शेतक-यांच्या ‘मन की बात’

शेतक-यांच्या ‘मन की बात’

महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने गत अनेक वर्षांपासून शासनदरबारी लढा देत वाढीव मोबदल्याची मागणी करणाऱ्या बाळापूर तालुक्यातील पाच शेतकऱयांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली. विष प्राशन केलेल्या शेतकरयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मुरलीधर राऊत (42, शेळद), मदन हिवरकार (32, कान्हेरी गवळी),साजिद इक्बाल शे. मोहम्मद (30, बाळापूर), मो. अफजल गुलाम नबी (30, बाळापूर) आणि अर्चना टकले (30, बाळापूर) या शेतकऱयांची जमीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. अधिग्रहित झालेल्या जमीनीचा मोबदला इतर शेतकऱ्यापेक्षा कमी मिळाला म्हणून उपरोक्त शेतकरी गत अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढा देत आहेत. वाढीव मोबदला मिळावा, म्हणून त्यांनी 29 जुलै रोजीच जिल्हाधिका-यांना  निवेदन देऊन आत्महत्येचा इशारा दिला होता…
सोमवारी यांची अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात सुनावणी सुरू होती. सुनावणी नंतर अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांनी तुम्हाला दिलेला मोबदला योग्य आहे. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, असे म्हटल्यानंतर या पाच शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर सोबत आणलेले किटकनाशक प्राशन केले.