Home मॅक्स रिपोर्ट मंदी यात्रा | ऑटोमोबाईल क्षेत्रात ९ महिने सतत घसरण, ऑगस्ट महिना सर्वात...

मंदी यात्रा | ऑटोमोबाईल क्षेत्रात ९ महिने सतत घसरण, ऑगस्ट महिना सर्वात वाईट

सध्या देशभरात आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे. या मंदीचा सर्वाधिक फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. आता याबदद्लची ताजी आकडेवारी समोर आली आहे. देशातल्या वाहन उद्योगाची गेल्या ९ महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे आणि त्यात गेला ऑगस्ट महिना सर्वात वाईट होता असं देशातल्या वाहन उत्पादन कंपन्यांची संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईन मॅन्युफॅक्चरर्स’ यांनी म्हटलंय.
यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये देशात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहने असे मिळून तब्बल १ कोटी २० लाखांहून अधिक वाहनांची निर्मिती झाली. २०१८ मध्ये याच कालावधीत तब्बल १ कोटी ३६ लाखांहून अधिक वाहने तयार झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांच्या निर्मितीमध्ये १२.२५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
वाहनांच्या उत्पादनाबरोबरच त्यांच्या विक्रीमध्येही लक्षणीय घट पहायला मिळत आहे. प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत बाजारपेठेत एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २३.५४ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामध्ये कारची विक्री २९.४१ टक्क्यांनी, मोठी प्रवासी वाहनांची विक्री ६.२७ टक्क्यांनी तर व्हॅनची विक्री ३४.०४ टक्क्यांनी कमी झाली आहे.
प्रवासी वाहनांसोबत व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही मोठी तफावत पहायला मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १९ टक्के व्यावसायिक वाहने कमी विकली गेली आहेत. ज्यामध्ये मध्यम आणि जड वाहने (M&HCVs) यांची विक्री २८.९८ टक्के, हलकी वाहनांची विक्री १२.७० टक्के घसरली आहे.
तीनचाकी वाहनांबद्दल बोलायचं झाल्यास गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी तीनचाकींची विक्री ७.२३ टक्क्यांनी कमी झाली आहे. ज्यामध्ये प्रवासी रिक्षांची विक्री ७.२५ टक्क्यांनी घसरली तर माल वाहतूक करणाऱ्या रिक्षांची विक्री ७.६४ टक्क्यांनी कमी झाली आहे.
दुचाकींच्या विक्रीवरही आर्थिक मंदीचा परिणाम जाणवत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १४.८५ टक्के दुचाकी कमी विकल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये स्कूटरच्या विक्रीत १७.०१ टक्के, मोटारसायकलच्या विक्रीत १३.४२ टक्के आणि मोपेडच्या विक्रीत २०.३९ टक्के घट पहायला मिळाली आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत मंदीची लाट असली तरी काही वाहनांची निर्यात नियमीत सुरू असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या तग धरून आहे. यावर्षी एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एकूण वाहन उद्योग निर्यातीत १.४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात प्रवासी वाहने आणि दुचाकींची निर्यात अनुक्रमे ४.१३ आणि ४.५२ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, व्यावसायिक वाहने आणि तीन चाकी वाहनांची निर्यात अनुक्रमे ४४.४४ टक्के आणि १२.४० टक्क्यांनी कमी झाली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997