शेती गहाण ठेवून सुरू आहे चारा छावणी

शेती गहाण ठेवून सुरू आहे चारा छावणी

89
0
शेतकरी आपल्या गुराढोरांसह छावणीवर राहतो, तेव्हा त्याच्या काय समस्या असतात, एकप्रकारे छावणीमुळ जनावरांसाठी आधार मिळाला असला, तरी त्याच्या पुढे काय आहेत समस्या ? एवढंच नाही तर गावात भयंकर दुष्काळ पडल्यानं आणि रोजगार नसल्यानं काही शेतकरी कुटुंबांवर थेट छावणीतच स्थलांतरित होण्याची वेळ आलीय. एकीकडं आपलं पशुधन जगतंय म्हणून समाधानी असणारा शेतकरी तर दुसरीकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींवर तेवढाच नाराज आहे. चारा छावण्यांसंदर्भात प्रासंगिक रिपोर्टिंग केलं जातं. मात्र, मॅक्स महाराष्ट्रच्या टीमनं संपूर्ण रात्र चारा छावणीवर काढून इथली परिस्थिती समजून घेतलीय.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मॅक्स महाराष्ट्रची टीम पोहोचली बीड जिल्ह्यातल्या पिंपरगव्हाण इथं. गावात गजानन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चारा छावणी चालवली जाते. या छावणीवर सुमारे ७०० पशुधन आहे. काही पशुधन मालक चारा छावणीवरच मुक्कामी असतात. तर साधारणपणे सात-आठ पशुधन मालकांचं अख्ख कुटुंबच या छावणीवर मागील तीन महिन्यांपासून मुक्कामी आहे. गावातील दुष्काळामुळं त्यांना पशुधनासह छावणीवर स्थलांतरित व्हावं लागलंय.

रात्री नऊ ते पहाटे 5 पर्यंत छावणीवरील शेतकरी काय करतात…

रात्री 9 ते 10 यावेळेत छावणीवरील शेतकरी हे आपापल्या पशुधनाच्या गोठया समोर जेवायला बसतात. छावणीवरच स्थलांतरित झालेल कुटुंब एकत्रित येऊन रात्री 9 ते 10 यावेळेत जेवण करतात.
10 ते 11 यावेळेत बहुतांश शेतकरी निवांत गप्पा मारत असतात. तर काही जण टाईमपास म्हणून तंबाखूचा इडा देखील मळत होते. परंतु यावेळी देखील त्यांच्या मनातलं काहूर, चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सध्याच्या दुष्काळातून बाहेर पडायचं तरी कसं आणि काही दिवसांनी सुरू होणाऱ्या पावसाळ्यात तरी चांगला पाऊस पडेल का, याची चिंता स्पष्टपणे दिसत होती. याचं दोन तासांत मॅक्स महाराष्ट्रच्या टीमनं शेतकऱ्यांशी सवांद साधला असता, शेतकऱ्यांच्या मनातलं दुष्काळासंदर्भातलं विदारक चित्र त्यांच्या बोलण्यातून बाहेर आलं.

जमीन गहाण ठेवून चारा छावणी चालवतोय – सचिन कवडे

रात्री साधारणपणे 11 ते 12 च्या आसपास सर्व शेतकरी हे झोपले होते. याचदरम्यान छावणी चालक सचिन कवडे हे छावणीवर आले. यावेळी मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने त्यांच्याशी बातचीत केली. आज छावणी चालवणं परवडत नाही. एकतर छावण्या सुरू करा म्हणून आम्हांला अगोदर आंदोलनं करावी लागली. मी स्वतः 40 दिवस स्वखर्चातून छावणी चालवली. आज एका जनावरामागे शासन 75 ते 90 रुपये देत आहे. त्यात आम्ही त्यांना वेगवेगळा चारा – पाणी देतो, मग त्या 90 रुपयात कसं भागणार. आज छावणी चालू करून तीन महिने उलटले. मात्र, आजपर्यंत शासनाकडून अजून आमची बिलंच निघालेली नाहीत. यामुळं मला माझं एक एकर शेत सावकाराकडे गहाण ठेवावं लागलंय. आज कर्ज काढून मी छावणी चालवत आहे. त्यामुळं किमान प्रत्येक जनावरामागे किमान १२० रूपये शासनानं दिल्यास छावण्या चालवणं परवडणार आहे.

रात्री १२ ते पहाटे ४

रात्री 12 ते 4 यावेळेत छावणीवरील सर्व शेतकरी झोपलेले होते. दिवसभर राब-राब राबलेला शेतकरी रात्री मात्र निवांत झोपलेला दिसला. पहाटे 4 नंतर पुन्हा शेतकऱ्यांनी दैनंदिन कामाला सुरुवात केली. जनावरांच्या गोठ्यातील शेण काढणं, लगेच म्हशींचं दुध काढणं, मग तेच दुध बीड शहरात विकायला नेतात आणि पुन्हा छावणीतील गोठ्यावर येऊन जनावरांना खाण्यासाठी वैरण काडी टाकतात. असाच असतो शेतकऱ्यांचा रोजचा दिनक्रम. यावेळी मला एक जाणीवपूर्वक उल्लेख करावा वाटतो, तो म्हणजे ज्यावेळी सगळा नोकरदार वर्ग पहाटे साखर झोपेत असतो, तेव्हा हा शेतकरीराजा गोठ्यात राबत असतो. आणि विशेषतः हाच शेतकरी अनेक नोकरदारांना दूध देतांना उठवण्याचे देखील काम करत असतो. एवढी मेहनत आणि पदरात काय तर तुटपुंजे पैसे. ज्या पैशात शेतकऱ्यांचा घरखर्च नीट भागत नाही. डोळ्यांदेखत कधी-कधी जनावरांना चारा कमी पडला तर हंबरडा फोडतांना पाहण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे.
छावण्यांपासून सुटका कधी ?
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नाही म्हणायला या चारा छावण्यांचा आधार आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती ओढवली याला निसर्गाचं दृष्टचक्र तर कारणीभूत आहेच, शिवाय इथल्या यंत्रणाही कारणीभूत असल्याचा सूर या शेतकऱ्यांमधून उमटतोय. सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देतंय, शेतकऱ्यांचा फक्त मतदानापुरताच वापर होतोय, नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू होतो, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी दिला जात नाही, अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्याच करेल अशी संतप्त भावना छावण्यांवरील शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना सुरू आहेत. मात्र, त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नाहीये, त्यामुळं योजनांपासून मूळ अपेक्षित लाभार्थी असलेला शेतकरीच वंचित राहत आहे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळतोय.