Fact Check | फ्री इंटरनेट आणि रिचार्जच्या मेसेजवर क्लिक करणं पडेल महाग!

332

लॉकडाऊनच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. सर्व नागरिक घरात असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. इंटरनेट हे मनोरंजन आणि माहिती मिळवण्यासाठीचं एक महत्त्वाचं माध्यम बनलंय. त्यामुळे याचा वापर आता ‘ऑनलाइन फ्रॉड’ होत आहे. कोरोनविरुद्ध देशातील सर्व शासकीय यंत्रणा लढत आहेत. यासोबत वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांना रोखण्याचं आव्हान आता शासकीय यंत्रणांपुढे आहे.

आपण लकी ड्रॉ जिंकला आहात, बक्षीस मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, फ्री रिचार्ज किंवा फ्री इंटरनेटसाठी खालील लिंकवर क्लिक करा आशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांत व्हायरल आहेत. आपल्यालाही व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट्स मेसेजमध्ये असे मेसेज आले असतील.

जियो मोबाईल नेटवर्क लॉकडाऊनच्या काळात ६ महिन्यांसाठी दिवसाला २५ जीबी डेटा फ्री देत आहे अशा आशयाचा मेसेज सध्या अनेकांना येत आहे. याशिवाय लॉकडाऊन काळात केंद्रीय दूरसंचार विभागाने ३ मे पर्यंत सर्व नेटवर्कसाठी फ्री इंटरनेट देण्याचा निर्णय घेतल्याचाही एक मेसेज अनेक दिवस फिरत होता. याप्रकारे कोणत्याही कंपनीने फ्री इंटरनेट किंवा फ्री रिचार्जची घोषणा केलेली नाही. हे सर्व मेसेज खोटे आहेत.


हे मेसेज म्हणजे एकप्रकारचा ‘ट्रॅप’ आहे. अशा जाळ्यात कळत-नकळत कोणीही अडकू शकतो. कधी लॉटरी, कधी सरकारी योजना कधी फ्री इंटरनेट अशा नावाखाली असे मेसेज वारंवार आपल्याला येत असतात. या सर्व मेसेजमध्ये एक लिंक असते. ही लिंक म्हणजे मालवेअर (Malware) असतो. हा एकप्रकारचा व्हायरस असतो. अनेकजण केवळ मोहापायी या मेसेजला भुलून मेसेजमधील लिंक क्लिक करतात. अशा लिंकला क्लिक केल्यानंतर या माध्यमातून तुमच्या मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये काही छुपे व्हायरल इन्स्टॉल होऊ शकतात. यातून तुमचा खासगी डेटा, माहिती लीक होण्याचा धोका असतो.

यासोबतच तुम्ही वापरत असलेल्या वेगवेगळ्या App मध्ये साठवलेली माहिती (उदा. ईमेल आयडी, पासवर्ड्स, ऑनलाइन बँकींगची माहिती, अकाऊंट नंबर, बँकेचे पासवर्ड्स इ.) ही सुद्धा लीक होऊ शकते. या माध्यमातून स्पायवेअर (Spyware) हे ही तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊ शकतात. यामुळे तुम्ही फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून काय करता, कोणाशी बोलता, इंटरनेटवर काय सर्च करता, कोणाला मेसेज करता अशी सगळी माहिती ‘थर्ड पार्टी’ला बाहेर पाठवली जाते.

या सगळ्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. याआधी अशा लिंक क्लिक केल्यामुळे अत्यंत खासगी माहिती लीक झाल्याच्या, आर्थिक नुकसान झाल्याच्या कित्येक घटना घडलेल्या आहेत. हॅकरने अशा माहितीच्या आधारे कित्येकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची उदाहरणे आहेत.

त्यामुळे Unknown Sources कडून आलेल्या कोणत्याही मेसेजवर आजिबात विश्वास ठेवू नका. कोणत्याही लिंकवर क्लिक किंवा मेसेज, मेल यांना रिप्लाय करू नका. याबाबत कसलीही शंका किंवा धोका जाणवल्यास सायबर सेलशी संपर्क साधा.