मृत्यूची ‘भिंत’

मृत्यूची ‘भिंत’

दोन जुलै रोजी मध्यरात्री बाराच्या दरम्यान मुंबईतल्या मालाडमधील कुरार परिसरातील आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा इथं भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांना आपले प्राण गमावावे लागलेले आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्या भिंतीनं २२ जीव घेतले ती मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारी भिंत होती. त्या भिंतीची जबाबदारीही महापालिकेचीच आहे.
मालाडमधील आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा या परिसरात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत वस्त्या आहेत. तिथं प्राथमिक सुविधांचा मोठा अभावही आहे. या वस्त्यांमध्ये बहुतांश हातावर पोट असलेला वर्ग राहतो. या अनधिकृत वस्त्या तयार होतांनाच महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं त्यांच्यावर नियंत्रण आणलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. २ जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळं या भिंतीशेजारी पाणी साचलं, शिवाय पाण्याचा प्रवाह वेगवान होता, भिंतीतून पाण्याचा निचरा व्हायला पुरेशी जागा नव्हती त्यामुळं भिंत कोसळल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, या परिसरात ७० झोपड्या होत्या. त्यांच्यावरच हे संकट कोसळलं. त्यापैकी अजूनही काही जण बेपत्ताच आहेत. यापैकी कित्येक झोपड्या वाहूनही गेल्या आहेत.
मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही दुर्घटना अपघात असल्याचं म्हटलंय. शिवाय ही भिंतही महापालिकेचेची असल्याचंही मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना मान्य केलंय. दरम्यान, या दुर्घटनेनंतर कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली असता त्या भिंतीमध्ये थर्माकोल सारख्या वस्तुही आढळून आल्या आहेत. त्यामुळं या भिंतीच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. सुमारे दोन वर्षापुर्वी ही २० फूट उंचीची आणि साधारणतः २ कि.मी. लांबीची ही भिंत बांधण्यात आली होती. अशा परिस्थितीत २२ जणांचा जीव घेणा-या या मृत्यूच्या ‘भिंती’ची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.