Home > Fact Check > शेंडी, जानव्यातलं हिंदुत्व मला मान्य नाही !! असं मुख्यमंत्री खरंच म्हणालेत का?

शेंडी, जानव्यातलं हिंदुत्व मला मान्य नाही !! असं मुख्यमंत्री खरंच म्हणालेत का?

शेंडी, जानव्यातलं हिंदुत्व मला मान्य नाही !! असं मुख्यमंत्री खरंच म्हणालेत का?
X

शिवसेनेने (Shivsena) भाजपाशी (BJP) फारकत घेतल्यापासून भाजपा समर्थक हिंदुत्ववादी मंडळी भलतीच सैरभैर झालेली दिसतात. शिवसेनेने हिंदुत्वाशी कशी गद्दारी केलीय, हे ठासून मांडणाऱ्या मजकूराची फेसबुक, वाॅटस्एप, ट्वीटरवर मोठी लाट आलीय. यात अमराठी भाषिक प्रामुख्याने आघाडीवर आहेत.

महाराष्ट्रात (Maharshtra) शिवसेनेचा विरोध प्रामुख्याने ब्राह्मण समाज करतोय. त्यात आता, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thakarey) यांच्या एका वक्तव्यामुळे संतापात भर पडलीय. शेंडी, जानव्याचं हिंदुत्व मला मान्य नाही, असं उध्दव ठाकरे म्हणाल्याच्या वक्तव्याचा एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरचा स्क्रीनशाॅट प्रसारित झालाय. त्यावर ब्राह्मण समाजाकडून उध्दव ठाकरेंना संतापजनक इशारे देण्यात येत आहेत.

जयंत सप्तर्षी यांच्या फेसबुक वाॅलवरून २ डिसेंबर, २०१९ रोजी ८.१५ वाजता एबीपी माझा च्या बातमीचा स्क्रीनशाॅट पोस्ट केला गेलाय. त्यात उध्दव ठाकरेंचं विवादित वक्तव्य आहे. २८८ जणांनी ही पोस्ट शेअर केलीय.

" हा मुख्यमंत्री म्हणून फालतू आहे, पण नेता म्हणूनही भिकारडा आहे"....."ब्राह्मणांना विरोध कराल, तर भीक मागायची पाळी येईल"..."हा सीकेपीसुध्दा नसावा"...अशा विविध प्रतिक्रिया पोस्टखाली देण्यात आल्या आहेत. सदरचंं वक्तव्य खरंच उध्दव ठाकरे यांनी केलंय का, याची खात्री मात्र कोणीही करताना दिसत नाहीत, त्यामुळे ठाकरेंच्या व शिवसेनेच्या राजकीय विरोधकांनी केलेला प्रचार कारणी लागल्याचं दिसून येत आहे.

हिंदुत्वाबाबतच्या ठाकरी विधानांना प्रबोधनकारांपासूनचा इतिहास आहे. हिंदू धर्मातील अंधश्रध्दांवर प्रबोधनकारांनी कठोर प्रहार केलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात विद्वेषी विधानं केलेली असली तरी वडिलांचा हवाला देऊन ग्रहताऱ्यांवर विश्वास ठेवू नकोस, असं वडिलांनी सांगितल्याचं मांडणारे बाळासाहेब ऐकायला मिळतात.

माझं काम करशील का, असं विचारणाऱ्या अंगात आलेल्या बाईला, " अंगात तुझ्या आलंय का माझ्या" असं विचारणारे बाळासाहेबही भाषणांतून भेटतात. तीच परंपरा जपत, "गाईला जपायचं नि बाईला मारायचं, असलं कसलं हिंदुत्व" असं उध्दव ठाकरे न विचारते तर नवल होतं.

शेंडीजानव्यातलं हिंदुत्व मान्य नाही, हे विधान उध्दव ठाकरेंचंच आहे का, या प्रश्नाचं उत्तर "हो" असं आहे, पण ते शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंचं विधान आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं नाही. जे विधान सोयिस्करपणे प्रसारित करून आज वाद पेटवला जातोय, ते विधान २०१७ च्या दसरा मेळाव्यातलं आहे.

त्यावेळी किंवा नंतर त्यावर कोणी फारसा आक्षेप घेतल्याचं दिसत नाही किंवा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती करू नये, अशीही भूमिका कोणी घेतल्याचं दिसत नाही. सगळा राग भाजपासोबत युती तुटल्यानंतरचा आहे. भाजपाईंसाठी आता शिवसेना अफझल सेना झालीय. शपथग्रहण सोहळ्यातला जनतेला नमन करतानाचं छायाचित्रंही उध्दव ठाकरे नमाज पडतानाचं म्हणून पोस्ट करण्यात आलंय.

घरात बाळासाहेबांच्या तसबीरीपुढे नमन करतानाच्या फोटोत छेडछाड करून बाळासाहेबांच्या जागी सोनिया गांधींना बसवण्यात आलंय. एकंदरीत, उध्दव ठाकरेंच्या दोन वर्षांपूर्वीच्या विधानावरून वाद उरकण्यात आलेला आहे. मुख्यमंत्रीपदावरील उध्दव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यामागे आहे, हे उघड आहे.

पण यावेळी नेम चुकलाय. शिवसेनाविरोधकांचा हा डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे, कारण कोणता समाज कुठे आहे, ते शिवसेनेला पुरतं कळून चुकलंय, त्यामुळे बदलत्या परिस्थितीत उध्दव ठाकरे आपल्या विधानावर ठाम राहिले तर त्यांच्या राजकीय विधानाला आता सरकार मान्यता मिळण्याचीच अधिक शक्यता आहे.

Updated : 3 Dec 2019 4:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top