Top
Home > Fact Check > Fact Check | भारतातील बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस?

Fact Check | भारतातील बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस?

Fact Check | भारतातील बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस?
X

चीनमधल्या करोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. चीनच्या वुहान शहरात उत्पन्न झालेला हा व्हायरस हळूहळू जगभरात पोहोचायला लागला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत सुमारे ५०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जगभरात या व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

अशा परिस्थितीत या व्हायरसबद्दल अफवांचे पेव पसरले आहे. कोरोना व्हायरस भारतात आला असून देशातील बॉयलर कोंबड्यांमध्ये हा व्हायरस आढळला असल्याचा दावा करणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये कोरोनचे विषाणू सापडले आहेत. त्यामुळे बॉयलर चिकन खाणं टाळा असं आवाहन करणारा मजकुर या मेसेजमध्ये आहे. सोबतच एक बॉयलर कोंबडी आणि काही मांसाच्या तुकड्यांचा फोटोही शेअर करण्यात येतोय.

फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रृप्सवर या आशयाच्या पोस्ट्स आणि मेसेज बघायला मिळत आहेत.

व्हायरल पोस्ट

व्हायरल पोस्ट

व्हायरल पोस्ट

तथ्य पडताळणी :

वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंट्स आणि व्हॉट्सअप ग्रृपवर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘मॅक्स महाराष्ट्र’ने या फोटोचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. व्हायरल फोटो गुगल इमेजमध्ये सर्च केल्यानंतर हा फोटो जूना असून त्याचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलं.

कोंबड्यांमध्ये होणारे विविध आजार आणि त्यावरील उपायांची माहिती देणाऱ्या लेखात हा फोटो वापरण्यात आला आहे. हा लेख Pasture One या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मूळ लेखाचा स्क्रिनशॉट

फोटोच्या मूळ लेखाची लिंक -

https://ne.pastureone.com/2393-what-to-do-if-broilers-sneeze-wheeze-diarrhea-how-to.html

सोशल मीडियामध्ये फिरत असलेल्या या पोस्ट्सना शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे.

व्हायरल होत असलेले काही फोटोज हे पक्ष्यांच्या शवविच्छेदनाचे आहेत तर काही राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे आहेत. त्याचा कोरोना व्हायरसशी कसलाही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन आणि मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे १०० डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एव्हढया तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण २७ ते ४५ डिग्री पेक्षा अधिक तापमानात जगत नाहीत. शिवाय, भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत, असंही डॉ. रानडे यांनी स्पष्ट केलंय.

नागरिकांनी व्हॉट्सअप किंवा फेसबुक अशा माध्यमांतील विपर्यास केलेल्या पोस्ट्सवर विश्वास ठेवू नये. भारतीय चिकन आणि अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत. अनेकदा कुक्कुटपालन व्यवसायासंबधीच्या आकसातून वा गैरसमजातून ठराविक मंडळींकडून अशा प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल केल्या जातात. त्या प्रमाण मानू नयेत, असं आवाहनही डॉ. रानडे यांनी केलंय.

वाचा संपूर्ण लेख

निष्कर्ष:

भारतातील बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळला असल्याचा दावा करणारे मेसेज हे खोटे आहेत. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. देशात आद्यापपर्यंत बॉयलर चिकनमध्ये कोरोना विषाणू आढळलेला नाही.

Updated : 6 Feb 2020 3:06 AM GMT
Next Story
Share it
Top