स्पेन डायरी-भाग ९

स्पेन डायरी-भाग ९
X

आदल्या दिवसाच्या अनुभवांवरून दुसऱ्या दिवशी लवकरच जाग आली. युरोपियन किंवा कुठल्याही एशिअन हॉटेल्स मधे चहा किंवा कॉफीकरीता एक केटल असतेच असते. पण आम्ही राहिलेल्या या हॉटेल कतालान मध्ये मात्र गरम पाणी साफ स्वागत कक्षामधे जावुन आणावे लागत होते. ही एक कटकट वजा केल्यास बाकी व्यवस्था चोख होती. त्यामुळं मी आमच्या तिसऱ्या मजल्यावरून रोज सकाळी आधी खाली जावुन गरम पाणी घेवून येत असे आणि मग खोलीत आन्हीके उरकत असे. यामुळे वेळ थोडा जास्त वाया जाई, पण नाईलाज को इलाज क्या? तर आजही मी वायुगतीने आवरले आणि पूर्ण तयारीनिशी न्याहारी कक्षात गेले.

आज मला भुक नव्हती. पण मनात पाप होतं. मी आज एकटीच फिरणार होते आणि दुपारच्या जेवणात वेळ घालवायला नको म्हणुन नाममात्र न्याहारी घेवुन काही खाऊ पर्समध्ये खुपसायचा पापी विचार मी आयोजिला होता. आज तर इतके सुंदर पदार्थ टेबलावर होते की, मला सकाळी-सकाळी खायला जात नाही याची प्रथमच मनस्वी चीड आली. तळलेले खुमासदार वांग्याचे काप, फ्राईड मशरूमस, ७ ते ८ प्रकारचे ब्रेड, बागेतचे विविध प्रकार, मफ्फीन, सुकवलेला मेवा विविध पेये, दोनट्स. मी माझी कडक कॉफी आणि इतर काही पदार्थ खाल्ले आणि हळुच दोन डोनट्स आणि क्रोसंत पर्समध्ये सरकवले. "चोराच्या मनात चांदणे" तसे मला सारखं सगळे मला पाहतात असे वाटत होते. तिथून मी सुटले ती ब्रिजवरुन चालत थेट वलारका मेट्रो स्टेशन गाठले.

तिकीट पंच केलं आणि मार्गस्थ झाले. इकडं एक बरं असते तुम्ही कितीही घाईत असा कोणी झपाझपा पळणार नाही. धक्काबुक्की नाही. सगळं शिस्तीत. सरकत्या जिन्यावर सगळे उजवीकडे उभे राहतील त्यामुळं जो घाईने जातो त्याला डावी बाजु मोकळी सोडलेली असते. आणि मुख्यतः सगळीकडे दिशादर्शक पाट्या असतात त्यामुळं जो साक्षर आहे त्याला कुठंही न विचारता जाता येतं. आणखीन महत्वचे म्हणजे मेट्रोच्या आत प्रत्येक दारावर नकाशा असतो; प्रत्येक फलाटावर घोषणा केली जाते, जे स्टेशन आले असते ते फलाटावर ठळक अधोरेखित केलं असते त्यामुळं काय बिशाद तुम्ही चुकाल ! त्यामुळं वलारका स्टेशनवरून मी मेट्रोत बसून पासेग द ग्रॅसीया या माझ्या ईप्सित स्थळाची वाट पाहत लोकनिरीक्षण करत बसले. माझ्या बोगीत एक मस्त कलंदर कलावंत सुंदर गिटार वाजवत लोकांचं मन रीझवत होता. एका सुरावटीनंतर काही लोक त्याच्या टोपीत पैसे घालत. मी ही त्या पाश्च्यात्य सुरांचा आनंद घेत होते. कान सुरांवर आणि डोळे फलाटाकडे होते. ग्रॅसीयाला उतरले, रस्ता ओलांडून पलीकडेच मला "ला पेडरेरा" उर्फ "क्यासा मिला" ही गौडीची अफाट बिल्डिंग खुणावत होती.

लगबगीने चालत मी तिथं पोहोचले तेंव्हा सकाळचे फक्त नऊ वाजले होते आणि परत एकदा सारे जग जणू तिथं रांगा लावुन उभे होते. ऑनलाईनची रांग होती आणि साध्या तिकिटाची भली मोठी रांग होती. माणशी दर होता बावीस यूरो. म्हणजे साधारण भारतीय चलनाप्रमाणे अंदाजे अठराशे रुपये ! माझ्या रांगेत कोरियन, जपानी, चीनी, अशी नाना भाषिक लोक दिसत होती. माझा नंबर आल्यावर मी तिकीट घेतलं आणि इंग्लीश बोलणारा एक हेडफोन आणि माहितीची पुस्तिका घेतली. परदेशात किती सोयी. माझ्या हातात एक रिमोट होता त्यावर नंबर्स असतात, ज्या दालनांत जायचं तिथला नंबर दाबायचा. त्याने कानाशी असलेल्या हेडफोनमधून माहितीचा मारा संगीतासकट सुरु होतो. एकदा तिकीट घेतले की कितीही वेळा तुम्ही दालन पाहु शकता आणि परत परत माहिती ऐकू शकता. त्यामुळे कुणाच्याही मदतीशिवाय तुम्ही एकटे फिरू शकता ! तर अशा रीतीने जीव डोळ्यात घेवुन मी "ला पेद्रेरा" फिरू लागले.

कासा बाट्लो पाहुन भारावलेली मी मंत्रमुग्ध होवुन रस्त्यावर चालत होते. खूप दमल्यासारखं वाटू लागले म्हणुन जरा पोटोबाची सोय करावी म्हणुन कॉफी शॉप्स धुंधाळू लागले आणि एका ठिकाणी मला एक यूरो व पंच्याहत्तर सेंट्समध्ये कॉफी व माझा लाडका क्रोसेंत अशी पाटी दिसली. मी लागलीच आत शिरले तर ही मोठी रांग. अशी चीड आली म्हणुन सांगु. पण बोलते कोणास ? मूग गिळून गप्प बसले. रांगेत सगळी तरुणाई भरलेली आणि सारा कारभार अत्यंत संथ गतीने चालु होता. ते पाहुन मला पुढील जन्मी कॉफी मिळते की काय अशी दाट शंका आली. असो ! माझा नंबर आला, समोरच्याने सुहास्य मुद्रेने आणि मी विजयी मुद्रेने मला काय हवं ते सांगितले आणि हवा फुस्स झाली. कारण तो तटस्थपणे म्हणे हे संपलं.

मी मनात जोरात ओरडले "अरे गाढवा, मग बाहेरची पाटी पुसता येत नाही का तुम्हाला?" हे एक इथलं वैशिष्ट्य बरं का. बाहेर पाट्या लावून ठेवायच्या आणि आत शिरले की समाप्तची पाटी दाखवायची. पुणे, मुंबई असती तर लोकांनी आग लावली असती. पण काय करणार हे पडलं स्पेन. मग मी झक मारत हवं ते घेतले आणि याच रेस्टॉराच्या पुढील हिश्श्यात चॉकलेटचे दुकान होते. तिथं काही वेगळ्या प्रकारची चॉकलेट्स विकत घेतली. दूसरे म्हणजे हा सुट्ट्यांचा मौसम चालु असल्याने जवळपास प्रत्येक दुसऱ्या दुकानात सेल चालू होता. मी हरेक दुकानात शिरुन माझ्या सुट्टीचा आनंद उपभोगत होते. तशीच चालत पुढे जवळ जवळ प्लासा कतालूनया पर्यंत म्हणजे किमान चार ते पाच किलोमीटरपर्यंत चालत गेले. तिथं आतमध्ये एक राम्ब्लास नावाचे ओपन मार्केट तसेच केअर 4 मार्केट आहे. तिथं मनसोक्त फिरले.

तिथपर्यंत जाताना वाटेत उत्तम असे फुलांचे ताटवे असलेले चौक, कारंजे आणि पुतळे लागतात. त्या सर्वांचा आनंद घेत पुढे गेले. ला रम्ब्लासमध्ये ओपन मार्केटसमध्ये बहुत करून पाकिस्तानी व इतरही लोकांची दुकाने आहेत. खाण्यापासून ग्रोसरीपर्यंत सबकुछ यहा मिलता है ! एक आईस्क्रीमवाला तर खुप गमतीशीररितीने कोन बनवून देतो. स्पेन हे लेदर तसेच केशरासाठी प्रसिद्ध. इथं केशराचे विविध प्रकार, तसेच घरगुती चॉकलेटस, कँडीचे विविध प्रकार, इथले बदामही खास. तर या सर्वांची अगदी रेलचेल होती. तसेच स्पेनचे स्थानिक मसाले, वेगवेगळे फुले, खाण्याच्या जागा तर इतक्या होत्या की काही म्हणजे काही विचारु नका ! इथे उंडारुन झाल्यावर मी लगतच्या केअर 4 मध्ये गेले. इथून केकस, केशर, वेफर्स, अश्या बारीक सारिक गोष्टी घेतल्या.

परत मेट्रो पकडली आणि वालर्का जाण्यास सज्ज झाले ! कारण मला सामन बांधून मर्सेच्या घरी ठेवायचे होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व कलाकारांबरोबर सन खवियार या बीच डेस्टिनेशनला जायचं होते. जिकडे आमचा जेज़ फेस्टिवल होता आणि जिथं जगभरच्या लोकांना भेटण्याचा सुवर्णयोग होता ! मग काय आनंदी दिवसाची सांगता झाली. या आनंदात निद्रादेवीस तातडीने पाचारण केलं.....

क्रमश:

Updated : 11 May 2017 6:42 PM GMT
Next Story
Share it
Top