतपत पाकिस्तान सरकारची मजल गेली. दुबईमध्ये स्थायिक झालेल्या परवेज मुशर्ऱफ यांची फाशी रद्द होणार हे स्पष्ट झालं होतं. पाकमध्ये न्यायालयं आणि सरकारपेक्षा, पाकिस्तानी लष्कर जास्त शक्तिमान आहे. आता फाशीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांचं काय होणार आहे, हे बघावं लागेल. पाकिस्तानमध्ये लष्कराच्या अधिकाराला आव्हानं देणाऱ्यांना त्रास दिला जातो. यापूर्वीही लष्कराच्या ध्येयधोरणांविरुध्द बोलणाऱ्या, लिखाण करणाऱ्या अनेक पत्रकारांचा खून झालाय. तर लष्कराच्या दबावामुळेच न्यायालयानं दिवंगत पंतप्रधान झुल्फीकार भूत्तो यांना फासावर चढवलं होतं.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997