Home News Update तमाशा कलावंतांचा जाहीरनामा…

तमाशा कलावंतांचा जाहीरनामा…

388

पूर्वी तमाशाचा प्रेक्षक हौशी असायचा. माईकदेखील नसायचा मी स्वतः रॉकेलच्या पलीद्यावर तमाशा केलाय. त्यावेळी लोक तमाशा शांतपणे ऐकायची. तमाशाचे पारंपरिक रूप लोकांना आवडायचे. कलावंताची जास्त पैशाची मागणीही नसायची. सुरवातीला शेतातल्या शेंगा धान्य घेऊन तमाशा केला जायचा. बैलगाडीने आम्ही तमाशाच्या ठिकाणी जायचो. आता प्रेक्षक हौशी राहिला नाही. सुपारी ठरवताना तुमच्या तमाशात बाया किती आहेत अशी विचारणा केली जाते? त्यातल्या त्यात ज्या तमाशाच्या फडात मुली जास्त त्याला जास्त मागणी असते. म्हाताऱ्या बाया असणाऱ्या तमाशाला कुणी विचारत नाही. अशी खंत ज्येष्ठ तमाशा कलावंत तसंच तमाशा सम्राट दत्तोबा तिसंगीकर लोकनाट्य तमाशा मंडळ तिसंगीचे मालक दत्तोबा तिसंगीकर व्यक्त करतात.

Support MaxMaharashtra

त्यांची तिसरी पिढी आज तमाशाक्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांचे वडील शंकरराव तिसंगीकर तमाशा चालवत होते. त्यानंतर ते स्वतः मुलगा राजाराम खिलारे नातू आबासाहेब खिलारे हे तमाशामध्ये आजही काम करत आहेत. पूर्वी तमाशा हे फक्त मनोरंजनाचे साधन नव्हता तर त्यामधून लोकांचं प्रबोधन केलं जायचं. तमाशा हे त्या काळातील प्रभावी प्रसार माध्यम होतं. ज्या काळात सध्याची प्रसार माध्यमं नव्हती. त्या सांगावा पोहोचवण्याच्या काळात तमाशांने विष्णू बाळा, बोरगाव चा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर, या वगनाट्या द्वारे बापू बिरू वाटेगावकर विष्णू बाळा यांना गावागावात पोहाचवले. त्या काळात तमाशा केवळ पैसे कमावण्याचे साधन नव्हता. तर ही कलावंत मंडळी या कलेचा ध्यास घेऊन केवळ सांगावा मिळताच त्या गावाला पोहोचायचे. केवळ धान्य शेंगा घेऊन तमाशा करायची. सुरवातीला केवळ सातशे रुपयात तमाशा व्हायचा. लोकांचं मनोरंजन व्हायचं.

तमाशाच्या सुरुवातीला गण असायचा. गण म्हणजे गणेशाचे नमन असायचे. शाहीर पठ्ठेबापूराव यांचे गण प्रसिद्ध होते. बहुतेक तमाशांमध्ये हे गण गायले जात असत. काळू बाळू यांच्या तमाशात सातो हिरो यांनी लिहिलेले गण असायचे. गण झाल्यानंतर गवळण असायची. गवळण म्हणजे गवळणी आणि श्रीकृष्णाचा संवाद असतो. त्यात गवळणी बाजाराला लोणी विकायला जात आणि त्यांची वाट श्रीकृष्ण अडवायाचा मग त्यांचा संवाद त्यामध्ये विनोद असायचे. उन्हातान्हात कष्ट करणारा शेतकरी वर्ग त्या विनोदावर खळखळून हसायचा. शिट्या मारायचा, फेटे उडवायचा. वयोवृद्ध मंडळी खो खो हसत क्षणभर आपले दुःख विसरायचे. त्यानंतर त्या संवादात गवळण गायली जायची. गवळणी नंतर बतावणी सुरू व्हायची. बतावणी मध्ये एक सरदार सोंगाड्या असायचे. त्यामध्ये बाई आणि पुरुषात प्रश्नोत्तरे व्हायची. बतावणी ऐन रंगात यायची. लोक याचा मनमुराद आनंद घ्यायचे. तमाशाच्या शेवटी तमाशाचा आत्मा म्हणजे वगनाट्य व्हायचं. त्याकाळी उमा बाबाजी सावलजकर यांनी लिहिलेलं “मोहना बटाव “हे वगनाट्य प्रसिद्ध होतं.

याचबरोबर राजा हरिश्चंद्र, लक्षुमी, रजपूत, ही वगनाट्य प्रसिद्ध होती. हा तमाशाचा पारंपरिक ढाचा होता. आज तमाशा ही कला जिवंत आहे. पण हा पारंपरिक ढाचा हळूहळू ढासळत आहे. लोक सिनेमातील नृत्य गाणी याबरोबर तमाशाची तुलना करतात. तमाशा कलावंत भास्कर सदाकळे सांगतात… ‘आत्ता तमाशाच्या सुरवातीला आम्ही गण सुरू केला की, प्रेक्षकांत एक आवाज येतो.” तू आत जा बाईला पाठव” अशाप्रकारे तमाशा कलावंताला साधा गण न म्हणता पडद्यामागे जावे लागते. प्रेक्षकांना जे टिव्ही सिनेमात असते. तेच तमाशात हवे असते. आताचा प्रेक्षक हा वासनांध नजरेनं महिला कलाकारांकडे बघतो खाली बसून लैंगिक हातवारे करतो अश्लील शिव्या देतो असे ते सांगतात. पण स्टेजवर खडा पडला की, आम्ही तमाशा बंद करतो असे ते स्वाभिमानाने सांगतात.

अनेक वर्षे तमाशात काम करणाऱ्या संगीता गडदे सांगतात, ‘माझी आत्या तमाशात नृत्य करायची तरुणपणात माझ्यावर घराची जबाबदारी येऊन पडली आणि मी तमाशात काम करायला लागले’. पुढे त्या सांगतात ‘आमच्या गोपाळ समाजाला शेती नसते मुलगी हिच शेती समजली जाते.’ घराची कुटुंबप्रमुख स्त्री असते. आमच्यात आम्हाला भावाच्या लग्नाचा खर्च करावा लागतो. उलट मुलीकडच्या लोकांना हुंडा द्यावा लागतो. यासाठी बहुतेक स्त्रिया या तमाशाची वाट निवडतात. आम्ही तमाशातून लोकांचं मनोरंजन करतो मात्र प्रेक्षकांकडून सन्मान दिला जात नाही.

या सर्व कलावंतासोबत बोलताना ते तमाशाबाबत भरभरून बोलतात. पण स्वतःच्या परिस्थितीवर बोलताना तमाशात सोंगड्याचे काम करत आयुष्यभर लोकांना हसवणारे बावन्न वर्षाचे विजय वारे सांगतात… ‘माझ्याकडे फक्त कला शिल्लक आहे. मी केवळ कलेवर तरलो आहे. माझ्याकडे घर नाही, शेती नाही. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे’. ते त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतात ‘तमाशाच्या मालकाकडून पैसे घेतले होते. मला फोनवरून दुःखद बातमी समजलेली तरी मला मालकाने सोडले नाही. मी स्टेजच्या मागे रडत होतो आणि पुढं जाऊन लोकांना हसवत होतो. आम्हाला आमच्या उतारवयात कुणीही विचारत नाही.

सरकारने तमाशा कलावंतांना घरं दिली पाहिजेत. पंधराशे रुपये पेन्शन पंधरा हजार केली पाहिजे तर कलाकार जगेल.’ भास्कर सदाकळे सवाल करतात सांस्कृतिक मंत्र्यांने आत्तापर्यंतच्या सरकारने तमाशा कलावंतांसाठी काय केले?तमाशा कलावंतांना राज्यसभेवर विधानपरिषदेवर या कलावंतांचा प्रतिनिधी म्हणून घ्यायला हवे. पन्नास वर्षांची पेन्शनची अट्ट कमी करून पंधरा हजार पेन्शन द्यायला हवी. आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने या कलावंतांसाठी काही केले नाही. एका बाजूला सरकार तमाशा टिकला पाहिजे असे सांगते. कलावंतांना वाऱ्यावर सोडते. कलाकार पन्नास बावन्न वर्षे जगतो. म्हणजे केवळ शेवटचे एक दोन वर्षे पंधराशे रुपये त्याच्या मड्यावर झाकरान करण्यासाठी देता का? असा संतप्त सवाल ते सरकारला करतात.

काय आहेत या कलावंतांच्या मागण्या?

– राज्यसभा विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे

– कलाकारांच्या मुलांना मोफत शिक्षण उच्चशिक्षण आरक्षण आणि शिष्यवृत्ती मिळावी.

– सर्व कलाकारांना घरे द्यावीत.

– आरोग्याच्या मोफत सुविधा द्याव्यात.

– बसचा प्रवास मोफत करावा.

– भूमिहीन कलाकारांना गायरान सारख्या जमिनी देण्यात याव्या.

– त्यांच्या मंडळावर तमाशात काम केलेलाच प्रतिनिधी बसवावा, राजकीय व्यक्ती बसवू नये.
– महिला कलाकारांच्या संरक्षणासाठी वेगळा कायदा करावा. त्यांना पोलिस संरक्षण मिळावे.

– तमाशाच्या संवर्धनासाठी तमाशाच्या छोट्या फडांना अनुदान द्यावे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997