संघ बौद्धिक क्षेत्रात

संघ बौद्धिक क्षेत्रात

299
0
कोल्ह्यानं कोंबड्यांची शाळा काढली तर काय होईल? ती दोनचार दिवसांत बंद पडेल. एकेक विद्यार्थी गुरुजी गट्टम करत चालल्यावर आणखी काय होईल ? तसंच नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठात घडणार आहे. तिथं बी. ए. (इतिहासाच्या) अभ्यासक्रमात द्वितीय वर्षाच्या चतुर्थ सत्रात रा. स्व. संघ शिकवला जाणार आहे. 1885 ते 1947 हा काळ या अभ्यासक्रमासाठी असून पूर्वी ‘कम्युनॅलिझम’ अर्थात जमातवाद हा विषय शिकवला जाई. तो काढून टाकून त्या जागी आता संघाचा इतिहास शिकायचा आहे. म्हणजे बदल काय झाला ? जो विषय तात्विक आणि पुस्तकी पातळीवर शिकवला जायचा त्याजागी कम्युनॅलिझमचा प्रत्यक्ष अंगीकार करणाऱ्या संघटनेचा अभ्यास करावा लागणार. एकूण एकच! आम्हाला वाटले संघानं काय शक्कल लढवली बुवा, एकदम शिकायच्या क्षेत्रातच आणले झेंड्याला. नाहीतर अभ्यास, वाचन, संशोधन यांचं संघाला फार वावडं. गोळवलकर, ठेंगडी यांचा अभ्यास आम्ही केला आणि आम्हाला समजलं की, स्वयंसेवकांशी वाद, तर्क यापासून चार हात लांबच रहावे. उगाच संशय, शंका, प्रश्न तयार झाले की संघकार्य डळमळते.
शाखेत रोज यावे, बौद्धीक ऐकावीत, आदेश पाळावेत, आणि प्रेम-मैत्री-सेवा करुन आणखी अनेकांना शाखेत आणावे. बस्स! अभ्यासाची, चर्चेची, वादाची आवश्यकता पडतेच कुठे? झाले की नाही ब्राह्मणभटासारखे! स्वतः अभ्यास नाही करायचा पण बुद्धीमान म्हणून आपोआपच मान मिळणार अशी अवस्था धर्मानेच करुन ठेवली आहे. विद्यापीठात मात्र, असे होणार नाही. तिथं शाखा नाही. विद्यार्थी शिक्षकाला उलटसुलट प्रश्न विचारणार, खरेखोटे पडताळणार, उत्तरपत्रिकेत काहीबाही लिहून ठेवणार, अनुत्तीर्ण झाले की भांडणे होणार, पेपरात बातम्या येणार… ‘संघ समजावून घ्यायचा असल्यास तो शाखेच जाऊनच समजावून घ्या’ असं वीस गुणांचं प्रक्टिकलही सक्तीचं केलं ही आणखी गदारोळ होणार. संघात मग दोन तट पडणार. ‘शाखा हवी, वर्ग नकोत’ असा संघर्ष उफाळणार. पण विद्यापीठाचा गट जिंकणार आणि शाखांना कंटाळलेले लोक वर्गातच बरे म्हणत रहाणार….
असो. इतिहास विषयाला संघ चिटकला ते त्याच्या कलानुसार झाले. इतिहासाखेरीज दुसरे कवच संघाला नाही. खरा इतिहास हा पुरावे, कागदपत्रे, साक्षी, दाखले, हवाले यांच्यावाचून सांगण्याची त्यांची रीत. त्यामुळं इतिहास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आतापासूनच मिथके, मिथ्यकथा, दंतकथा, गूढकथा, रहस्यकथा, अफवा, अपप्रचार, अतिशयोक्ती आणि असत्य यांच्यात रहावे लागेल. कारण प्रचंड गुप्ततेत कारभार करणाऱ्या या संघटनेला लेखीपत्री दाखल्यावरच भरवसा नाही. तटस्थपणा, निःपक्षपाती मांडणी संघालाच मान्य नाही तर संघाचा इतिहास लिहिणाऱ्या लेखकांना कशी असेल ? त्यामुळं विद्यार्थ्यांना एकांगी इतिहास वाचतोय की, एकांगी, एकतर्फी प्रचार? असा प्रश्न पडेल. म्हणजे प्रश्न पडू नयेत असे कितीही प्रयत्न केले तरी संघाविषयी प्रश्न पडतीलच.
संघाला हे पक्के ठाऊक असल्यानं प्रत्येक महाविद्यालयात संघाचे प्रिय व लाडके प्राध्यापक शिकवायला निवडले जातील. तिथेही मग राजकारणाचा भडका उडणार. प्राध्यापक संघटनांची भांडणं होणार. काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट किंवा एकंदरीत पुरोगामी विचारांचे प्राध्यापक इतिहास क्षेत्रात जास्त आहेत. त्याने संघर्ष आणखी चिघळणार. त्यात ‘नागपूरकर’ चालाखी करतील. विद्यार्थ्यांना हजेरीत सवलती, उत्तरपत्रिकेत उत्तम गुण अशा युक्त्या होत रहातील. एकट्या अ.भा.वि.प.चे या दुर्गतीकडे लक्ष असेल. पण ती एकटी काय करणार? संघ समजावून घ्यायचा तर बाबा आढाव, रावसाहेब कसबे, मधू वाणी, राम पुनीयानी आणि मी यांची पुस्तके, पूरक संदर्भ साहित्य अभ्यासक्रमात लागली पाहिजेत. गोळवलकर गुरुजींचेही सर्व खंड संदर्भासाठी सक्तीचे केले पाहिजेत. तरच संघाचे जीर्ण, टाकाऊ, हट्टी, जातीय आणि हिंसेला अनुकुल स्वरुप या पिढीला लक्षात येईल. संघ नकळत चुकीच्या मैदानात आलाय. होऊन जाऊ द्या!
– जयदेव डोळे