Home > मॅक्स ब्लॉग्ज > आरक्षणाची मागणी आणि वास्तव...मंदार फणसे यांचा ग्राउंड रिपोर्ट

आरक्षणाची मागणी आणि वास्तव...मंदार फणसे यांचा ग्राउंड रिपोर्ट

आरक्षणाची मागणी आणि वास्तव...मंदार फणसे यांचा ग्राउंड रिपोर्ट
X

मराठा आरक्षण या विषयावर आतापर्यंत खूप लिहिलं बोललं गेलं आहे, कामा निमित्त आम्ही पत्रकार परिस्थिती च्या जवळ जाण्याचा प्रसंग नेहेमीच येत असतो...चार दिवस झाले, काकासाहेब शिंदे च्या घरी जाऊन, 23 जुलै ला, या 25 वर्षा च्या तरुणाने पुलावरून झोकून दिलं आणि संपला..! त्याची ती भरल्या नदीतली उंचावरून मारलेली उभी उडी सुद्धा अजून डोळ्यासमोरून जात नाहीये.

जलसमाधी आंदोलन हा मराठा क्रांती आंदोलनाचा भाग होता. काकासाहेब त्यात आपला जीव देऊन गेला, ही जलसमाधी होती का नव्हती हा प्रश्न सुद्धा निरर्थक करून गेला. जिथे काकासाहेब गेला त्याच्या जगण्या मरण्या मध्ये 6 मिनिटांचं अंतर होतं. धडपडत होता पाण्यात, अखेर शांत झाला, ना कुणी त्याला पाणी नाकात जातांना वाचवलं ना कुणी तसे प्रयत्न केले. का नाही केले ? या प्रश्नानी सुद्धा मनात खोल जखम केली आहे.

काकासाहेबच्या,

आगर कानड गावात आम्ही मूळ रस्ता सोडून खूप आत गेलो, मातीच्या रस्त्यावरून पायी शाळेत निघालेली लहान मुलं आणि पावसाची वाट पाहत बसलेली शिवारातली पिकं, मामला एकदम प्रत्येक गावात असतो तसा.

काकासाहेब ड्रायव्हर चं काम करायचा, त्याच्या आईला विचारलं की लेकरू कधी शेवटचं बोललं होतं तुमच्याशी ? म्हणाली 2 महिन्यांपूर्वी. लग्न व्हायच्या आधीच गेला, हुशार होता पण शिक्षण अर्धवट, राग डोक्यात असायचा, घर 5 x 5 ची खोली, समोर 4 भांडी, काकासाहेबाच्या शाळेत जातांना च्या तऱ्हा सांगणारी कर्ती आजी जीनं हे शिंदे घराणं मोलमजुरी करून वाढवलेलं, घराबाहेर शेणाने माखलेली चामड्याची जुनी चप्पल, आणि बाहेर वाढीव थोडं फार अंगण , जमीन एक एकर, पाऊस या वर्षी पण 20% पडलाय, उरलेला एक भाऊ, आता काकासाहेब अमर झाला त्या बदल्यात नोकरी ला लागलाय. काका ची बहीण धायमोकलून रडते, मदत मिळते पण आमचं पोरगं नाही मिळणार पुन्हा पण समाजासाठी त्यानं मोठं काम केलं म्हणते, कायगाव पुलावर आता काकासाहेब अमर रहे । नावाची पाटी बसलीय, त्या समोर कित्येक तरुण सेल्फी काढायला दुरून येतायत, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देतायत.

वैजापूर देवगाव ला गेलो , राजेंद्र सोनवणे च्या घरी, तरुणांचं मित्र मंडळ बसलेलं, भिंतीवर जिजाऊ महाराजांचं मोठं पेंटिंग , पायावर प्लास्टर आणि असंख्य वेदना घेऊन राजेंद्र थरथरून बोलू लागला, या तरुणाने कोरड्या नदी पात्रात पुलावरून उडी घेतली, पाय तुटला, कंबरेचा खालचा 3 रा आणि चौथा मणका गेला, मनातला राग तोच ,"त्यांना" कमी मार्क मिळून ऍडमिशन मिळते, नोकरी मिळते ...आम्हाला नाही.

मुलांची लग्नं जमायला त्रास होतो, काम काय करणार ? पुढारी , कार्यकर्ते नाहीतर आंदोलना मध्ये राबायचं. आसपास सहकार उद्योग नाही, रस्ते नाहीत, मोठ्या संस्था नाहीत. शेती तुकडे होत होत संपत चालली आहे.

हा मराठवाडा,महाराष्ट्र , यातल्या गावा गावात असे काकासाहेब आहेत, शेती ची धूळधाण आहे, ज्यांनी राखून ठेवलं आहे ,ते टिकून आहेत, शिकलेली पोरं जॉब शोधतायत,ज्यांना जॉब आहेत ते 6500 पगाराचे , त्यात अनेक ठिकाणी त्यातले 3500 कट मारून मिळणार, 4 महिन्यांचे पैसे उधार, डोक्यात राग नाही येणार तरुण वयात तर काय होणार ?? आभाळ फाटलंय.

सामाजिक मागास की आर्थिक मागास, भौगोलिक मागास कि राजकीय मागास , सामाजिक न्यायदानाच्या

दरबारात आता किस काढला जातोय, राजकारण तर नक्कीच होणार, मराठयांना आरक्षण कधी? कसं? कशात ? मिळणार याचं उत्तर आज धड कुणीच देऊ शकणार नाही, अनेक कारणं आहेत ज्यामुळे नाही देऊ शकणार हे उत्तर . कारण कुणाला आपला आहे तो वाटा गमावण्याची भीती? कुणाला आता कशी जिरली मराठ्यांची म्हणून बघत राहायचं आहे, कुणाला ते घटनेच्या चौकटीत बसवणं जड जाणार आहे..! कुणाला मतांचं ,ध्रुवीकरणाची राजकीय धूळ डोळ्यात फेकायचीये,

मराठ्यांना आरक्षण देणार ते श्रीमंत मराठ्यांना मिळून ते लाभ घेणार का ? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा श्रीमंत मराठयांना द्यावच लागेल, आरक्षण देत घेत असतांना, त्यात आर्थिक निकष काय? क्रिमी लेयर सुरुवातीला असणार काय? आणि 52% पेक्षा अधिक OBC टक्केवारी वाढवायला, करावी लागणारी घटना दुरुस्ती विद्यमान संसद करणार काय? कधी? मागास वर्ग आयोग करीत असलेलं सर्वेक्षण योग्य दिशेने सुरू आहे का? सामाजिक मागास म्हणून सिद्ध होण्याच्या 23 मार्कांच्या परीक्षेत 13 मार्क मिळवून मराठा समाज उत्तीर्ण होईल का ? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न ,राज्यकर्ते ,राजकारणी, आणि समाजकारणी सुद्धा मूग गिळून गप्प आहेत.

जाती जातीतील तेढ, त्वेष आणि द्वेष , वापरून राजकारण जिंकेल पण राज्यातील समाजशक्ती जिंकेल का? राजकारण, भावकी, धर्म, जाती, गावो गावी मनाची फाळणी नाही तर चिरफाळ्या झाल्यात. अस्वस्थ, अशांत, बेरोजगार तरुण हे येणाऱ्या काळात आरक्षणाच्या आशेवर, ते मिळो अथवा नं मिळो, परिस्थितीशी दोन हात करण्याची उमेद ठेवू शकतील का?

आरक्षणाच्या संबंधी घटना समितीच्या चर्चेत मोठे विद्वान संदर्भ मांडणी करून बसलेत, आरक्षणाची फेर मांडणी व्हावी का? ज्यांना गरज आहे त्यांनाच ते मिळण्याचे निकष पुन्हा तपासले जावेत का? एकेकाळी शेती जमिनी आधारित असलेल्या जाती आज देशभर आरक्षण मागतायत, पटेल, गुज्जर, जाट, हे सुद्धा या सामाजिक आणि आर्थिक मागासले पणाच्या अडकित्यात अडकलेत याची संपूर्ण जबाबदारी याच समाजातल्या नेतृत्वाची आहे, असं म्हणणं जबाबदारीचं ठरेल का?

अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रामाणिक हिम्मत मात्र सर्व जाती समूहांना, राजकारण्यांना, समाजकारण्यांना, नोकरशहांना, करावी लागण्याची ही वेळ आहे यात शंका नाही. नाहीतरी या देशात एकीकडे किमान 4500 जातींना सामाजिक मागास न्यायप्रक्रियेतून आरक्षण मिळालं आहेच, उर्वरित सुद्धा मागास होतात, काही जण नसतांना होऊ पाहतात , याचा अर्थ या देशाची विकासाची दिशा चुकली आहे हे सांगायला तज्ञांची गरज नाही.

स्वातंत्र्य दिनी घसे फोडून प्रत्येक जण आपली कामगिरी सांगतोय, पण अमिताभच्या अँग्री यंग मॅन भाषेत बोलायचं तर "यहां हर किसींको जरा अपनी गिरेबान में झांक के देखने कि जरुरत हैं"

72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भारतीयांना खूप शुभेच्छा !!!

जय हिंद !

मंदार फणसे, वरिष्ठ पत्रकार

Updated : 15 Aug 2018 6:34 AM GMT
Next Story
Share it
Top