Home News Update पुरग्रस्त गडचिरोलीसाठी महाराष्ट्र एकवटेल का?

पुरग्रस्त गडचिरोलीसाठी महाराष्ट्र एकवटेल का?

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व अहेरी तालुक्यातील १०० हून अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. भौतिक विकासापासून दूर असलेल्या भागात पुरामुळे काही लोकांचे जीव देखील दगावलेत. आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूरग्रस्त भागातील आदिवासींची परिस्थिती बिकट असताना शासन व प्रशासन मात्र ढिम्म आहे. कुठल्याही प्रकारची मदत अद्याप पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली नसून पूरग्रस्त गडचिरोलीसाठी महाराष्ट्र एकवटेल का ? असा टाहो भामरागड व अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त आदिवासी बांधव व्यक्त करत आहे.
Support MaxMaharashtra

या पावसाळ्यात सलग सातव्यांदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पूर आला आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेली दिसते. १९९४ नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर असून तालुक्यातील ११० गावांतील २५,००० हुन अधिक लोकांना पुराचा फटका बसलेला आहे. या भागात बहुतांश आदिवासी लोक राहत असून त्यांची घरे मातीची असल्याने मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने ही घरे आता जमीनदोस्त झालेली दिसतात. भामरागड येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठी या गावातील पोलीस स्टेशन हे दोन दिवस पाण्याखाली होते. तेथील पोलीस रेकॉर्ड पुरामुळे खराब झाले आहे. तर बर्यासच गावातील शाळा, आरोग्य केंद्र ही बंद अवस्थेत पडलेली आहे.

स्थानिक जिल्हाधिकारी, तहसीलदार, पीएसआय हे युद्धपातळीवर काम करत असताना शासनाकडून अपेक्षित असे सहकार्य त्यांना मिळताना दिसत नाही. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेली मनुष्य क्षमता प्रशासनाकडे नाही. इतका मोठा पूर आला असून अद्याप कुठल्याही प्रकारचे पंचनामे पूरग्रस्तांचे झाले नाहीत. भामरागड तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टआरवर असलेले धान क्षेत्र हे पूरामुळे उध्वस्त झाले आहे.
येथील आदिवासी, शेतकरी, मजूर,छोटे व्यापारी सर्व घटकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. सांगली व कोल्हापूर मध्ये ज्या प्रमाणात पूर आला होता. अगदी त्याच प्रमाणे भामरागड तालुक्यात देखील पूर आहे. परंतु, या भागात मदतीचा ओघ फारसा दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली व गेल्या काही दिवसापासून प्रत्यक्ष पूर बाधित भागात जाऊन ती मदत पोहोचविण्याचे कार्य ही चमू करत आहे.

पूरग्रस्तांना मदत करत असलेले दीपक चटप म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले. गरोदर महिलांचे प्रचंड हाल होताना दिसतात. ज्याप्रमाणात सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात सरसावले त्याप्रमाणात गडचिरोलीसाठी आपण एकत्र आले पाहिजे. शासन उदासीन असून पुरामुळे अनेक जीव देखील दगावले आहेत. त्यामुळे शासनाने हा भाग पुरग्रस्त जाहीर करून तातडीने मदत करावी.
तर, पुरग्रस्तांना मदत करत असलेले बोधी रामटेके यांनी या भागात सद्या ताडपत्री, टॉर्च, अन्नधान्य, कपडे या बाबीची गरज भासत असून शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने पुरबाधित भागात करावयाच्या उपाययोजना संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार भामरागड तालुक्यात आरोग्यविषयक सुविधा, रिलीफ कैम्प, मानसोपचार तज्ञसुविधा, आपत्ती निवारण फोर्स व इतर सोयी सुविधा तातडीने पोहचविणे गरजेचे झाले आहे.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997