गडचिरोली माओवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड किरणकुमार पत्नीसह महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोली माओवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड किरणकुमार पत्नीसह महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात

हैदराबाद – महाराष्ट्र पोलिसानी प्रमुख माओवादी नेता किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा यांना आंध्र प्रदेशमधून ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात आलीय की त्यांनी आत्मसमर्पण केलंय याविषयी पोलिसांकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.
किरण कुमार हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी (डीकेएसझेडसी) चा सदस्य आहे. तसेच तो महाराष्ट्रातील गडचिरोलीत सक्रीय असलेल्या माओवादी चळवळीचा प्रभारी आहे. गडचिरोलीचा दंडकारण्य विभागात समावेश आहे. हे दाम्पत्य छत्तीसगडमध्ये सक्रीय आहे, त्यांच्यावर प्रत्येकी तब्बल २० लाखांचा इनाम होता.
५७ वर्षीय किरण हा चष्मा घालतो व तो मुळचा विजयवाडा येथील आहे. तो राज्य समिती सदस्य आहे व प्रभात मासिकाचे कामही पाहतो. माओवादाचा राजकीय अंग असलेल्या ‘डीकेएसझेडसी’च्या प्रचार विभाग, माध्यम आणि शिक्षण यांचे देखील तो काम पाहायचा, त्यांला तांत्रिकगोष्टींचे उत्तम ज्ञान होते अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर त्याची पत्नी नर्मदा ऊर्फ अलारी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का ही कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील आहे. २२ वर्षांपासून ती भूमिगत होती. मे महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात (आयईडी) १६ जणांचा मृत्यू झाला होता ज्यामध्ये १५ जवानांचा समावेश होता. हा स्फोट घडवण्यात किरण कुमारचा हात होता.

कोण आहे नर्मदाक्का ?

दंडकारन्य झोनल कमिटीची सदस्य असलेली नर्मदाक्का अनेक नक्षली घटनांची मास्टरमाइंड होती. नर्मदाक्काचे खरे नाव अल्लुरी उषा राणी असुन ती आंध्र प्रदेश येथील गुरवडा येथील रहिवासी आहे. वयाची पासष्टी पुर्ण असणारी नर्मदाक्का एके 47 चालवायची. तिच्यावर पंचवीस लाखांचे बक्षिस होते. आज तिला अहेरी नंतर गडचिरोली येथे आणण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. अधिकृतरित्या पोलिसांनी स्टेटमेंट आलेले नसले तरीही नर्मदाक्का पती किरणकुमार सोबत पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहीती आहे.