पी चिदंबरम अटक प्रकरण काँग्रेसने मांडले बचावासाठी हे मुद्दे.

पी चिदंबरम अटक प्रकरण काँग्रेसने मांडले बचावासाठी हे मुद्दे.

Mumbai: Congress party leader P Chidambaram during an event at Indian Merchants' Chamber in Mumbai on Saturday. PTI Photo by Mitesh Bhuvad(PTI3_11_2017_000183A)
देशातील मंदी, बेरोजगारी, रूपयांचं अवमूल्यन अशा समस्या असताना या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारतंत्राचा भाग असलेल्या काही माध्यमांनी चिदंबरम यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून गदारोळ माजवला असून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे चिदंबरम आणि INX media प्रकरणातील हे काही मुद्दे लोकांसमोर आणणं गरजेचं आहे असं सांगून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरजेवाला यांनी चिदंबरम यांचा बचाव केला.
1) INX media प्रकरण 2007 चं आहे. आणि कारवाई 2019 मध्ये होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये. चिदंबरम आणि कार्ती यांच्यावर कुठलाच गुन्हा नोंद नाही. या प्रकरणात चिदंबरम यांच्यावर कुठलाच एफआयआर नाही. या प्रकरणात अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती, चिदंबरम यांचं नाव यात नव्हतं.
2) पी. चिदंबरम यांच्या मुलगा कार्ती चिदंबरम याच्या घर आणि कार्यालयावर चार वेळा छापे टाकण्यात आले आहेत. 20 वेळा कार्ती आणि त्याच्या परिवाराचे सदस्य चौकशीला सामोरे गेले आहेत. मात्र, अद्याप एजन्सींनी एकही पुरावा दिलेला नाही.
3) परदेशी गुंतवणूकीला FIPB बोर्डाने परवानगी दिली होती. यात सहा सेक्रेटरी होते, एक रिजर्व बँकेच्या गवर्नर होते, एक कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडीया चे अध्यक्ष होते. यातल्या एका ही अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही. ज्या कंपनीवर परदेशी गुंतवणूक आणल्याचा आरोप आहे त्या कंपनीच्या एकाही अधिकाऱ्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ज्याच्यावर आरोप आहे त्याला पकडलं नाही, ज्यांनी मंजूरी दिली त्यांना ही पकडलं नाही. पण पी. चिदंबरम यांना पकडलं आणि मिडीया ट्रायल चालवण्याचा प्रयत्न केला आहे.
4) चिदंबरम यांना अटक करण्यासाठी कुठलाच पुरावा नाही. एका महिला आरोपीच्या स्टेटमेंट वरून ही अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या मुलीची हत्या कऱण्याच्या आरोपातली आरोपी असलेल्या महिलेने जेल मधून दिलेल्या जबानीच्या आधारावर ही अटक करण्यात आली आहे.
5) पी. चिदंबरम एक नामांकित अर्थशास्त्री आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे नामांकित वकील ही आहेत. त्यांनी देशाची 40 वर्षे सेवा केली आहे. ते कायद्याचा सन्मान करतात. त्यांचा गुन्हा एकच आहे, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवर सातत्याने प्रखर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्यांना अशा पद्धतीने दाबलं जाणार आहे का, त्यांच्या प्रश्नामुळे सरकार अडचणीत येत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळेच माजी अर्थमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे