Home मॅक्स ब्लॉग्ज धूसर राजकीय पिढीचा दमदार नायक !

धूसर राजकीय पिढीचा दमदार नायक !

1543
0
courtesy - social media
Support MaxMaharashtra

विधानसभेच्या निवडणुकीत मोर्शी(जिल्हा अमरावती) मतदारसंघात सत्तारूढ पक्षाचा कृषिमंत्री पडला आणि तिथे तिशीच्या घरातला एक अत्यंत साधा शेतकरी कार्यकर्ता निवडून आला. शेती आणि शेतकरी एका आरीष्टातून जात असताना देवेंद्र भुयार यांच्या निवडून येण्याला विशिष्ट महत्त्व आहे. म्हणूनच ही नोंद घेण्यासारखी घटना आहे. २०१४ला आघाडीचे सरकार गेले. त्यांना जावे लागले त्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांमधील असंतोष. शहरी भागाबरोबर ग्रामीण महाराष्ट्रातली राजकीय हवा पालटली आणि सत्ता बदल झाला.

गेली पाच वर्षे शेतकऱ्यांनी युतीची राजवट अनुभवली. मात्र पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे फारसे गांभीर्याने कोणी बघत नाही, असा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर अनिल बोंडे या कृषिमंत्र्याचा देवेंद्र भुयार हा तरुण शेतकरी कार्यकर्ता पराभव करतो, याचे विश्लेषण करायला हवे. वास्तविक स्वामिनाथन आयोग, शेतीमालाला हमीभाव, शेतकरी पेन्शन, कर्जमाफी इत्यादिबाबत अनेक अश्वासने देऊन युती सरकार सत्तेवर आले. याबाबत सरकारने विशेष भरीव काही केलेले नाही. उलट ज्याप्रमाणात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करु बघतात, त्याच्याने प्रश्न संपायला आणखीन किमान अर्धशतक तरी लागेल, असाही समज लोकांमध्ये बळावू लागला. आता पुढे काय यासाठी शेतकरी आधार शोधू लागले.

जेव्हा त्यांना देवेंद्र भुयार सारखा जिगरबाज तरुण भेटला तेव्हा लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. अर्थात हा चमत्कार काही रात्रीतून झालेला नाहीये. देवेंद्र भुयार बाबत सांगायला हवे. जेव्हा जेव्हा कोणी कथित विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याचे अहित करायला निघाले. त्यांना अडवायला देवेंद्र भुयार आघाडीवर राहिला. सत्तेच्या विरोधात लढताना त्याची भरपूर कोंडी केली गेली. लाठ्याकाठ्या खाल्ल्या. गुंडांपुंडाकडून मारझोड झाली. तुरुंगवास भोगला. एखाद्या नामचीन गुंडाला कधीतरी भोगावी लागते ना, तशी तडीपारीची शिक्षा भोगली! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना असे हे सारे सारे हलाहल त्याला पचवायला लागले.

शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्नावर देवेंद्र भुयार तहसील कचेरीत निवेदन द्यायला गेला तरी पोलिस ३५३ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करत गेले. फक्त ३५३ चे १२ तर एकूण ८६ गुन्हे देवेंद्रवर दाखल आहेत. समोरच्या सत्ताधीशाने देवेंद्रला नामोहरम करायला जे जे वाटले ते ते सारे प्रयत्न केले. परंतु देवेंद्र मागे हटणाऱ्यापैकी नव्हता. वयाच्या सतराव्या वर्षी देवेंद्र भुयार सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला. २००८ मध्ये प्रहार संघटनेचा तालुकाध्यक्ष म्हणून देवेंद्रने सामाजिक कामाला सुरुवात केली. त्याचे शिक्षण कसे थांबले, याचाही किस्सा मोठा भारी आहे. तो बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालुक्याच्या ठिकाणी तहसील कचेरीसमोर उपोषण सुरू होते. अर्थातच देवेंद्र यात आघाडीवर होता. ‘शिक्षण(परीक्षा) की उपोषण?’ यात शिक्षण मागे पडले उपोषणाची सरशी झाली. तेव्हा अर्ध्यावर शिक्षण थांबले ते थांबलेच.

एका खासगी वीज निर्मिती प्रकल्पाच्या विरोधात याने मोठे आंदोलन उभे केले. त्याचा मनात राग धरून २०११मध्ये तेमुरखेडा गावात देवेंद्रवर प्राणघातक हल्ला झाला. हा पठ्ठ्या डगमगला नाही. सत्ताधारी पद्धतशीरपणे करत असलेली कोंडी लक्षात घेऊन त्याने निवडणुकीच्या राजकारणात यायचे ठरवले.

२०१२मध्ये तो पंचायत समिती सदस्य झाला. विशेष हे की तेव्हा त्याचे वडील याच्या विरोधातल्या उमेदवाराचा प्रचार करत होते! २०१५मध्ये दोन एकर जमीन विकून बहिणीचे लग्न केले. एकेक गुन्हा दाखल करत अत्यंत पद्धतशीरपणे २०१६ साली देवेंद्रवर तडीपारीची कारवाई केली. चार महिने हा बाहेर राहिला. राजू शेट्टी यांनी ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई मागे घेण्यास भाग पाडले.

२०१७ साली देवेंद्र भुयार जिल्हा परिषद सदस्य झाला. पुढे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत तो सक्रीय झाला. विदर्भ विभागाचा अध्यक्ष झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आल्यावर आंदोलनांना आणखी धार आली. बहुचर्चित बोंड अळीबाबत कंपनीवर पहिला गुन्हा दाखल केला गेला, त्यात हा आघाडीवर होता. केवळ कंपनीवर गुन्हा दाखल करून हा पठ्ठ्या थांबला नाही. ‘बायर’सारख्या मस्तवाल कंपन्यांना नमवले, नुकसानभरपाई द्यायला भाग पडले. दूध आंदोलनात लक्ष वेधण्यासाठी वरूरमध्ये पहिला टँकर देवेंद्रने पेटवला आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले. कृषिमंत्र्यांनी मोर्शीमध्ये संत्र्यावरील प्रक्रिया उद्योग आणला. विदर्भातील संत्री बियांची संत्री आहेत. प्रकल्प आणला तो सीडलेस संत्र्यांचा! याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला.

आजवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर देवेंद्र भुयार प्रामाणिकपणे लढत आलाय. संघर्षाची वाट तुडवत निघालेल्या या जेमतेम तिशीतल्या या विदर्भपुत्रावर शेतकऱ्यांनी मोठा विश्वास दाखवलाय. खर्चायला ‘नोट’ आणि निवडून यायला ‘वोट’ देत या तरण्याबांड पोराला आता थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले आहे. निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दिवशी पहाटे त्याच्या कारवर गोळीबार झाल्याची आणि कार पेटवून दिल्याची बातमी आली तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. देवेंद्र कोणत्या परिस्थितीत तिकडे कार्यरत आहे, याचाही अंदाज यातून बांधता येतो.
देवेंद्र म्हणतो…

आयुष्यभर शेती आणि शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहून काम करीन. ४८ हजार हेक्टर संत्रा ही अमरावती जिल्ह्यातल्या त्याच्या परिसराची रक्तवाहिनी आहे. सध्या हे पीक अडचणीत सापडले आहे. हे पीक नामशेष होण्याची भीती त्याच्या मनात आहे. या बागा टिकल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. सिंचनाच्या अनुशेषाचा आवाज तो नेहमीच उठवत आलाय. त्याचा मोर्शी मतदारसंघ परिसर ‘ड्राय झोन’ म्हणून जाहीर केला गेलाय. पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी पाणी हवे तर जमिनीच्या पोटात १२०० ते १५०० फुट बोअर घ्यायला लागतो. भूमिगत पाण्याची पातळी वाढवण्यासाठी विशेषकरून प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र सांगतो. विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये हतबलतेचे वातावरण आहे. त्यांच्या मनाच्या आभाळात निराशेचे ढग दाटून आलेत. ते घालवण्यासाठी काम करायची आवश्यकता त्याला वाटते.

प्रचंड ताकदवान सत्तेसमोर पाय धरून उभे राहणे हेच मुळात अत्यंत आव्हानात्मक बनलेले असतानाच्या काळात देवेंद्र भुयार उभा राहिला. लोकांच्या पाठींब्यावर निवडून आला. राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत ठळक घटना ठरावी. पंधरा वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांनी ‘नोट’ आणि ‘वोट’ मागितले. निवडणूक जिंकली. शेतकऱ्याच्या घरातलं पोर विधानसभेत पोहोचलं. त्याने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. देवेंद्रच्या रूपाने याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकाधिक जटील बनत चाललेले असताना, शेतीच्या प्रश्नांवर राज्यकर्ते संवेदनशीलता हरवून बसल्याचे दारुण चित्र दिसत असताना, ‘आम्हांला वाली कोणीच नाही’, अशी शेतकऱ्यांची हवालदिल स्थिती झालेली असताना, राज्याच्या कृषिमंत्र्यांना पाडून, लोकांनी देवेंद्रला निवडून देणे ही शेतीच्या प्रश्नांवर असलेली लोकभावना अधोरेखित करणारी प्रातिनिधिक घटना वाटते. शेतकरी चळवळीशी इमान असलेला आवाज देवेंद्रच्या रूपाने विधानसभेत आता ऐकू येईल, अशी आशा आहे.

शेतकरी चळवळ क्षीण होत आहे, परिस्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. या कठीण काळात आपल्या प्रश्नांची सोडवणूक लोकशाही अधिक बळकट करण्यातून होऊ शकते, हे राजकीय भान मोर्शी मतदार संघातल्या लोकांनी दाखवले आहे, जे स्वागतार्ह आहे. सध्या शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते विरलेले राजकीय वस्र पांघरून जगत असल्याचे चित्र दिसते. ही विरण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे सुरु आहे. गावोगावी अत्यंत धूसर राजकीय अस्तित्व असलेले असलेले, छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलेले कार्यकर्ते दिसतात. ही राजकीय जीवनाची शोकांतिका आहे. तरुण पिढीचा नायक बनून शेतकरी चळवळीत चैतन्य आणण्यासाठी, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देवेंद्र कार्यरत राहिल, अशी अपेक्षा करणे अनाठायी ठरणार नाही.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997