धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा – औरंगाबाद खंडपीठ

धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा – औरंगाबाद खंडपीठ

सरकारी जमिनीच्या व्यवहारप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औऱंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. त्यामुळं राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या सरकारी जमिनीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, तीच जमीन बेलखंडी मठाला दान देण्यात आली होती. हीच दान केलेली जमीन मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. ही कृषी जमीन अकृषी करूनही घेतली, असा आरोप मुंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तपास कऱणाऱ्या पोलिसांवरही न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयानं धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

इनामी जमिनींचा खरेदी-विक्री व्यवहार हा बेकायदेशीर आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा दबाव आणून या इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार केल्याचा आरोप याचिकाकर्ते फड यांनी केला होता. फड यांनी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस ठाण्यातही तक्रार दिली होती.

1991 मध्ये याच साखर कारखान्यासाठी धनंजय मुंडे यांनी 24 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस इथल्या बेलखंडी देवस्थानची असल्यानं तिच्या खरेदी व्यवहारावरच याचिकाकर्ते फड यांनी आक्षेप घेतला होता. जेव्हा या जमिनीची खरेदी झाली तेव्हा शासनदफ्तरी या जमिनीची नोंद इनामी नव्हती. त्यामुळं या वादाची आम्हांला कल्पना नव्हती. विक्रीचा अधिकार श्री. देशमुख यांच्याकडे असल्यानं त्यांच्याकडून जमीन विकत घेतल्याचं मुंडे यांच वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितलं. याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं.