कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा अस्मानी संकटाला तोंड देतोय. अशात आता कोल्हापूरकरांवर सुलतानी संकट ओढावलंय. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा परिस्थितीत पूरगस्त आणि नागरिकांकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आलेत.
१२ ऑगस्ट मध्यरात्रीपासून ते २४ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. बकरी ईद, स्वातंत्र्यदिन आणि २४ ऑगस्ट रोजी असलेला दहिहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष/संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने इत्यादी प्रकारची आंदोलने, जिल्ह्यात होऊ शकतात. यादरम्यान काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम २७ (३) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.