Home > गोष्ट पैशांची > गोष्ट पैशांची - बँक एफडी

गोष्ट पैशांची - बँक एफडी

गोष्ट पैशांची - बँक एफडी
X

मागच्या लेखामध्ये आपण गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या वैध पर्यायांची माहिती घेतली. या लेखात आपण चर्चा करणार आहोत बँक फिक्स्ड डेपॉजिटची

साधारण २० वर्षांपूर्वी जेव्हा बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर १३ टक्क्याच्या पुढे होते, तसंच सरकारी/निमसरकारी खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्याची सुविधा होती, तेव्हा नोकरदार मंडळी गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या वैध पर्यायांबद्दल विशेष अशी आस्था दाखवत नसत. पण जेव्हापासून आपल्या देशात विविध उद्योगांमध्ये खासगीकरणाची सुरुवात झाली, खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागले, निवृत्तिवेतन इ. देण्याची पद्धत बंद होऊ लागली. बँकांमधून मिळणारे व्याजदरही दरवर्षी कमी कमी होऊ लागले. १३-१४ टक्क्यांवरून व्याजाचे दर ७-८ टक्क्यांवर आले तेव्हापासून या इतर गुंतवणूक पर्यायाची गरज लोकांना जास्त वाटू लागली.

तसं बघायला गेलं तर बँक फिक्स्ड डेपॉजिट हा पर्याय गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानला जातो. याचे कारण म्हणजे जो प्रत्येक ठेवीवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा डीआयसीजीसी तर्फे पुरविला जातो. त्यामध्ये सर्व ठेवी आणि त्यांच्यावरील व्याज समाविष्ट आहे.

उदा. अशोकनं एका बँकेत जर १० लाख रुपये गुंतवले आहेत आणि काही कारणानं बँक दिवाळखोरीत निघाली किंवा बँक डुबली तरी अशोकला किमान १ लाख रुपये परत मिळतिलच. कारण डीआयसीजीसीनं त्यावर विमा उतरवलेला असतो.

बँक फिक्स्ड डेपॉजिट ला time डेपोजिट सुद्धा म्हटलं जातं. कारण ही एक ठेव एका निश्चित कालावधीसाठी बँक खात्यामध्ये असते. त्यानुसार पूर्वनिश्चित व्याज गुंतवणूकदारांना मिळते आणि जमा रक्कमेचा परतावा मुदतपूर्तीनंतर मिळतो. मुदत ठेवींवरील व्याजदर हे बचत खात्यांपेक्षा जास्त असते कारण पैसे मोठ्या कालावधीसाठी बँकेला वापरण्यासाठी मिळतात. ज्या गुंतवणूकदाराला सुरक्षा हवी असते आणि निधीची त्वरित गरज नसते असा गुंतवणूकदार मुदत ठेवींना प्राधान्य देतो .

एफडीवरील व्याज दर

सर्वसाधारणपणे दीर्घ मुदतीचा ठेवी या अल्प मुदतीच्या ठेवींपेक्षा चांगला परतावा देतात. कारण त्याचे व्याजदर जास्त असतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर बँक ऑफर करते. विविध मुदतीसाठी बँकांनी देऊ केलेला व्याजदर हा आर्थिक चक्रानुसार, निधीची उपलब्धता आणि मागणी या प्रमाणात वेळोवेळी बदलत असतो. तथापि, मॅच्युरिटीपर्यंत एखाद्या ठेवीवर ठराविक व्याजदर देय असण्याची वचनबद्धता असेल तर मात्र बाजारातील व्याजदर बदलले तरीही बँका तो दर बदलत नाहीत. आरबीआयच्या नियमानुसार त्यांना ते बदलता येत नाहीत. नवीन दर सहसा केवळ ताज्या ठेवीवर लागू होतात. एफडीधारक आपल्या एफडीला तारण ठेवून कर्ज सुविधेसारखे अतिरिक्त लाभ घेऊ शकतात. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत 5-वर्षीय बँक एफडी ही करवजावटीसाठी पात्र आहे. अन्य गुंतवणुकीच्या पर्यायांसह जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत कर कपातीसाठी ती पात्र आहे.

बँक फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सुरक्षित असल्याचे मानले जाते यात शंका नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का बँकेच्या मुदत ठेवींमुळे तुमच्या बचतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याची कारणे आपण आता बघूया.

१) एफडी ही तुम्हाला महागाईच्या दरापेक्षा कमी परतावा देऊ शकते.

2012-2014 दरम्यान भारतातील सरासरी चलनवाढीचा दर 9 .76% होता. बऱ्याच एफडीवर फक्त करापूर्वी 8.5% व्याज आणि कराच्या कपती नंतर 7% व्याज दिले जात होते. याचा अर्थ, दरवर्षी आपण आपला पैसा एफडीमध्ये गुंतविल्यास प्रभावीपणे पैसे गमावला जातो.

२) एफडी करपात्र आहे. जे आपण मिळविलेले निव्वळ रक्कम अधिक कमी करते. (५ वर्षाखालील)

३) Capital appreciation बँक फिक्स्ड डेपोजिट मध्ये होत नाही. फक्त मूळ गुंतवणूक मुदतपूर्तीनंतर परत मिळविली जाते.

४) मुदतीपूर्वी पैसे काढले तर दंड आकारला जातो.

परतावा आणि सुरक्षिता यांचा अभ्यास केला तर बँक फिक्स्ड डेपॉजिट्स पेक्षा बाजारामध्ये डेबिट फंड, कॉर्पोरेट डेपॉजिट्स, फिक्स्ड मॅच्युरीरिटी प्लॅन, सरकारी रोखे हे उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ते तुम्हाला एफ.डी पेक्षा चांगला परतावा देऊ शकता. पुढील लेखात याची सखोल चर्चा करूया.

- कमलेश भगत

(लेखक गुंतवणूक सल्लागार म्हणून हायपॉईंट सिक्युरेटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत.)

Updated : 5 May 2017 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top